अभेद्य कलावंतीण दुर्ग 

रिता शेटीया
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

ट्रेक कथा
 

नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी हटके करावी, म्हणून जेव्हा या कलावंतीण दुर्गाच्या अवघड ट्रेकबद्दल ऐकले, तेव्हाच हा ट्रेक करायचे ठरवले. तसा मला ट्रेकचा खूप अनुभव नव्हता, पण सिंहगडला खूप वेळा गेले आहे... आणि तिकोनाला एकदाच गेले होते. पण ट्रेकिंग करायला खूप आवडते. बकेट लिस्ट ॲडव्हेंचर ग्रुप कलावंतीण दुर्गाच्या ट्रेकला जाणार हे समजले आणि तेव्हाच या ग्रुपबरोबर जाण्याचे ठरवले. या आधी कधीच कोणत्याही ऑर्गनाइज्ड ग्रुपबरोबर ट्रेक केला नव्हता, पण मित्रमैत्रिणींसोबत केला होता. यावेळी ठरवले जरा अनोळखी लोकांसोबत जाऊन पाहूया. 

सहा जानेवारीला सकाळी ६ वाजता आम्ही निघालो. पुण्यातून ऋतुराज, ओम, मयूरेश, आशिष, साई कुमार, सुखेश, मनीषा, गौरी, नम्रता, रचना, सोनाली, खुशबू, अस्मिता, अर्चना, वैदेही, पूजा, प्रियांका आणि मी असा आमचा १८ जणांचा ग्रुप निघाला. जसे प्रत्येक वेळी होते तसेच या ही ट्रेकला कोणत्या ना कोणत्या कारणाने उशीर झालाच. अगदी कधी चढायचे, कधी उतरायचे आणि परतीला कधी लागायचे असे उत्तम नियोजन ऋतुराजने केले होते. पण उशीर व्हायचा तो झालाच. गुगल मॅप असतानाही, रस्ता चुकल्याने सतत तीन वेळा यू टूर्न घेऊन एकदाचे आम्ही कलावंतीण दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकुरवाडी गावात पोचलो. 

दुपारचे ११ वाजले होते, भर उन्हात ट्रेकला सुरुवात करण्याआधी आलेल्या सर्वांची ओळख झाली. आम्हा मुलींना सतत तुम्हाला हे करता येणार नाही/जमणार नाही असेच म्हटले जाते, पण ट्रेकमध्ये आम्हा मुलींची संख्याच जास्त होती. येथेही महिला कुठेही कमी नाहीत याचे चित्र दिसून आले. पायथ्यापासून वर पाहिले असता ऐकल्याप्रमाणे हा ट्रेक अवघड आहे असेच वाटले. इतर किल्ल्यांपेक्षा हा ट्रेक नागमोडी वळणे, अरुंद पायऱ्या असलेला. पण तितकाच निसर्ग सौंदर्याने डोळ्यांना तृप्त करणारा. इथला ट्रेक करायचा असेल, तर किल्याचा थोडा इतिहास आणि हा नेमका आहे कुठे याची सविस्तर माहिती असायलाच हवी. मुंबईच्या पश्चिम घाटांमध्ये समुद्रसपाटीपासून ७०१ मीटर (२,३०० फूट) इतक्या प्रचंड उंचीवर जगातील सर्वांत धोकादायक किल्ला आहे: तो म्हणजे कलावंतीण दुर्ग, जो राणी कलावंतीण यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आला होता. भव्य दिव्य अशा निसर्ग सौंदर्याने नटलेला हा किल्ला अतिशय सुंदर आहे. अरुंद रॉक कट पायऱ्या, खडबडीत झोपडपट्ट्या आणि कोणत्याही प्रकारचे समर्थन नसलेले खडबडीत भूभाग किल्याखालील आणि किल्ल्यावरील ट्रेक धोकादायक आणि तितकाच रोमांचकारी आहे. हे कालांतरित किल्ले ''धोकादायक स्वभावाचे'' म्हणून प्रसिद्ध आहेत. विविध प्रकारचे पक्षी, वनस्पती, विविध फुलांची झाडे याने कलावंतीण दुर्गाचा परिसर नटलेला आहे. जणू ते पाहून असे म्हणावेसे वाटते, की ''हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमलीचे, त्या सुंदर मखमलीवरती फुलराणी ही खेळत होती.'' 

