लेखक : डॉ. बाळ फोंडके
मेन्डेलच्या हयातीत त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष का झालं आणि तेच म्हणणं आता पस्तीस वर्षांनंतर का मानलं गेलं याचं उत्तर, यावेळी एकट्या दुकट्यानं नाही तर तिघातिघांनी तेच ओरडून सांगितलं होतं म्हणून, हे नाही. तर मधल्या काळात पेशी हा सजीवांचा, वनस्पतीही त्यात आल्या, मूलभूत घटक आहे याचा शोध लागला होता म्हणून त्याला मान्यता मिळाली.
एकोणिसाव्या शतकाचं भरतवाक्य म्हणणारं अखेरचं वर्ष १९०० उजाडलं आणि गेली तब्बल छत्तीस वर्षं अंधारात खितपत पडलेलं मेन्डेलचं मूलगामी संशोधन उजेडात आलं. त्याचं श्रेय युरोपमधील तीन वेगवेगळ्या विद्यापीठांत काम करणाऱ्या तीन वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी तीन वेगवेगळ्या सजीवांवर केलेल्या संशोधनाला द्यावं लागेल. एकमेकांपासून अलग असून स्वतंत्रपणे त्या तिघांनी मेन्डेलच्या संशोधनाची पुष्टी केली होती. ते होते डच वैज्ञानिक ह्युगो द व्ह्राइस, जर्मन वैज्ञानिक कार्ल कॉरेन्स आणि ऑस्ट्रियन वैज्ञानिक एरिक त्शेरमाक!
मेन्डेलनं जरी जीनची, जनुकांची संकल्पना मांडली होती तरी ती बऱ्याच वैज्ञानिकांच्या गळी उतरली नव्हती. कारण ती अमूर्त होती. हे जीन खरोखरीच अस्तित्वात असल्याची कोणतीच खूण त्यावेळी मिळाली नव्हती. पण त्याच्या निधनानंतरच्या काळात जसा प्रत्येक निर्जीव पदार्थ अणूंपासून तयार झालेला असतो तसा प्रत्येक सजीव पेशींपासून तयार झालेला असतो, या सिद्धांताला व्यापक मान्यता मिळाली होती. त्याचे पुरावेही आढळले होते.
त्यात रॉबर्ट हूकनं सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं अनेक सजीवांच्या, जिवंत तसंच मृत, अवयवांच्या केलेल्या निरीक्षणाची मदत मिळाली. त्याला असं दिसून आलं की जिवंत अवयवांच्या पेशी कोणत्या तरी द्रव पदार्थानं भरलेल्या असतात. उलट मृत पेशींमधील हे द्रव निघून गेलेलं असतं आणि त्याची जागा हवेनं घेतलेली असते. त्यानं पहिल्या प्रथम ज्या सजीवाचं निरीक्षण केलं होतं आणि त्यावरून पेशींची संकल्पना मांडली होती ते बूच मृत होतं. त्यामुळंच तर हवेनं भरलेल्या त्याच्या पेशींमुळं ते हलकं होऊन पाण्यावर तरंगत होतं.
त्या सुमारासच पेशीतील निरनिराळ्या घटकांना रंगवणाऱ्या रंगद्रव्यांचाही शोध लागला होता. त्यामुळं पेशींच्या अंतरंगाचं तपशीलवार निरीक्षण करणं शक्य झालं होतं. त्यातूनच मग पेशीची व्याख्या करणंही सोपं झालं होतं. कारण सर्वच पेशींच्या अंतरंगात ठळकपणे रंगलेला मध्यवर्ती घटक असल्याचं स्पष्ट झालं होतं. यालाच पेशीचं केंद्रक, न्युक्लियस, म्हटलं गेलं. ते जिथं आहे ती पेशी. या केंद्रकाचं सर्वसाधारण स्वरूप एकसारखं असलं, तरी निरनिराळ्या पेशींच्या केंद्रकांची स्वतंत्र वैशिष्ट्यंही होती. पेशींचं विभाजन होताना या केंद्रकाचंही दुपटीकरण होऊन मग ते कन्यापेशींना वारशाच्या रूपात मिळतं हेही दिसून आलं होतं. पेशी अस्तित्वात असतात, त्यांचं विभाजन होऊन त्यांच्यापासून वारसा मिळालेल्या कन्यापेशी जन्म घेतात हे दिसून आल्यामुळं जीन, जनुकं, ही केवळ मेन्डेलची कल्पना नसून तेही खरोखरीच अस्तित्वात असल्याचे संकेत मिळाले होते.
प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक असतं या नियमाला एक सन्माननीय अपवाद आहे. आपल्या रक्तातल्या ऑक्सिजन वायू वाहून नेणाऱ्या तांबड्या पेशी, रेड ब्लड सेल. त्यांच्यामध्ये हेमोग्लोबिन हे रसायन उपस्थित असलं तरी त्या केंद्रकविरहित असतात.
