माकडाची नाळ आणि कोकणकड्याचा उत्सव...

स्वप्नील खोत 
सोमवार, 22 एप्रिल 2019

ट्रेक कथा
 

सह्याद्री या नावाची आणि प्रदेशाची एक वेगळीच धुंदी आहे. एकदा तुम्ही या मायाजालात अडकलात, की मग या प्रेमळ पाशात स्वत्व हरवून एका वेगळ्याच विश्वात रमता. इथे असलेले गडकोट, घाटवाटा, नाळी, बेलाग सुळके मोहात पाडतात आणि मग आयुष्याची एक नवीन इनिंग सुरू होते.

तसे पाहता भटक्‍यांना पूर्ण सह्याद्रीच आपलासा वाटतो. त्यात हरिश्‍चंद्रगड म्हणजे भटक्‍यांची पंढरीच. तारामतीचे खुणावणारे शिखर असो, की केदारेश्वराच्या गुहेतील थंडगार पाणी, गणेश गुहेतील भव्य देखणी मूर्ती असो, की आपला लाडका जिवश्‍च कोकणकडा! हरिश्‍चंद्रगड नेहमी नव्याने प्रेमात पाडतो. एखादा गड सर्वांगाने बघायचा असेल, तर त्याच्या सर्व वाटा, घळी हाच एक उत्तम पर्याय. त्यात हरिश्‍चंद्रगड म्हणजे तर अनेक बहुढंगी वाटांनी समृद्ध असलेले सह्याद्रीतील दुर्गरत्न! तोलारखिंड, राजमार्ग, पाचनई, तटाची वाट, सादळे घाट, माकडनाळ, नळीची वाट, थिटबीची घळ, गणेशधार, वेताळधार... या त्यातल्या काही वाटा.   

प्रत्येक वाट या गडाचे वेगळ्या ढंगात दर्शन घडवणारी आहे. यातल्या बहुतांश वाटा आधी बऱ्याचवेळा झाल्या होत्या, पण माकडाची नाळ ही एक बरेच दिवस करायची राहिलेली दुखती नस होती. नळीच्या वाटेतून दरवेळी वाकुल्या दाखवायची, तर कधी कोकणकड्यावर उभे राहिल्यावर आमंत्रण द्यायची. पण संधी कशी आणि कधी येईल हे सांगता येत नाही. एकदा मंदारने फक्त विचारायचा अवकाश होता. त्यात कोकणकड्याच्या महोत्सवाचे आमंत्रणपण भास्कर कडून होतेच. मग काय सोने पे सुहागा! पण सगळे ठरविल्याप्रमाणे होतेच हा अनुभव विरळच.
 स्वप्न जेव्हा सत्यात उतरत असते ना, तेव्हा नियती सर्व प्रकारे अडवणूक करण्याचा प्रयत्न करतेच. पहाटे बैलपाड्यात पोचायचे असल्यामुळे आदल्या रात्रीच आम्ही दोघे पुण्यातून निघालो. आमचे काही सवंगडी मुंबईहून येणार होते. पण रात्री गाडीने दगा दिलाच. ती बंद पडलेली गाडी म्हणजे पुन्हा एकदा माकडनाळ एक स्वप्नच राहणार की काय, हा प्रश्न आणि त्यासोबतच असंख्य शंका कुशंकांनी मनात घर केले. सुदैवाने जुन्नरमध्ये गाडी बंद पडल्यामुळे रात्र वैऱ्याची नव्हती. गौरवला फोन करून गाडी सुरक्षित ठिकाणी लावून घरी मुक्काम केला. रात्रभर झोप काही लागली नाही. डोळ्यासमोर माकडनाळ वाकुल्या दाखवत उभी होती...

आता राज्य परिवहन मंडळावर आमची मदार होती. सकाळच्या पहिल्या लाल परीने मोरोशी आणि तिथून पुढे वाल्हिवरे गाठले. पण या सगळ्या रामरगाड्यात एव्हाना मुंबईहून आलेले आमचे मित्र खूप पुढे निघून गेले होते. ६.३० ला ट्रेक सुरू करायचा होता आणि घड्याळजी चक्क ९.३० च्या ठोक्‍यावर होते. मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्कही झाला नव्हता. त्या दिवशी पहिल्यांदा मी बैलपाड्यातून अजस्र कोकणकड्याऐवजी जरा उजवीकडे असलेल्या माकडाच्या नाळेकडे रडवेल्या चेहऱ्याने पाहत होतो.

