लेखक : अरविंद परांजपे
परिसंकल्पनांच्या पलीकडे जाऊन विश्व समजून घेण्याचा प्रयत्न प्रथम सुरू केला तो ग्रीक लोकांनी. सूर्य, चंद्र, तारे किंवा ग्रह यांच्या गती आपण गणिताच्या माध्यमातून समजू शकतो का? या प्रश्नाकडे त्यांनी आपले संशोधन केंद्रित करण्यास सुरुवात केली.
इसवी सन पूर्व तिसऱ्या सहस्राब्दीपर्यंत आपल्या पूर्वजांना सूर्य आणि चंद्र यांच्या गतीबद्दल चांगल्या प्रकारे जाणीव झाली होती, असे दिसून येते. त्या काळातल्या आपल्या पूर्वजांनी नभपटलावर सूर्याची आणि ऋतूंचीही सांगड घालण्यास सुरुवात केली होती. आकाशात पाच तारे असे आहेत की जे स्वतःच्या मर्जीने नभपटलावर प्रवास करतात, असेही त्यांच्या लक्षात आले होते. आणि या पाच ताऱ्यांचा -जे खरेतर ग्रह आहेत हे नंतर लक्षात आले -आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का याचा ते स्वाभाविकपणे विचार करू लागले होते. त्यानंतरच्या काळात अनेक वर्ष फलज्योतिष आणि ज्योतिषशास्त्र हे एकच विषय होते.
पृथ्वीवर नांदणाऱ्या, किंवा या आधी नांदलेल्या जवळजवळ सगळ्याच संकृतींमध्ये सूर्य, चंद्र आणि इतरही ग्रहताऱ्यांना देवस्वरूप मानले गेले. अनेक ठिकाणी मंदिरांच्या स्वरूपात वेधशाळाही अस्तित्वात येत गेल्या. आणि त्यांचा अभ्यास करणाऱ्यांना समाजात एक वेगळे, इतरांपेक्षा वरचे स्थान मिळत गेले. आणि मग विश्वासंबंधींच्या निरनिराळ्या कल्पना अस्तित्वात येऊ लागल्या.
कधीकाळी पृथ्वी विश्वाच्या केंद्र स्थानी आहे, हेच सत्य म्हणून सर्वमान्य होते. सर्वसाधारण अनुभव हेच सांगत असल्याने यात आपल्याला काही वावगे वाटण्याचेही कारण नाही. आपल्याला पृथ्वी हलताना जाणवत नाही. पळत जाणाऱ्या व्यक्तीला वारा त्याच्या मागे जाताना जाणवतो; मग जर पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत असेल तर आपल्याला हवेचा जोर जाणवला पाहिजे. मात्र असा अनुभव आपल्याला येत नाही. पृथ्वी स्थिर आहे, असे समजण्यासाठी अशी काही कारणे त्या काळात पुरेशी होती.
प्राचीन इजिप्तमधल्या लोकांना ताऱ्यांचे आणि त्यांच्या आकाशातील गतींचे खूप ज्ञान होते. त्यांनी रचलेल्या पिरॅमिडच्या रचनांवरून त्यांचे हे ज्ञान सिद्ध होते. त्यांनी पिरॅमिडची रचना फार अचूकपणे उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम अशी केली होती. त्यांनी ‘रा’ या देवाची कल्पना केली. ‘रा’ हा देवांचा राजा आणि सर्व निर्मितीचा पिता होता. या ‘रा’ची गंमत अशी की तो सूर्याचा संरक्षक होता, तो सूर्यावर नियंत्रण तर ठेवतच होता पण त्याच बरोबर तो स्वतः सूर्यसुद्धा होता. पारंपरिक इजिप्शिअन समजुतींप्रमाणे सूर्य असणारा ‘रा’ देव ‘मानजेत’ बोटीतून आकाशातून प्रवास करतो. या प्रवासात त्याच्याबरोबर इतर देव पण प्रवास करतात. त्यांचा हा दिवसभराचा प्रवास बारा प्रांतातून जातो. हे बारा प्रांत म्हणजे दिवसाचे बारा तास. या बारा प्रांतांच्या प्रवासाच्या शेवटी ‘रा’चा मृत्यू होतो व त्याचे शव पाण्यावरून दुसऱ्या बोटीतून प्रवास करून पूर्वेला येते. इथे तो जिवंत होऊन परत आपला बारा प्रांताचा प्रवास सुरू करतो.
‘नुट’ ही इजिप्शियनांची आकाशाची आणि विश्वाची देवता. रॅमसेस-६च्या थडग्यावर या देवतेचे चित्र आकारलेले आहे. या चित्रात ताऱ्यांना मानवी आकृत्यांच्या स्वरूपात दाखवले आहे, आणि संपूर्ण आकाश आणि पृथ्वी नग्नावस्थेत असलेल्या ‘ये’ देवतेच्या खाली झाकलेली आहे. ‘नुट’ला ‘गेब’ या पृथ्वीच्या देवाचा आधार आहे तर आकाशात तिला वायुदेव ‘शु’ याने आधार दिला आहे. काही ठिकाणी ‘नुट’ देवता गाईच्या रूपातही दाखवली आहे.
