वासोट्याचा धम्माल नाइट ट्रेक...

सागर हुलवान, कराड
सोमवार, 16 डिसेंबर 2019

ट्रेककथा
 

काही दिवसांपूर्वी चोरवणेकडून वासोट्याला नाइट ट्रेक करायचा प्लॅन मी आमच्या ग्रुपमध्ये मांडला. तेव्हा बरेच हौशे नवशे गवशे तयार झाले, कारण अजून आमच्या 'एमपीएससी' परीक्षेचं वेळापत्रक आलं नव्हतं. २० जण यायला तयार झाले. त्यामधील फक्त चार जणांनाच ट्रेकिंगचा अनुभव होता. बाकी १६ जणांना ट्रेकिंगचा अजिबात अनुभव नव्हता.
 
कराडमधून आम्ही चिपळूणच्या दिशेनं खड्डेमय रस्त्यावरून दहा गाड्यांवरून निघालो. चिपळूणमध्ये गाड्यांमध्ये पेट्रोल टाकून बहादुरशहा फाट्यावरून कलंबस्तेच्या दिशेनं आम्ही रात्री ९ वाजता कूच केली. कलंबस्तेपासून चोरवणेपर्यंत ३१ किलोमीटरचं अंतर पूर्ण जंगलातून होतं. क्वचितच लोक आणि गावं किंवा गाड्या दिसायच्या. रस्त्याच्या दुतर्फा ४-५ फुटापर्यंत गवत वाढलेलं. आम्ही त्या रस्त्याला लागायच्या आधीच चांगलाच पाऊस झाला असल्यानं रस्ता चांगलाच धुऊन निघाला होता. हवेत मस्तपैकी आर्द्रता जाणवत होती. अमावस्या दोन दिवसांवर असल्यानं सगळीकडं काळाकुट्ट अंधार होता... स्मशान शांतता.. आणि त्यात फक्त कीटकांचा किर्रर्रर्रर्रर्र असा आवाज.. आणि आता या शांततेत आमच्या ९ गाड्यांचा घुर्रर्रर्रर्रर्र आवाज सामील झाला होता.

रात्री १० वाजता मजल दरमजल करत चोरवणे गावात पोचलो. गावात डोंगराच्या पायथ्याला एक सुंदर असं विठ्ठल-रखुमाईचं मंदिर आहे. तिथंच आम्ही जेवून थोडी विश्रांती घ्यायची ठरवलं.. पण फक्त ठरवलं हं, घेतली नाही. तसं तर सगळेचजण पेंगुळले होते. पण आमच्यात हरीष, गणेश, तात्या, आशुतोष, सोहन, सुनील ही अशी काही कार्टी होती, त्यांच्या दंग्यानं सगळ्यांच्या झोपाच उडाल्या होत्या. पण यांनीच ट्रेकमध्ये खरा रंग भरला. दमलेल्या गड्यांमध्ये पुन्हा ऊर्जा भरण्याचं काम त्यांचे जोक करत होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पायऱ्यांजवळ गाड्या लावून रात्री १२.३० वाजता आम्ही ट्रेक सुरू केला. मजल दरमजल करत आमचं पायऱ्या चढणं सुरू होतं. रात्रीच्या त्या भयाण शांततेत आमच्या कुजबुजण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता. पायथ्याच्या गावातला गाववाला म्हणाला होता, की आम्ही पायऱ्या चढून एक ते दीड तासात नागेश्वरला जातो, म्हणून पोरंपण जाम खूश होती. आता आपणपण दोन तासांत नागेश्वरला जाऊन मस्तपैकी एक झोप काढायची असं मनात मजले बांधत होते. पण त्यांना कुठं माहीत होतं, की आपल्याला अजून किमान चार तास तरी लागणार आहेत ते. त्यांचा उत्साह कमी होऊ नये म्हणून मी, दत्त आणि आबासुद्धा गप्पच बसलो आणि पुढील वाट चालायला लागलो. दंगा मस्तीत किती चालतोय हे समजत नव्हतं आणि किर्रर्रर्र अंधार असल्यानं दऱ्या किती खोल आहेत तेही समजत नसल्यानं पोर एकदम अरुंद पायवाटेनं बिनधास्त चालत होती. पण नागेश्वर काय आपल्या आवाक्यात येत नाही असं जसं समजायला लागलं, तशी त्यांच्या मनाची चलबिचल व्हायला लागली.