आता दोनच पर्याय उरले होते. एक तर नेहमीच्या नळीच्या वाटेने वर जाऊन त्यांची वाट पाहणे किंवा माकडनाळ शक्‍य तेवढ्या लवकर सर करून पॅच जवळ पोचणे. कमादादाच्या मोबाईलवरून कमळूला सतत फोन करत होतो. अखेर फोन खणाणला. जमेल तेवढ्या सगळ्या शब्दांचा मारा एकाच श्वासात करत कमळूला थांबायला सांगितले. कमळूने आम्हाला सांगितले, की सगळ्यांचा पॅच चढून झाला आहे, तेव्हा तुम्ही नळीच्या वाटेने या. पण आज नळीच्या वाटेने गेलो, तर पुन्हा माकडनाळेसाठी वाट पहावी लागणार होती. जर ट्रेक करायचा असेल, तर नाश्‍ता, बसून जेवण अशा सगळ्या थांब्यांना नाकारावे लागणार होते. आम्ही येतोय एवढेच कमळुला सांगून वेळेशी शर्यत सुरू केली. तोपर्यंत बाकी मंडळींना आराम करावा लागणार होता. 

उन्हाचा तडाखा जबरदस्त होता. त्यात जवळपास पळतच पॅच गाठायचा होता. पावले वाटेने चालत होती आणि डोळे अजस्र कोकणकड्याचे लोभसवाने रुपडे मनमुराद जगत होते. नळीच्या वाटेचे वळण मागे पडले. नळीची वाट तशी थोडी कड्याच्या लांबून जाते, माकडनाळ थेट कड्याच्या कुशीतून. कोकणकडा नावाच्या गारुडाने आयुष्यात खूप काही भरभरून दिले आहे. त्याच्या ऋणातून उतराई होणे या जन्मात तरी शक्‍य नाही. अधाश्‍यागत कड्याकडे नजर लावून बघताना घटकाभर पाय थबकलेच. समोर नळीच्या वाटेत रांग लागलेली दिसत होती. गर्दीजवळ असूनही मी गर्दीपासून बरेच दूर कोकणकडा मनसोक्त जगत होतो. फार वर्दळ नसल्यामुळे अनवट असलेली पायाखालची वाट जरा जपूनच चालावी लागत होती. अनेक ठिसूळ दगड पायाखालून क्षणार्धात गायब होत होते. घशाला कोरड पडली होती. पण माकडाची ती नाळ तिच्या मोहिनीने आम्हाला वश करण्यात यशस्वी झाली होती. बराच वेळ झाला, आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता ती अनवट नाळ चढत होतो, पूर्णपणे जगत! अनेक छोटे-मोठे टप्पे पार पाडून ७० फुटांच्या ‘त्या’ टप्प्याचे दर्शन झाले. अंग अक्षरश: थरारून गेले. त्या टप्प्याला जाऊन स्पर्श केला. स्वप्नाचा स्पर्श सत्यात अनुभवणे हे शब्दांच्या पलीकडचे आहे. बऱ्याच दिवसानंतर कमळूला भेटल्याचा आनंदही होताच. दोराच्या मदतीने त्या ठिसूळ टप्प्याची चढाई संपवून वर पोचलो. थेट शेंडी सुळक्‍याच्या बाजूला. नळीच्या वाटेवरून छोटासा दिसणारा हा सुळका बऱ्याच जणांना मोहिनी घालत असतो. 

एव्हाना आमच्या मुंबईच्या चमूचा बराच आराम आणि जेवण झाले होते. उशीर झाल्यामुळे बसून जेवण करणे, तर नशिबात नव्हते, पण माकडनाळेसाठी काहीही! चालता चालताच बिस्किटे आणि चॉकलेट या जेवणासोबत वाट मोडत होतो. या वाटेची महत्त्वाची बाब अशी, की वाटेत पाणी नसल्यामुळे जे काही पाणी लागणार आहे, ते सुरुवातीलाच भरून घ्यावे लागते. त्यात एक अखंड वळसा मारून पुन्हा तारामतीच्या बाजूने मुख्य रस्ता पकडून कोकणकडा गाठायचा हा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. 