जनुकं काल्पनिक नसून सत्य स्वरूपात आहेत, हे सिद्ध करणारा ह्युगो द व्ह्राइस यानं फुलझाडांच्या रोपांवर संशोधन केलं होतं. कार्ल कॉरेन्स यानं मका आणि वाटाण्यांच्या रोपांची कास धरली होती, तर एरिक त्शेरमाकनं मेन्डेलसारखं वाटाण्यांवरच आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांच्या संशोधनकार्याची एकमेकांना माहिती नव्हती. तिघंही स्वतंत्रपणे आपापली वाट चोखाळत होते. पण त्यांनी केलेली निरीक्षणं आणि काढलेले निष्कर्ष सारखेच होते.
संशोधनावर आधारित शोधनिबंधांची रचना काटेकोर असते. बंदिस्त चौकटीतच ते सादर करावे लागतात. त्यांचे चार भाग असतात. पहिला भाग प्रास्ताविकाचा. त्यात कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे प्रयोग केले जात आहेत याचं निवेदन करावं लागतं. तसंच या पूर्वी अशाच प्रकारचं संशोधन कोणी केलं होतं आणि त्यांचे निष्कर्ष काय होते याचाही आढावा घ्यावा लागतो. तो आढावा घेतानाच त्यांना साक्षात्कार झाला की अरेच्च्या यापूर्वी मेन्डेलमहाशयांनी तर हेच सांगितलं होतं. त्यांचं संशोधन पथदर्शी होतं. आपण त्याचीच पुष्टी करत आहोत. त्यामुळं त्या सर्वांनीच प्रामाणिकपणे मेन्डेल हे पूर्वसूरी असल्याचं बिनशर्त मान्य करत त्यांनाच जनुकशास्त्राचं पितृत्व मोकळेपणे बहाल केलं. जरी त्या सर्वांच्या संशोधनानं मेन्डेलच्या पुढची पायरी गाठली होती तरी मेन्डेलचं ऋण मान्य करण्यात त्यांनी कोणतंही अनमान केला नाही.
त्या पायी अर्थात मग मेन्डेलनं आनुवंशिक वारशाचे सांगितलेले नियमही सर्वमान्य होण्यास मदत झाली. मृत्युपश्चात का होईना, पण अखेर मेन्डेलला त्याचं उचित स्थान मिळालं. माझ्याशी सहमत होणारा कोणी ना कोणी शास्त्रज्ञ भविष्यात येईल आणि माझ्या श्रमांचं चीज होईल हा त्याचा आशावाद सफल झाला होता.
मेन्डेलच्या हयातीत त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष का झालं आणि तेच म्हणणं आता पस्तीस वर्षांनंतर का मानलं गेलं याचं उत्तर, यावेळी एकट्या दुकट्यानं नाही तर तिघातिघांनी तेच ओरडून सांगितलं होतं म्हणून, हे नाही. तर मधल्या काळात पेशी हा सजीवांचा, वनस्पतीही त्यात आल्या, मूलभूत घटक आहे, याचा शोध लागला होता म्हणून त्याला मान्यता मिळाली. या पेशींचं सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं का होईना पण दर्शन मिळत होतं. त्यामुळं ज्या जनुकांचा विचार मेन्डेलनं मांडला होता, ती जनुकंही केवळ सांगोवांगीच्या कथा न राहता प्रत्यक्ष अस्तित्त्वात असल्याची खूण मिळाली होती.
या पेशींच्या अंतरंगात डोकावून पाहिल्यावर त्यांच्यात निरनिराळी अंगं असल्याचंही लक्षात आलं होतं. त्याच बरोबर आणखी एका महत्त्वाच्या घटनेची ओळख पटली होती. निसर्गानं या अधिक उत्क्रांत सजीवांची पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी मीलनाचा महामार्ग धरला होता. नर व मादी यांच्या पेशींच्या मीलनातून नवीन पिढी जन्माला घालणाऱ्या पिंडपेशीची निर्मिती होत होती. पण या नांदी म्हणणाऱ्या पहिल्यावहिल्या पेशीची निर्मिती मीलनातून झाली असली, तरी तिची पुढची वाढ होण्यासाठी परत विभाजनाच्या मळवाटेवरूनच वाटचाल करावी लागत होती.
तेच विभाजन कसं होतं याचा धांडोळा वॉल्टर फ्लेमिंग यानं परत एकदा त्याच सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं घेतला. त्या विभाजनाचे काही टप्पे असल्याचंही त्याला दिसून आलं. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये विभाजनाची पूर्वतयारी होत होती. कारण पेशीच्या सर्वच उपांगांचा वारसा कन्यापेशींना द्यायचा होता. त्यामुळं त्या उपांगांचं दुपटीकरण होणं आवश्यक होतं. त्याचाच मागोवा घेताना फ्लेमिंगला त्या पेशीच्या केंद्रकात असलेल्या धाग्यासारख्या घटकांचं दर्शन घडलं. हे धागेही दुप्पट होऊन त्यांचं कन्यापेशींना बरोबरीचं दान मिळत असल्याचं दिसलं होतं. हे धागे आनुवंशिकतेचा वारसा प्रदान करण्यात कळीची भूमिका बजावत असणार असा अंदाज त्यानं व्यक्त केला होता. सजीवांच्या गुणधर्मांचं इंगित त्या धाग्यांमध्येच दडलेलं असावं असा त्याचा कयास होता. म्हणूनच आयुष्याच्या या धाग्यांचं त्यानं गुणसूत्रं, क्रोमोझोम, असं बारसंही करून टाकलं होतं.