सह्याद्रीचा मुकुट... अलंग-मदन-कुलंग 

स्वप्नील खोत
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

ट्रेककथा
 

सह्याद्री, कित्येक ज्ञातअज्ञात वीरांच्या पराक्रमाची ही भूमी, इथले तिच्या अंगाखांद्यावरचे सुपुत्र असलेले गडकोट अवघ्या विश्वावर आपली मोहिनी पसरवून आहेत. इतिहासाची काही हरवलेली पाने या किल्ल्यांच्या रूपानं आम्ही भटके जगत असतो. या गडांचं सौंदर्य प्रत्येक ऋतूमध्ये काही औरच असतं. सह्याद्रीच्या या साजामधला एक अनमोल दागिना म्हणावं असं एक दुर्ग त्रिकूट म्हणजे ‘अलंग, मदन आणि कुलंग.’ सह्यप्रेमींमध्ये AMK म्हणून प्रसिद्ध असलेलं हे त्रिकूट तुमच्यातल्या साहसवीराला जागं करतं.

हरिश्चंद्रगड जर ट्रेकर्सची पंढरी असेल, तर हे त्रिदेव म्हणजे अर्थात AMK नक्कीच विश्वेश्वर म्हणावं लागेल. सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखराचे हे सख्खे शेजारी. चढाई नक्कीच कस पाडणारी आहे, पण एकदा सर केलं की थकवा क्षणार्धात नाहीसा करणारं हे त्रिकूट, ब्रिग्सनं पायऱ्या उद्‌्‌ध्वस्त केल्या तरीही तेवढ्याच दिमाखात उभं आहे. ऐतिहासिक तोरण आणि चढ्या घाटमार्गावरचे त्रयी आपल्याला कधी आपलंस करतात तेच कळत नाही. तांत्रिक चढाई ही यातल्या अलंग आणि मदनची खासियत. पण कुलंगही काही कमी नाही बरं का.

पाच वर्षांपूर्वी कुलंग पाहिला होता, तेव्हाच याच्या प्रेमात पडलो होतो. गर्दी टाळावी या हेतूनं बुधवारी रात्रीच आम्ही निघालो. आता पुढचे तीन दिवस मी माझ्या या सह्यसवंगड्यांसोबत मनसोक्त जगणार होतो. आम्ही पोचलो तेव्हा उडधवणे गाव सुखात निद्रिस्त पहुडलं होतं. तसं पाहता आंबेवाडीहून येणारी वाट ही त्यातल्या त्यात कमी अंतराची. पण मला घाटघर किंवा उडधवण्याची वाट फार आवडते. जेव्हा तुम्ही दमूनभागून गडावर पोचता ना, तेव्हा तो गड तुमच्यासमोर आणखी खुलतो.