'कशाला आलो उगाच',
'आता पुढच्यावेळी न्हाय बुवा आपण जाणार कुठल्या ट्रेकला'

सगळ्यांची थोबाडं घामानं चिंब भिजलेली. थंडीसाठी आणलेली स्वेटर्स कधीच बॅगेत ठेवलेली. बरेचजण नवीन असल्यानं आम्ही विश्रांती घेतच नागेश्वरच्या दिशेनं जात होतो. पायऱ्या कधीच संपल्या होत्या आणि आता फक्त पायवाटेनं आम्हाला वर जायचं होतं. सर्वांत पुढं आम्ही दत्तप्रसाद आणि सुनील जाधवला ठेवलं होतं. मी मधला मोर्चा सांभाळत होतो आणि फौजी शिवाजी जाधव आमच्या गण्याबरोबर सर्वांत पाठीमागून चालत होते. फौजींच्यामुळं आम्हाला पाठीमागची जास्त काळजी वाटली नाही. पहाटे ३.५२ ला आम्ही नागेश्वरला पोचलो. नागेश्वरचा थंड वारा आम्हा दमल्या भागलेल्यांना एक चैतन्य देऊन गेला. पहाटे ४ वाजता काहीजण नागेश्वर गुहेत तर काही पठारावर झोपले. झोप तर पडल्या पडल्या लागली.

सकाळी ६.३० ला उठून आम्ही ७.३० पर्यंत तयार झालो. अनिल बागल आणि रोहित यादव यांनी मस्तपैकी मॅगी केली होती, सगळ्यांनी मॅगीवर ताव मारला. आता ९ वाजता आमच्या नागेश्वर ते वासोटा या चढाईला सुरुवात होणार होती. रात्री ट्रेक करताना आबाला खूप त्रास झाल्यानं आणि या आधी दोन वेळा त्यानं वासोटा बघितल्यानं त्यानं नागेश्वरजवळच थांबायचं ठरवलं. आम्ही जेवणाचं साहित्य घेऊन बाकी सर्व आबाजवळ ठेवून वासोट्याच्या दिशेनं निघालो.

अरुंद पायवाट, खोल दऱ्या, घनदाट जंगल पाहून तात्या बागलची चांगलीच फाटली होती. तरीही त्याला थोडं प्रोत्साहन दिलं आणि त्याला घेऊन आम्ही पुढं सरकलो. ताई तेलिणीच्या सुळक्याला वळसा घालून आमची जंगलातली पायपीट सुरू झाली. आता आमची खरी कसोटी होती. कारण नुकताच पावसाळा संपल्यानं इथं जळवांचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं आम्हाला जपून आणि भरभर चालायचं होतं. सूर्य डोक्यावर होता, पण जंगल घनदाट असल्यानं सूर्याची किरणं खाली पोचत नव्हती. त्यामुळं आम्हाला दम भरणं, घाम येण्याचं प्रमाण कमी झालं. पण जळू चिकटण्याचं प्रमाण वाढलं होतं. अनिल बागलला एक जळू चिकटल्यानं त्याच्या पायाचं रक्त काही लवकर थांबेना. इतरांनाही काही जळवा चिकटल्या होत्या. पण त्यांनी लवकर स्वतःची सुटका करून घेतली होती. 

आता नवीन वासोटा आमच्या आवाक्यात आला होता. सकाळी ९ ते ११ सलग विश्रांती न घेता आम्ही वासोट्यावर आलो होतो.

