जीवस्य जीवधन...

स्वप्नील खोत
मंगळवार, 11 जून 2019

ट्रेक कथा
 

प्रिय जीवधन,

हे पत्र लिहिण्यास कारण, की काही व्यक्ती या आपल्या मनात असं काही घर करतात, की आयुष्यात अनेक वळणांवर आपण त्यांना वाट वाकडी करून भेटतो, तसंच काहीसं गडकोटांच्या बाबतीतही असतं... त्यात माझ्या यादीत तुझं नाव अग्रणीच आहे! गेली कित्येक वर्षं आपण असंख्य कडू-गोड आठवणी एकत्र अनुभवल्या आहेत, त्यातल्या केवळ एकाच प्रसंगाचं वर्णन करणं अशक्‍यच.

आज बऱ्याच जणांना ‘जीवस्य जीवधन’ या आपल्या लाडक्‍या शब्दांचा प्रयोग करताना अभिमानानं पाहतोय. त्याच शब्दाच्या उगमकथेची मेजवानी या माझ्या सह्यमित्रांसोबत वाटून खाण्यासाठी हा पत्राचा घाट! 

तशी आपली पहिली भेट ही छायाचित्रांतूनच झाली. आजही आठवतोय तो फोटो, जो कदाचित नानाच्या अंगठ्यावरून घेतला असावा. हिरवळीच्या गालिच्यावरून सरकणाऱ्या सकाळच्या कोवळ्या उन्हाचा मुजरा स्वीकारत दिमाखात उभा असलेला तू आणि तुझे कातळकोरीव चमकदार कडे, समोर पसरलेली धुक्‍याची दुलई, पांढऱ्याशुभ्र कापसाची भली मोठी चादर पसरावी तशी. मागं डोकं उंचावून हा सगळा सोहळा पाहणारे धाकोबा आणि दुर्गुबाई... आणि या सगळ्यांवर कळस म्हणजे आपल्या स्वर्गीय रूपानं जगाला भाळवणारी वानरलिंगी... ती पाहताच बाला, कलीजा खलास झाला. खरंच त्या पहिल्या फोटोतच तुझं ते असीम सौंदर्य कित्येक तास न्याहाळत बसलो होतो. तो छायाचित्रकार कोण होता माहीत नाही, पण त्याचे मानावे तेवढे आभार कमीच. मग नंतर जिथं जिथं तुझा फोटो दिसेल त्या फोटोत तुझं सौंदर्य डोळे दीपवून पाहू लागलो. 

तुझं पहिलं दर्शन झालं ते २०१२ ला, पण तेही कोसो दुरूनच. रतनगड ते हरिश्‍चंद्र करताना कात्राबाईच्या खिंडीलगत लांबवर तुझं दर्शन झालं, तेव्हा पाय जागीच खिळले होते. एवढ्या अंतरावरूनही त्या अस्मानी सौंदर्यानं डोळे दीपवले. पण जेव्हा पहिल्यांदा तुझ्या भेटीसाठी गाडी पुण्याहून दौडवली, तेव्हा जो आनंद झाला होता तो काय वर्णावा. गाडीनं जुन्नर सोडलं, तेव्हाची ती आतुरता आजही तेवढीच अबाधित आहे. ती नाणेघाटाचीही पहिलीच भेट होती. समोरच्या नानाच्या अंगठ्याकडं पहावं, की डावीकडच्या रूपवंताकडं! डोळ्यांची आणि मनाची चांगलीच त्रेधा तिरपीट उडालेली. पण तेव्हाही तूच जिंकलास. भारदस्त जीवधनचं रूप पाहता लोचनी अंगावर आलेला तो शहारा आजही आठवतो. सुभाष दादांकडं चहा घेऊन तुझ्या वाटेला निघालो. जितका जवळ येत होतो, तेवढाच तुझ्या कातळ कड्यांच्या मोहात पडत होतो. एखादा कीटक सुंदर विणलेल्या कोळ्याच्या जाळ्यात अडकावा तसा. फरक फक्त एवढाच, की इथं त्या जाळ्यात अडकण्यासाठीच आटापिटा केला होता. तुझ्या भोवतालचं जंगलही कमाल आहे बरं का. कल्याण दरवाजाची अवघड वाटणारी ती चढाई हातापायांनी लीलया पार केली आणि त्यानंतरचा माझ्या महान वास्तुविशारदांच्या हातानं घडलेला, आ वासण्यास भाग पाडणारा तो महान कल्याण दरवाजा बघून मी नकळत नतमस्तक झालो. त्या दरवाजावर कोरलेले चंद्रसूर्य तुझ्या यावद्‌चंद्रदिवाकरौ कीर्तीचं जणू निशाणच. तेव्हा मी त्या भक्कम दरवाजाला नव्हे, तर प्रत्यक्ष स्वप्नाला स्पर्श करत होतो. एखाद्या अल्लड मुलाप्रमाणं तुझ्या अंगाखांद्यावर मनसोक्त बागडलो. अचाट होऊन ते दुर्गावशेष पाहत, त्या दिवशी जीवधन नावाच्या प्रकरणामुळं सह्याद्रीच्या आणखी जवळ गेलो.