सकाळी आन्हिकं उरकून निघालो, तेव्हा अलंग पाठमोरा होता. पठारावर पोचताच समोर हे त्रिदल ठाण मांडून बसलं होतं. आमची नजरानजर झाली. त्या एका नजरेतच कोणीही घायाळ होईल. डोळे त्रिकुटाकडं आणि पाय आपसूकच अलंगच्या दिशेनं... शिडीचा टप्पा पार पाडून जेव्हा गणेश दरवाजा आला, तेव्हा डोळे हलकेच पाणावले. स्वप्नाचा स्पर्श हातानं अनुभवत होतो. दरवाजा पूर्णपणे बंद आहे, पण त्या पहारेकऱ्यांचा धाक नक्कीच अनुभवता येतो. अलंग या नावाचा अर्थ इथं खऱ्या अर्थानं उमगतो. मजल दरमजल करत गुहेत आलो. जेवणावर यथेच्छ ताव मारून मदनच्या नेत्रसुखद दर्शनासाठी गेलो. मदन नावाप्रमाणंच मादक पण तेवढाच बलवान. अलंगवरून दिसणाऱ्या त्या मदनच्या पायऱ्या लाजवाब...! राजवाडा आणि अकरा टाक्यांचा तो सुरेख नजारा बघताना मी अलंगच्या आणखी प्रेमात पडत होतो. अलंगचा राजवाडा त्याच्या विस्तीर्ण राजबिंड्या रूपात भर घालतो. आता भास्करानंही दिवसाचा निरोप घेण्यास सुरुवात केली होती. आज दिवसभर तोही पूर्ण प्रखरपणे या प्रवासात सामील झाला होता. मंद वारा त्या सायंप्रकाशात एक गूढ निर्माण करत होता. किती तरी वेळ त्या राजवाड्याच्या भिंतीवर बसून विचारांच्या चक्रात आम्ही हरवून गेलो होतो. अलंगच्या सुवर्णकाळात कितीतरी घडामोडी त्यानं अनुभवल्या असतील ना, तेव्हाचा सह्याद्री आपल्या या वीर पुत्राशी काय बरं गप्पा मारत असावा? दूरवर असलेल्या या गावांशी याचं नात किती सुरेख असेल ना. विचारांच्या या काहुरात गुहेकडं निघालो, जेवणावर यथेच्छ ताव मारायला. 

सह्याद्रीच्या या कुशीत तिच्या असंख्य लेकरांची नेहमीच वर्दळ असते. त्या रात्री जेवण झाल्यावर लक्षात आलं, की एक फुरसही आमच्या स्वागताला आलंय. शेवटी तो या गडावरील एक मूलनिवासी. आम्ही पाहुणे म्हणून आलो होतो. त्यानं एका तुटलेल्या कपारीत आपला तळ ठोकला.

दुसरा दिवस होता तो मदमस्त मदनची अनुभूती घ्यायचा. पण अलंगच्या धडकी भरवणाऱ्या कोरीव पायऱ्या हसतमुखानं सामोऱ्या आल्या. त्या पायऱ्यांलगत असलेला तुटका कडा साहसाला आव्हान देणाराच. दोराच्या साहाय्यानं अलंग उतार झालो. अलंगचा निरोप घेतला. गोपाळदा असल्यामुळं तांत्रिक अडथळे खूपच सहज पार करत आणि मुख्य म्हणजे शिकत पार पडलं. या कातळावरचा तो खरंच बादशहा. मदनच्या खिंडीच्या मार्गाची एक वेगळीच जादू आहे. कपारीमध्ये पोटात दडलेली ही वाट अद्‌्‌भुत आहे. खिंडीत अनावश्यक सामान ठेवून मदनची खडतर वाट धरली. ४०-५० फुटांचा आणि मागं सरळ कोसळणारा सह्यकडा. बेस तयार करून मदनवर पोचलो. या छोट्याशा टुमदार गडाच्या पायऱ्या फारच अप्रतिम आहेत. मदनची गुहा पार करून मदनच्या सुंदर नेढ्याच्या अगदी वर पोचलो. इथं आपली नजर खिळते ती अवाढव्य पसरलेल्या अलंगवर. मदनवरून दिसणारा अलंग तोंडाचा आ वासत पाहावा लागतो, तर मधेच नजर खिळते ती आपली दुसरी बाजू दाखवणाऱ्या कुलंगवर. नक्की या पसाऱ्यात नजर कुठं ठेवायची तेच कळत नाही. सह्याद्रीच्या मायावी बाहुपाशात मी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. मदनवरून अल्काब देतानाही नस अन् नस सळसळते. त्यात उमटणारा तो प्रतिध्वनी म्हणजे जणू सह्याद्रीच आपला आवाज मिसळवतो. त्या मेजवानीचा आस्वाद घेत काही क्षण मनसोक्त घालवले. वेळ भराभर निघून जात होता, म्हणून पाय चालू लागले. पण मन मात्र तिथून हालत नव्हतं... तसूभरही. मदनवरून खाली उतरलो. उशीर तर झालाच होता, त्यामुळं कुलंगला पोचायला रात्र होणार हे तर नक्कीच होतं.