कलावंतीण दुर्गाजवळच प्रबळगड किल्ला आहे. जो अतिशय सुंदर आणि हिरवाईने नटलेला आहे. ज्या ठिकाणाहून कलावंतीण दुर्ग चढण्यासाठी आम्ही प्रस्थान केले ते ठाकुरवाडी गाव. गावातील लोकही अतिशय बोलके आणि मदत करणारे. कलावंतीण दुर्गाला चढण्यासाठी तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. ऊन वाढत असल्याने दुर्ग लवकर गाठायचे ठरवले. सर्वांनी चढायला सुरुवात केली. आम्ही सर्व जण तसे एकमेकांना अनोळखी पण गप्पा मारत मारत चढाई करण्यास सुरुवात केली. जसजसे आम्ही चढत होतो तसतसा सोबत असलेला रवी (सूर्य) त्याची किरणे प्रखर करत होता. सर्वच जण झपाझप पावले टाकत होते आणि नागमोडी वाट पायाखाली टाकत आम्ही पुढे पुढे जात होतो. ऊन खूप असल्याने सारखी तहान लागत होती. थंडीचे दिवस असतानाही, उन्हाच्या प्रखरतेने घामाघूम झालो, दमही तितकाच लागत होता. पण आजूबाजूला असलेली सुकलेली गवते, फुलांची झाडे, त्याला असलेली विरळ टपोरी फुले, लाल माती, विविध रंगांचे पक्षी, किडे पाहत आमचा प्रवास चालू होता. ग्रुपमधील कोणी मागे तर राहिले नाही ना याकडे ऋतुराजचे विशेष लक्ष होते. कोणी मागे असेल, तर तो लगेच त्याला पुढे करायचा, त्यांच्यासाठी थांबायचा आणि सर्वांना पुढे करून मग पुन्हा चालायला सुरुवात करायचा. तो त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडत होता. अशातच आमच्या ग्रुपमधील मनीषा थोडे अंतर पार केल्यावर म्हणाली, ''मी नाही चढू शकणार,'' तेव्हा तिला ''थोडेच अंतर आहे, तू चढशील'' अशी हिंमत ऋतुराजने दिली. त्याला आम्हीदेखील दुजोरा दिला. यावेळी जाणवले की ट्रेक आपल्याला खूप काही शिकवून जातो. इथे ना कुणी लहान, ना कुणी मोठे पाहिले जाते, ना कोणी कोणत्या जातीचा, धर्माचे हे पहिले जाते. पाहिले जाते ते फक्त केअरिंग, गिव्हिंग अँड शेअरिंग... आणि हिंमत देण्याचा प्रयत्न! 

चोहोबाजूंनी दरी आणि त्यात उभा असलेला हा अभेद्य आणि दुर्गम दुर्ग हेच शिकवतो, की कितीही मोठे संकट आले, तरी कोलमडून न जाता खंबीरपणे उभे राहायचे! येणाऱ्या वादळ, वाऱ्याचा, पावसाचा सामना करायचा. आम्ही जसजसे वरती जात होतो तसतसा आमचा उत्साह वाढत होता. दुर्गाच्या शेवटच्या टप्यावर पोचायचे आणि नंतरच पोटपूजा करायची. कारण चढताना बऱ्यापैकी ''ड'' जीवनसत्त्व आम्हाला आमच्या सारथ्या (सूर्य)कडून मिळत होते. ठिकठिकाणी पाणी, लिंबू सरबत, फळे घेऊन बसलेले गावकरी होते. तेही ''आता थोडेच अंतर आहे'' अशा शब्दांनी आमचा उत्साह वाढवत होते. मग काय आमचापण उत्साह वाढत होता. 

निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने आमच्यातील फोटोग्राफर जागाच होता. मग काय मयूरेश, ओम आणि मी जे जे दिसेल म्हणजे अगदी कुत्रा, मांजर, कोंबडी, झोपडी, विविध पक्षी, फुले, फुलपाखरे, आकाशातून जाणारे विमान, दऱ्या याचे फोटो घेत होतो. 