त्यानंतर असंख्यवेळा माझ्या वाऱ्या झाल्या. तुझे वारकरीच आम्ही! कधी मित्रांसोबत, तर कधी एकांतात. प्रत्येक वेळी मी मात्र भरपूर शिकत होतो. जीवधन नावाचा विषय फक्त बघत नव्हतो, तर जगत होतो. 

नंतर आमची जुन्नरची टोळी जमली आणि आमचं जुन्नरप्रेमी मित्रमंडळ नियमितपणे जीवधन वारीसाठी सज्ज झालं. माझ्या आयुष्यातील पहिलावहिला स्टार ट्रेकचा नायक तू नाही, तर कोण असणार होतं ना! त्या रात्री फक्त ताऱ्यांचं वलयच नव्हे, तर तुझ्या डोक्‍यावर अंतराळातली ती आकाशगंगाही नव्यानं उमगली. त्या नभोमंडळाच्या छत्रछायेत जीवधन नामक सम्राट फार खुलून दिसला होता. अक्षरशः उजळून निघालेला. त्यानंतरची भेट तर न भूतो न भविष्यती होती. पावसाळ्याच्या सुरुवातीचे ढग जमू लागले होते. नाणेघाटाच्या खोऱ्यात कापसाच्या शेतातले ते ढग, त्यात दिसलेले इंद्रवज्र आणि या सर्वांत डोकं वर काढून टकमक पाहणारा जीवधन. संध्याकाळ झाल्यावर आपली मेघसेना घेऊन प्रत्यक्ष वरुणराजा त्या परिसराच्या भेटीला आलेला, तेव्हा काळोख दाटून आला होता. जयद्रथाच्या वेळी जसा तो सूर्य नारायण झाकोळला होता ना अगदी तसाच. आपल्या अफाट सैन्यानिशी आलेला वरुणराजा आता गर्जना करू लागला होता... आणि क्षणार्धात सहस्त्रधारांचा वर्षाव त्या परिसराला न्हाऊ घालू लागला. त्या पर्जन्यधारेत तुझे कातळकडे स्वच्छ धुऊन निघाले. अगदी चकचकीत. निसर्गानंच जणू येणाऱ्या पावसाळ्याच्या तयारीनिमित्त तुला लख्ख चमकवलं होतं. मी धुंद होऊन पावसाची फिकीर न करता ते निसर्गचित्र वेड्यागत अनुभवत होतो. वय, हुद्दा सगळं कसं विसरून जगायचं, हे त्या दिवशी तुझ्या सान्निध्यात शिकलो.

नंतर विश्वाला तुझ्या दर्शनासाठी घेऊन आलो, तेव्हा तिलाही तू आपुलकीनं दर्शन घडवलंस. तुला आठवतं, तुझं हे रूपडं भर पावसात पाहायची झालेली थरारक स्वप्नपूर्ती! त्या दिवशी जुन्नर दरवाजानं चढाई केली. धुक्‍याच्या चादरीत लपेटून तू आमच्या भेटीला आलास. पायाखालच्या वाटेखेरीज काहीही दिसायची शक्‍यता नव्हती. घसरत, धडपडत आम्ही जुन्नर दरवाजात पोचलो. वाऱ्याचा वेग धडकी भरवणारा होता. कानात गुंजणारा तो सह्यवारा आजही जसाच्या तसा आठवतो. नंतर वाट सापडत नव्हती खरी, तेव्हा अगदी क्षणासाठी धुक्‍याची चादर सरली आणि वाट दिसली. पण एकदाच पुन्हा तू धुक्‍यात गुडूप. अंदाज घेत घेत शेवटी एकदाचं पोचलो कल्याण दरवाजात. पायाखालून पाण्याचा लोट वाहत होता. नक्कीच थोडं वेडं साहस होतं ते. त्यामुळं कल्याण दरवाजा उतरताना अक्षरश: नानी याद आ गयी थी. पण तरीही त्या वेडेपणात तुझ्याविषयी आम्हा सर्वांचा असलेला जिव्हाळा होता. त्या जलधारांत न्हाऊन गडउतार होण्याची मजा काही औरच होती. प्रसन्न मनानं आम्ही घाटघरला जाणाऱ्या पदरातल्या वाटेच्या शोधात निघालो. वाढता पाऊस आणि गच्च धुकं हा पेपर तू आमच्यासाठी निवडलास आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवणाराही तूच आमचा सखासोबती.

असाच सुखद अनुभव देणारी ती पौर्णिमा. त्या शीतल चंद्रप्रकाशात मंद वारा, डिसेंबरची ती हाडं गोठवणारी थंडी. त्या रात्री खरंच टेंटमध्ये जायला मन तयारच नव्हतं. पहिल्यांदाच रात्रीचा जीवधन आम्ही जगत होतो. ती शांतता आणि आपल्या रंगलेल्या गप्पा. रिचार्ज व्हायला एक नवीन जागा होती. रात्री कसाबसा केलेला चहा म्हणजे सोने पे सुहागा. अखंड रात्र जणू जिवाईचा गोंधळ मांडण्यासाठी जागरणं केलेली. जीवधन नावाच्या पुस्तकात आणखी एक सुंदर धडा जोडला गेला.

