नोवाक जोकोविचची जिगर

लेखक : किशोर पेटकर

मेलबर्न पार्कवर विक्रमी दहावे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस विजेतेपद मिळविल्यानंतर नोवाक जोकोविच म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील हा सर्वांत मोठा विजय आहे.’ ग्रीसचा युवा खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपास याला पराजित केल्यानंतर हा ३५ वर्षीय लढवय्या टेनिसपटू भावनाविवश झाला. कारकिर्दीतील २२वा ग्रँडस्लॅम एकेरी करंडक मिळवल्यानंतर जोकोविचने रॉड लेव्हर अरेनावरील आप्तेष्टांच्या कक्षाकडे धाव घेतली. स्वकियांच्या साथीत त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली; त्यानंतर तो कोर्टवर पुन्हा परतला, तेव्हाही तो स्वतःला सावरू शकला नव्हता. या जिगरबाज, झुंजार टेनिसपटूचे हे काही पहिले अथवा शेवटचेही ग्रँडस्लॅम विजेतेपद नव्हते. यापूर्वी त्याने कितीतरी कठीण सामने जिंकले आहेत. पराभवाच्या खाईतून वर येत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे तो यावेळेस एवढा भावुक का बरं झाला असावा? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. त्याचे उत्तरही लपलेले नव्हते.

वर्षभरापूर्वी हाच नोवाक जोकोविच टीकेचा धनी झाला होता, ऑस्ट्रेलियाने त्याला खलनायक ठरविले होते. सर्बियाच्या या हुकमी टेनिसपटूने कोविड-१९ प्रतिबंधक लस घेतली नव्हती आणि त्याला घ्यायचीही नव्हती. तो लसीकरणाचा समर्थक नव्हता. त्याने ऑस्ट्रेलियन सरकारच्या आदेशाची पायमल्ली केली होती. परिणामी, त्याला ऑस्ट्रेलिया सोडण्याचे आदेश देण्यात आले. एकाअर्थी हकालपट्टीच होती. जोकोविचसाठी ही मानहानीच होती, पण तो डगमगला नाही. लस घेणारच नाही या हट्टाला चिकटून राहिला. वर्षभरानंतर तो पुन्हा मेलबर्नला अवतरला. कोविड महासाथीचा कहर ओसरला होता, ऑस्ट्रेलियातील नियमांतही शिथिलता आली होती. यावेळेसही त्याने लस टोचून घेतली नव्हती, तरीही मेलबर्न पार्कवर खेळण्याची परवानगी मिळाली. वर्षभरापूर्वीचे सारे विसरून जोकोविच नव्या जिद्दीने प्रतिस्पर्ध्यांना भिडला. संपूर्ण स्पर्धेत फक्त एक सेट गमावून रॉड लेव्हर अरेनावर त्याने मोठ्या अभिमानाने करंडक उंचावला.

जबरदस्त इच्छाशक्ती

मेलबर्न पार्कवर दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना नोवाक जोकोविच पूर्ण तंदुरुस्त नव्हता. स्पर्धेच्या प्रारंभिक टप्प्यात त्याचे स्नायू दुखावले. त्यामुळे तो स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यताही निर्माण झाली. मात्र जोकोविच हे रसायनच अजब आहे. तो अंतिम लढतीपर्यंत त्वेषाने खेळला. विजेतेपदाच्या लढतीत आपल्यापेक्षा वयाने अकरा वर्षे लहान असलेल्या ग्रीक खेळाडूला तो भारी ठरला. २००८ साली जोकोविचने पहिल्यांदा मेलबर्न पार्कवर जल्लोष केला होता, तेव्हा तो वीस वर्षांचा होता. १५ वर्षांनंतरही जबरदस्त इच्छाशक्ती लोपलेली नाही. उलट आणखी काही करंडक जिंकण्यासाठी तो आतुर आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व लढतीत जोकोविचने रशियाच्या आंद्रे रुबलेव याला नमविले. त्यावेळी त्याचे वडील स्रजान यांची रशियाचा ध्वज सोबत घेतलेल्या टेनिसप्रेमींसमवेत छायाचित्रे झळकली. रशियाच्या समर्थनावरून जोकोविचवर टीका झाली. स्पर्धा सुरू असताना या टीकेमुळे मानसिक संतुलन राखणे व खेळावर पूर्ण लक्ष एकाग्र करणे म्हणजे तारेवरची कसरतच होती, पण त्याने दिव्य पार केले. त्याचे मनोबल कणखर आहे. तो सहजासहजी हार मानत नाही.

सर्वाधिक विजेतीपदे मिळवण्याच्या दिशेने

पुरुष टेनिसमध्ये जोकोविच व राफेल नदाल यांनी सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम एकेरी करंडक पटकावले आहेत. हा संयुक्त विक्रम आहे. स्टेफी ग्राफसुद्धा २२ ग्रँडस्लॅमची मानकरी आहे, पण ती आता निवृत्त आहे. ३६ वर्षीय नदाल पूर्ण भरात असला, की त्याला रोखणे कठीण होते. मात्र हल्लीच्या काळात दुखापतींचा ससेमिरा मागे लागल्याने त्याचे शरीर तक्रारसुरात असते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो दुसऱ्याच फेरीत गारद झाला. पण पॅरिसला तो त्याच्या आवडत्या मातीच्या कोर्टवर फ्रेंच ओपन १५व्यांदा जिंकण्यासाठी इच्छुक असेल. २० ग्रँडस्लॅम जिंकलेला रॉजर फेडरर गतवर्षीच निवृत्त झाला. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची जोकोविचला संधी आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील त्याचा खेळ पाहता महिला गटात २३वेळा जिंकलेली, गतवर्षी निवृत्त झालेली सेरेना विल्यम्स आणि विक्रमधारक मार्गारेट कोर्टची २४ ग्रँडस्लॅम विजेतीपदे मागे टाकण्याचा पराक्रम नोवाक जोकोविच निश्चितच साधू शकतो.

0
0
error: Content is protected !!