उत्तर युरोपमधील नॉर्डिक लोकांनी विश्वाकडे एका मोठ्या वृक्षाच्या रूपात बघितले. हा वृक्ष ‘नॉर्स’ वृक्ष म्हणून ओळखला जातो. नॉर्डिक लोकांनी एकूण सात जगांची कल्पना केली. ही सातही विश्वे या झाडाच्या मुळांमध्ये आणि फांद्यांमध्ये समाविष्ट आहेत. सर्वात वरच्या भागात आहेत देवभूमी, यक्षभूमी आणि मग सुपीकता, ज्ञान आणि भविष्य बघण्याची क्षमता असलेल्या देवांचे जग. त्या खाली मनुष्य, दानव, कृष्ण यक्ष आणि बटूंचे जग आहे तर सर्वात खाली आहे आग आणि मृतांचे जग. या सर्वांची निर्मिती कशी झाली याचा विस्तृत तपशील लिहिलेला आहे.
विश्वाबद्दलच्या एका भारतीय कल्पनेनुसार विश्वाची निर्मिती ब्रह्मदेवाने एका अंड्याच्या रूपात केली. या अंड्यात संपूर्ण विश्व – माहीत असलेले आणि माहीत नसलेलेही -सामावलेले आहे. यात पृथ्वी, तारे, ग्रह सर्व आले. याशिवाय आपण न बघिलतेला विश्वाचा भाग म्हणजे पातळलोकही यात समाविष्ट आहे.
आणखी एका कल्पनेप्रमाणे चार हत्तींनी पृथ्वी त्यांच्या पाठीवर तोलून धरली आहे. हे हत्तींची तोंडे चार वेगवेगळ्या दिशांना आहेत, एकमेकांकडे पाठ करून ते एका अतिविशाल कासवाच्या पाठीवर उभे आहेत आणि ते कासव एका नागाच्या फण्यावर आहे.
चिनी संस्कृतीमध्ये विश्वाची कल्पना ब्रह्मांण्डासारखीच असल्याचे दिसून येते. सुरुवातीला सर्वत्र अंधकार होता, असे चिनी लोकांचेही मत होते. मग एका वैश्विक अंड्याची निर्मिती झाली. त्यात पांगु नावाचा एक राक्षस झोपलेला होता. कालांतराने त्या राक्षसाचा आकार वाढला आणि त्याला जाग आली. आणि तो ते अंडे फोडून बाहेर आला. अंड्यातील हलके पदार्थ तरंगून वर गेले व त्याचे झाले आकाश -चिनी भाषेत ‘यांग’, तर वजनदार पदार्थांपासून पृथ्वी निर्माण झाली -चिनी भाषेत ‘यिन’. पांगु राक्षसाला हे सर्व आवडले पण त्याला भीती वाटली की आकाश (यांग) पृथ्वीवर (यिन) पडेल म्हणून त्याने आपला आकार वाढवायला सुरुवात केली, व शेवटी त्याचे पाय जमिनीवर व डोके आकाशाला जाऊन भिडले. पण नंतर पांगुच्याच लक्षात आले की आकाश पडणार वगैरे नाही. वाढता वाढता तो थकलाही होता म्हणून तो परत झोपून गेला. पण तो तेव्हा झोपला तो कायमचाच. त्याच्या डोळ्यांपासून सूर्य आणि चंद्र तयार झाले, त्याचा श्वासोच्छ्वास म्हणजे वायू तर त्याचा आवाज म्हणजे वादळ आणि विजा झाल्या. त्याचे हात आणि पाय हे चार दिशा झाल्या तर नद्या म्हणजे त्याचे रक्त. त्याचे शरीर म्हणजे माती आणि शिरा म्हणजे रस्ते झाले. आणि पांगु आता जरी नसला तरी आपल्या लहरीप्रमाणे तो वातावरणाचे नियंत्रण करत असतो, असेही मानण्यात आले.
आज या सर्व गोष्टी म्हणजे एक मोठा कल्पनाविलास वाटला तरी त्या सगळ्या त्या त्या काळातील लोकांच्या समजुती़ंवर आधारलेल्या होत्या, हे आपण हे विसरता कामा नये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कहाण्या किंवा संकल्पना वेळोवेळी निर्माण होत गेल्या असाव्यात आणि वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या माहितीनुसार, कल्पनांनुसार त्यात भर घातली असावी किंवा काही गोष्टी त्यातून वजाही केल्या असाव्यात. शिवाय या संकल्पना त्या त्या काळातील लोकांना आकलन होऊ शकतील अशाच होत्या.
इथे समजून घेण्याचा महत्त्वाचा भाग हा आहे की आपले विश्व कसे आहे याबद्दल विचार लोक करू लागले होते. थोडक्यात एका प्रकारे ते विश्वाचा शोध घेऊ लागले होते.
परिसंकल्पनांच्या पलीकडे जाऊन विश्व समजावून घेण्याचा प्रयत्न प्रथम सुरू केला तो ग्रीक लोकांनी. सूर्य, चंद्र, तारे किंवा ग्रह यांच्या गती आपण गणिताच्या माध्यमातून समजू शकतो का? याकडे त्यांनी आपल्या संशोधनाचे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. आणि मग हे शास्त्र वेगाने पुढे जाऊ लागले.