तुझ्याविषयीचं कुतूहल हे खरंच कधी संपणारं नाही. म्हणून तर नुकतीच दिलेली तुझ्या त्या दडलेल्या नेढ्याची नवीन कहाणी समोर आली. त्या नेढ्याच्या रूपानं तुझी ही बाजूही उलगडली. इतका सारा आश्‍चर्यचकित करणारा पसारा घेऊन आम्हा भटक्‍यांची मजा पाहणारा तू सह्यसोबती.

जेव्हा नाणेघाटाची वर्दळ चालू असेल, तेव्हा तुझा डामडौल काय असेल ना. दिमाखात सर्वांवर तीक्ष्ण नजर रोखून पाहत असशील. नक्कीच तेव्हाही या भारदस्त रूपावर भाळलेले अनेक जण असतील. या सगळ्याचा विचार करत मी जेव्हा तुझ्या त्या पश्‍चिम कड्यावर पहुडलेला असतो ना, तेव्हा अंगावर खरंच शहारे येतात... आणि मी नकळत इतिहासाच्या त्या अज्ञात पानांमध्ये हरवून जातो.

तुझ्या याच परिसरात सापांचं जग गौरव आणि आकाशच्या मदतीनं माझ्यासाठी उलगडलं. नाना प्रकारचे साप, त्यांचं ते चकित करणारं रूप तुझ्या सोबतीत बघायला मिळालं. फक्त सापच नव्हे, तर सांबर, शेकरू हे सवंगडीही तुझ्या अंगाखांद्यावर स्वैर भटकताना पाहिलेत.

तुझा सोबती, खडा पारशी अर्थात आमच्या सर्वांचं लाडकं प्रकरण वानरलिंगी! तुझ्या लोभस रूपात चार चांद लावण्यात या वानरलिंगीचा सिंहाचा वाटा आहे. जीवधनवरून दिसणारा हा सुळका थेट मनात घर करतो. याच सुळक्‍याच्या पायथ्याशी शरणचा झालेला अपघात मात्र या सगळ्या सुंदर आठवणींना काळा डाग लावतो रे.

सूर्योदय, सूर्यास्त, ऊन, वारा, पाऊस, ढग हे निसर्गचक्राचे घटक असंख्य वेळा आपण एकत्र जगलोय. तुला इतर डोंगरांवरून पाहण्याची मजाही काही भन्नाटच. मग तो अनुभव धाकोबाहून वेगळ्या रूपात पाहणं असो किंवा वऱ्हाडी, देवदौंड्यावरून पाठमोरं पाहताना असो किंवा अगदी रतनगडाच्या नेढ्याजवळून लांबवर पाहताना असो. तुझ्या बहुढंगी दर्शनानं मन तृप्त होतच नाही. 

तुझे अवशेषही तितकेच खास. जिवाईचं ते शिल्प, कोरलेली गजांतलक्ष्मी, अनेक कप्प्यांचं कोठारं, तृषा शांत करणारी अवीट गोडीची पाण्याची टाकी सगळं कसं झपाटून लावणारं. कल्याण दरवाजातून दिसणारा तो नानाचा अंगठा कितीही वेळ पाहत राहिलं, तरी कमीच! इथल्या प्रत्येक दगडाशी एक वेगळंच नातं तयार झालंय. इथला प्रत्येक घटक हा मला आपलासा वाटतोय.

इथून पुढंही तुझ्या वारीला मी मुकणार नाही. या मैत्रीच्या पुस्तकात नवनवीन अनुभवांचे धडे जोडणार आहेच. नेहमीप्रमाणं कल्याण दरवाजातून नानाच्या अंगठ्याला तासनतास न्याहाळत बसणार आहे. जुन्नर दरवाजातून दौंड्याकडं टक लावून पाहणार आहे. कोठाराच्या त्या मोहजालात तुझ्या गौरवशाली इतिहासाच्या स्वप्नात रमणार आहे. धाकोबाला वाकुल्या दाखवत दाऱ्या घाटाकडं आ वासून बघत बसणार आहे... आणि जेव्हा कधी आयुष्यात धीर खचेल, तेव्हा त्या टोकावरून वानरलिंगी पाहत पश्‍चिमेस मावळणाऱ्या दिवाकरास पाहत नवीन ऊर्मी जागवणार आहे. मल्हार सह्याद्रीच्या राकट सान्निध्यात आपली ही मैत्री अशीच उत्तरोत्तर वाढत राहो, हीच जिवाई चरणी प्रार्थना...

कारण तू आहेसच जिवाभावाचा. तुझ्या राकट बाहूंनी नेहमी हसत स्वागत करणारा. जगायला शिकवणारा सह्यसोबती. आमचा सर्वांचा जीवन धन... जीवस्य जीवधन!
- सह्यप्रेमात पडलेला एक भटका

टीप : पावसाळ्यात जीवधनचा कातळटप्पा चढताना काळजी घ्यावी.

संबंधित बातम्या