असो, आता गप्पांची मैफल सजत होती, सोबतीला रोहिदासाची घळ, तारामतीची घळ दर्शन देत होत्या. जवळच असलेल्या सिंदोळा, उधळ्या, घोण्या, भोजगिरी, वऱ्हाडी यांना दुरूनच सलाम ठोकत आमचा चमू हरिश्‍चंद्राच्या अंगाखांद्यावर यथेच्छ बागडत होता. मधेच जंगल, कड्यालगतची वाट असा रंजक खेळ खेळत जुन्नर दरवाजाच्या नेढ्याजवळ येऊन पोचलो. सूर्यास्त होत होता. मागे पसरलेला अथांग सह्यपसारा, संध्याकाळच्या त्या नीरव शांततेत भंग पाडणारे दरीखोऱ्यातून घुमत येणारे ते पक्ष्यांचे आवाज माझ्यासारख्या दररोज हिंजवडीत येणाऱ्यासाठी तर मेजवानीच. पठारावरून तारामतीच्या मागे अस्ताला जाणाऱ्या त्या भास्कराचा अलौकिक सोहळा अनुभवून आता पाय वळत होते ते आमच्या गडावरच्या भास्करला आणि सावळ्याला भेटण्यासाठी आणि कोकणकडा महोत्सव याही वर्षी जगण्यासाठी. 
 घरी पोचताच आधी नथू बाबा आणि माईला भेटलो. यांच्याविषयी मी बापड्याने वेगळे काय सांगावे... त्यांचे प्रेम त्यांच्या त्या आपुलकीने केलेल्या चौकशीत आणि त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते. कोकणकड्याच्या महोत्सवात सामील झालो. शिस्तबद्ध कार्यक्रम, लघुपट, बरेच लोक ज्याच्याबद्दल अनभिज्ञ आहेत, असे ते कांबडनृत्य. सोहळा मस्त पार पडला... आणि मग प्रथेप्रमाणे ताऱ्यांच्या अंगणात नक्षत्रांचे देणे जगत, हातात वाफाळणारा चहा घेऊन, कोकणकडा नावाच्या गारुडाच्या सान्निध्यात रंगलेल्या गप्पा...    

दिवसभर कितीही थकलेले असलात, तरी त्या गप्पा सगळे काही विसरायला लावतात. त्या लाडक्‍या कड्याशी मन मोकळे करत मी किती तरी वेळ तसाच पहुडलो. त्यानंतर येणाऱ्या त्या निद्रादेवीच्या सुखाने अधीन झालो. सकाळी पुन्हा कड्यावर थोडा वेळ घालवला. पाय निघत नव्हता, पण उशीर होईल म्हणून सकाळी लवकर नळीच्या वाटेने गड उतरायला सुरुवात केली. पुन्हा एकदा नेहमीच्या वाटेतल्या दगडांशी खेळत नाळ उतरत होतो. कालच्या माकडनाळेच रूप धडकी भरवणारे पण तरीही लोभसवाणे! नळीची वाटही तशी सगळ्यांना प्रेमात पाडणारी पण सध्या गर्दीच्या विळख्यात अडकलेली. गावात आलो, आता मात्र पोटातल्या कावळ्यांनी उच्छाद मांडला होता. शेखर सर, अतुल सर, पंढरी सर, प्रकाश सर या दिग्गजांच्या सहवासात घडलेला हा ट्रेक केवळ अफाट! मंदार, मयुरेश, इशान यांनीही यात रंगत आणली... 
 
कालची उपाशी पोटी केलेली भटकंती आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी होती. गाडी पुन्हा मोरोशीच्या दिशेने दौडत होती. कड्याचा साश्रुनयनाने निरोप घेत होतो. कड्याचा निरोप घेऊन निघालो खरे, पण मन मात्र अजूनही गडाच्या अंगाखांद्यावर, मल्हार सह्याद्रीच्या कुशीत निरागसपणे बागडत होते. सह्याद्रीच्या निखळ, निरपेक्ष प्रेमाच्या सोबतीने.

टीप : माकडनाळ ही तांत्रिक चढाई असून पूर्वानुभवाशिवाय करणे घातक ठरेल. याकरिता प्रस्तरारोहणाचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या