एका वळणार वरती जाण्यासाठी दोन मार्ग होते. एक साधा सोपा आणि दुसरा जरा अवघडच होता. आमच्या ग्रुपमधील मयूरेश, ओम आणि मी अवघड मार्गाने जाण्याचे ठरवले. ऋतुराज म्हणाला, ''नको जाऊस, या सरळ मार्गाने ये.'' पण माझ्यात ट्रेकिंगचा भलताच उत्साह ओसंडून वाहत होता. मग काय खडकांना पकडून पकडून मी वरती चढत होते. अगदी आमच्यासोबत असलेला दुसरा ग्रुपही मला प्रोत्साहन देत होता. ''मॅडम चढाल तुम्ही, घाबरू नका...'' आणि मीही चढत होते. मयूरेश आणि ओम तर कधीच वर पोचले होते. अंतिम टप्प्यात मला जरा अवघडच झाले. चढताच येईना. तेव्हा दोघही मला सांगत होते, ''मॅडम चढा, इकडून या, तिकडून येण्याचा प्रयत्न करा,'' पण माझी उंची कमी असल्याने तो खडक पार करता येत नव्हता. शेवटी मी म्हणाले, ''नाही रे नाही जमणार,'' तेव्हा मयूरेश आणि ओमने हात पुढे केला आणि मग मीही श्री गणेशा करत हिंमत जुटवली आणि एकदाची वर चढले. त्याक्षणी आनंद आणि आनंद अश्रू यांची मनात किलबिल सुरू झाली. पण खरी परीक्षा तर पुढे होती. सर्वांत महत्त्वाचा अंतिम टप्पा गाठायचा असेल, तर अरुंद पायऱ्यांचा सामना करायचा होता. पावसाळ्यात या पायऱ्या चढणे म्हणजे एक अग्निदिव्यच होय. आमच्यातील काही जण पुढे निघून पटापट पायऱ्या चढायला लागले. अरुंद पायऱ्या चढताना ऋतुराज आम्हाला सांगत होता, ''घाबरू नका केवळ पायऱ्यांकडे लक्ष द्या, दरीकडे पाहू नका...'' आणि आम्ही तसे करत वर चढत होतो. पण आपल्या अवतीभवती असलेले निसर्ग सौंदर्य पाहण्याचा लोभ कुणाला होणार नाही, तो मला झाला आणि मी थोडे चढून झाले की थांबायचे आणि निसर्गाचे सौंदर्य न्याहाळायचे आणि फोटोही काढायचे. मयूरेशने तर या पायऱ्या चढताना पायऱ्यांचा खूपच मस्त व्हिडिओ घेतला आहे. 

असे करत करत कलावंतीण दुर्गाच्या अंतिम टप्प्यावर (उत्तुंग डोंगरमाथ्यावर) आम्ही २.३० वाजता पोचलो. आम्हाला विश्वास बसत नव्हता. पण त्यावेळी आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर तो उत्साह, आनंद ओसंडून वाहत होता. दुर्गाच्या त्या उन्नत माथ्याला वंदन केले आणि आमचे फोटो सेशन सुरू झाले. नंतर थोडावेळ आम्ही सर्व जण निवांत बसलो. आम्हा प्रत्येकाला वाटत होते, की इथेच थांबावे. दीड तास मस्त वेळ घालवल्यावर परतीच्या प्रवासाला लागलो. आता पुन्हा एकदा त्या अरुंद पायऱ्या उतरताना प्रत्येकाचाच कस लागणार होता, पण प्रत्येकाने एकमेकांना साहाय्य करत तो टप्पा पार केला. 

दुर्गाच्या मधल्या टप्प्यावर लक्ष्मणकाकांचे घर आहे. तिथेच जेवण करायला थांबलो. अगदी गावाकडील चुलीवरचे जेवण म्हटल्यावर आम्ही सर्वांनी चांगलाच ताव मारला. जेवत असताना लक्ष्मणकाकांनी सांगितले, ''इथे दरवर्षी सलमान खानदेखील ट्रेकिंगला येतो आणि अगदी सामान्य माणसाप्रमाणे इथे वावरतो.'' सलमानची माहीत नसलेली अजून एक चांगली बाजू आम्हा सर्वांनाच समजली. जेवण झाल्यावर पटापट आणि झपाझप पावले टाकत सर्व जण पायथ्याशी आलो. सायंकाळचे ६ वाजले होते. कलावंतीणच्या आणि प्रबळगडाच्या डोंगररांगांचा निरोप घेत, मस्त गरमागरम चहा घेऊन आम्ही आमचे ट्रेकिंगचे सुंदर क्षण अनुभवत परतीच्या प्रवासाला लागलो. पुन्हा याच आशेने, की बकेट लिस्ट ॲडव्हेंचर ग्रुप पुन्हा अशीच एखादी ट्रेकची ट्रिप काढेल आणि आम्ही अनोळखीतून ओळखीचे झालेले मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटू...  

संबंधित बातम्या