आता बरेचजण चांगलेच थकलेले होते आणि संदीप जाधवांना गडावर एका कमानीतून आत जाताना डोक्याला जोरात मार लागून टन्नूच आला होता. त्यामुळं सकाळपासून उत्साही असलेले संदीप जाधव पेनकिलर खाईपर्यंत शांत शांत वाटत होते. आता आम्हाला आराम करायला अजिबात वेळ नव्हता. धावतपळत वासोटा माथा फिरलो आणि ज्या ठिकाणी उतरायचं त्या चोरवणे गावाचा कानोसा घेतला. डोंगरांच्या घड्यांवर घड्या पडल्या होत्या. शेवटच्या घडीच्या मागं चोरवणे गाव दिसत होतं. आम्ही वरूनच वाटेचा अंदाज बांधला, कारण खाली उतरल्यानंतर चोरवणे गाव दिसणार नव्हतं. दूर डोंगरांच्या पलीकडं ते दिसत होतं. लक्षपूर्वक डोंगररांगा पाहिल्या आणि वासोट्यावरून परतीच्या प्रवासाला निघालो. सकाळी धावतपळत वासोटा माथा गाठला होता. पण आता उतरताना मात्र सगळ्यांची हवा निघाली होती.

कालपासून वाडीतील गोष्टी या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ शूटिंग करणारा तात्या बागल कधीच गळपटला होता. परतीच्या प्रवासात सगळ्यांत पुढं सुनील, सुधीर आणि संदीप जाधव होते, तर सगळ्यांत मागं विक्रम ढमाले, दत्त आणि मी असा क्रम ठेवला होता. चालताना मी सारखा मागं वळून पाहत होतो. न जाणो एखाद्या बिबट्याला आवडायचो आणि घेऊन जायचा मागच्या मागं. जवळपास तासाभरात जंगलातून बाहेर पडून एका कड्याच्या टोकाशी पोचलो. आता वासोटा आमच्या डाव्या बाजूला होता आणि आम्ही वासोटा माथ्याच्या पायथ्याशी होतो.

पुढं ताई तेलणीचा सुळका आणि मागं वासोटा. इथं थोडीशी विश्रांती घेऊन पुढच्या वाटेचा अंदाज घेतला. ती वाट आता कड्याच्याच कडेकडेनं नागेश्वरकडं जात होती. थोडा जरी पाय घसरला, तर सरळ दोन हजार फूट खोल दरीमध्ये. आम्हाला काळजी होती ती रोहित यादव, विक्रम आणि निलेशची. कारण तिघांचेही पाय लटपटायला लागले होते. तिघांनाही धीर दिला आणि पुढं वाटचाल सुरू ठेवली. वाट ठिकठिकाणी कोसळली होती. मातीची घसरगुंडी तयार झाली होती. रोहितला आधार देत देत नागेश्वर-चोरवणे-वासोटा यांच्या तिठ्यावर पोचलो होतो. घड्याळात पाहिलं तर तीन वाजत आले होते. नागेश्वर आता फक्त ४०-५० फुटांवर होतं. रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या. कारण आता वाटेत चोरवणे शिवाय कुठंही पाणी नव्हतं आणि आम्हाला जवळपास आणखी दोन तास चालायचं होतं. काही जण नागेश्वर जवळील पाण्यात फ्रेश झाले आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. रात्रीच्या ट्रेकमध्ये आम्ही कसं आलो हे समजत नव्हतं. आता दिवस असल्यानं अंदाज घेतला, तर पुढं एक तुटलेलं रेलिंग दिसत होतं आणि त्यापुढं सरळसोट कडा. तिथल्या पायऱ्यासुद्धा तुटून गेल्या होत्या. फक्त भुसभुशीत सिमेंट तेवढं राहिलं होतं. मधेच एक लाकडाचा ओंडका अडकून राहिला होता आणि तोच एक आधार होता त्या घसरगुंडीवर. आधीही प्रस्तरारोहण केलेलं असल्यामुळं खाली उतरलो आणि थोडंसं पुढं गेल्यावर डाव्या हाताला ९० अंशाच्या कोनात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या आणि तिथं एक साखळी बांधलेली दिसली.