खिंडीतून जाताना अंगावर शहारे येतात. कुलंग आता हळूहळू त्याची अवाढव्यता दाखवत होता. कुलंग हे प्रकरण अलंग आणि मदन केल्यानंतर तांत्रिक चढाई नसल्यानं जाण्यापूर्वी अगदीच सोप्प वाटत असतं. पण खरी कसोटी तर कुलंग बघतो. अगदी पोचेपर्यंत तो आपली मजा पाहत उभा असतो. एकदा का पायऱ्या आल्या, की मग कुलंग काय प्रकार आहे ते कळतं. त्या कोरीव पायऱ्या ज्यांनी बांधल्या, त्यांना खरोखरंच साष्टांग दंडवत घालत गुहेत पोचलो. 

रात्री आकाशात असंख्य ताऱ्यांची रास मांडली होती. त्या लाक्षागृहाच्या छतानं मोहिनी घातली होती. ही रात्र होती सिंह राशीतल्या उल्कावर्षावाची... मग काय मी आणि अमोघ लागलो कॅमेरा घेऊन कामाला. आकाशात अब्जावधी ताऱ्यांची मांडलेली ती रास, अधूनमधून झेपावणाऱ्या उल्का, त्या अंधारातही आपली छटा दाखवत उभं ठाकलेलं ते रती-महारती कळसूबाई, अलंग, मदन आणि कुलंग त्या तारांगणाच्या स्वर्गमंडपात न्हाऊन निघालेला रांगडा सह्याद्री. या सर्वांत मी धुंदमग्न झालो होतो. रात्री किती तरी वेळ त्या नजाऱ्यात घालवला... आणि कधी निद्रादेवीच्या अधीन झालो कळलंच नाही. पाठीशी सह्याद्रीचं अंथरूण आणि ओढायला सहस्रतारकांची रजई, आणखी काय हवंय आयुष्यात.

सकाळी उठलो, तेव्हा जवळचा मोरधन आळोखेपिळोखे देत होता. कुलंगवरची सकाळ हे एक सुंदर प्रकरण आहे. आज जरा निवांतच होतो आम्ही. मनमुरादपणे गडावर बागडलो. कुलंगचा राजवाडा, धरण, टाक्यांचं यथेच्छ दर्शन घेऊन पुन्हा आडवाटेची कास धरली. त्या पायऱ्या नेहमीच खुणावतात. आम्ही घाटघरच्या वाटेला लागलो. घर सोडून येताना ज्या भावना असतात तसंच काहीसं झालं होतं. आता तर पाठीवरच्या बॅगच वजन जाणवू लागलं होतं. दूरवर रतनगड, आजोबा, कात्राबाई, करांधा, घनचक्कर, गवळदेव, शिपनूर आमच्याबरोबर मावळतीला जाणाऱ्या सूर्यनारायणाचे दर्शन घेत होते. दिवस अस्ताला जात होता. खरं तर पुण्याला परत जायची अजिबात इच्छा होत नव्हती. आता पुन्हा तो रहाटगाडा हाकायचा. मन मारून सगळ्या हालचाली सुरू होत्या. या गडांनी महाराष्ट्र नावाच्या महाकाव्यात आपली एक वेगळीच छाप सोडली आहे. आपल्या अस्मितेची ही प्रतीकंच आहेत. 

घाटघरला पोचलो. काही क्षण पुन्हा एकदा त्या दुर्ग त्रयींकडं पाहत बसलो. संधीछायेची एक सुंदर छटा त्यांच्या मागून पसरली होती. पुण्याकडं जड अंतःकरणानं निघालो. मन मात्र मागंच अडकलं होतं. अलंग, मदन आणि कुलंग नावाच्या महारथींबरोबर त्या मल्हार सह्याद्रीच्या प्रेमळ कुशीत..

संबंधित बातम्या