जवळपास १५०-२०० फुटाचा तो कडा होता आणि झिगझॅग पद्धतीनं त्या पायऱ्या खाली उतरत गेल्या होत्या. त्याच्या पुढं पायवाटपण दिसत होती. आता फक्त प्रश्न हा कडा उतरायचा होता आणि तोही काळोख व्हायच्या आधी. कारण उन्हाच्या तडाख्यात खूप डीहायड्रेशन झालं होतं. आम्हीही वेळ न दवडता खाली उतरण्याची तयारी केली. शिवाजी, दत्ता आणि मी प्रस्तरारोहण करीत असल्यानं सगळ्यांत पुढं शिवाजी, सुनील, गण्या आणि मागं दत्ता, सोहन, आशू, मी अशी क्रमवारी लावून खाली उतरण्यास सज्ज झालो. मधे आबा बाकीच्यांना सांभाळण्यासाठी राहिला होता. पण सुरुवातीलाच घसरगुंडी असल्यानं मी माझी मागची जागा सोडून मधे आलो. थकलेल्या तिघांना धीर देत देत शेवटी जवळपास पाऊण तासानं त्या कड्याच्या खाली उतरलो.

आता अंधार पसरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळं आम्हाला घाई करणं गरजेचं होतं. कारण अजूनही आम्ही जंगलातच होतो. जवळपास तासाभरानं एका छोट्याशा पठारावर पोचलो. तिथूनच पुढं गावकऱ्यांनी बांधून काढलेल्या पायऱ्या दिसत होत्या. याच पठारावर विश्रांती घेऊन पुढच्या वाटचालीकरता सज्ज झालो. आता आकाशात पाहिलं तर काळे ढग जमा झाले होते. थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल अशी लक्षणं दिसत होती. घड्याळात पाहिलं तर ४.४५ झाले होते. पायऱ्या दिसल्यामुळं गाव जवळ आल्यासारखं वाटत होतं आणि अंगामध्ये नवीन हुरूप आला होता. बरोबर ५ वाजता मी सगळ्यांत पहिल्यांदा पायथ्याशी आलो आणि आमचा शेवटचा गडी अमोल जाधव त्याच्या शूजचं सोल निघाल्यानं ५.३० ला खाली आला. तोपर्यंत आम्ही पायऱ्यांच्या पायथ्याला असणाऱ्या झऱ्यात थंड पाणी पिऊन तृप्त झालो होतो. अमोल आला की लगेच आम्हाला गडबडीत चोरवणे गावातील विठ्ठल मंदिरात पोचायचं होतं. वर काळंकुट्ट आभाळ, आमच्या गाड्यांसाठी एक मोठं संकट होतं. रस्त्यावर गाळाची माती असल्यानं गाड्या अडकण्याची शक्यता जास्त होती. नशिबानं आम्ही मंदिरात पावसाआधी पोचलो आणि पावसाला जी सुरुवात झाली, दोन तास तरी पाऊस काही थांबत नव्हता. जोराच्या वाऱ्यानं सगळ्या मंदिरात पाणी झालं होतं. आमच्या बॅगा कधीच भिजल्या होत्या. आम्हाला आता फक्त गाभाऱ्याचा आसरा होता. सगळ्यांचे मोबाईल डिस्चार्ज झाले होते. त्यामुळं चेष्टा मस्करीत ५ ते ७ हा दोन तासांचा वेळ कसा गेला समजलंच नाही. मंदिरात आमच्यातले कलाकार आणि सोंगाड्या जागे झाले होते. सात वाजता आम्ही पुन्हा कराडच्या दिशेनं प्रवासाला सुरुवात केली... आणि आता सगळ्यांना ओढ लागली ती पुढच्या अशाच एखाद्या नाइट ट्रेकची...

संबंधित बातम्या