आखाती तडका

किशोर पेटकर

संतोष करंडक राष्ट्रीय स्पर्धेत एकेकाळचे ‘दादा’ संघ मागे पडत आहेत, तर नवी गुणवत्ता प्रकाशमान होताना दिसतेय. भविष्यात या जुन्या स्पर्धा आणखी झळाळी देण्यासाठी एआयएफएफ नियोजन करीत आहे. जे फुटबॉलपटू व्यावसायिक क्लब पातळीपर्यंत मजल मारू शकत नाहीत पण त्यांचा त्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न असतो, त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा सहभाग मौल्यवान ठरतो.

भारतीय फुटबॉलमध्ये ‘संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धे’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. १९९६पूर्वी हीच देशातील अव्वल फुटबॉल स्पर्धा होती. त्यानंतर राष्ट्रीय साखळी फुटबॉल स्पर्धा, नंतर आय-लीग आणि आता इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धा असा भारतीय फुटबॉल व्यावसायिकतेचा व्याप वाढत गेला आणि संतोष करंडक स्पर्धा दुर्लक्षित होत गेली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) कोविडच्या प्रादुर्भावामुळे २०१९-२० व २०२०-२१ मोसमात ही स्पर्धा घेण्याचे धाडस केले नाही, उलट या दोन्ही मोसमात आयएसएल आयोजकांनी स्पर्धा बायो-बबलमध्ये घेतली. देशातील फुटबॉलपटूही संतोष करंडक स्पर्धेला कमीच महत्त्व देऊ लागले. एकंदरीत देशातील पायाभूत फुटबॉलचा ढाचा ढासळत असताना, या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी एआयएफएफची सूत्रे स्वीकारल्यानंतर अध्यक्ष कल्याण चौबे व सचिव शाजी प्रभाकरन यांनी देशातील फुटबॉल पुनरुज्जीवित करण्याचा विडा उचलला. देशांतर्गत फुटबॉलकडे दुर्लक्ष झाले होते, ती चूक आता सुधारण्यात येत आहे. त्याच प्रक्रियेअंतर्गत यंदा संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेचा चेहरामोहरा बदलण्यात आला.

पूर्वी ही स्पर्धा विभागीय पातळीवर होत असे, त्याऐवजी २०२२-२३ मोसम गटवार पद्धतीने झाला. पात्रता फेरीतील दहा संघ व थेट प्रवेश मिळालेले रेल्वे व सेनादल मिळून एकूण बारा संघांत मुख्य फेरी झाली. त्यापैकी चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. उपांत्य फेरीतील दोन, तिसऱ्या क्रमांकाचा व अंतिम मिळून एकूण चार सामने सौदी अरेबियातील रियाधमध्ये झाले. संतोष करंडक स्पर्धा देशाबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. गेल्या ऑक्टोबरमध्ये एआयएफएफ व सौदी अरेबिया फुटबॉल महासंघात यासंदर्भात करार झाला. ज्या मैदानावर ख्रिस्तियानो रोनाल्डो खेळला, त्या किंग फाहद आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमवर भारतीय फुटबॉलपटू खेळले. देशातील बिगरव्यावसायिक फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय सुविधांचा लाभ मिळावा याच हेतूने एआयएफएफ व सौदी अरेबिया यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यामुळे यावेळी संतोष करंडक स्पर्धेला आखाती तडका मिळाला.

रियाधमध्ये संतोष करंडक स्पर्धेतील महत्त्वाचे चार सामने खेळविण्याच्या एआयएफएफ निर्णयाचे कौतुकही झाले. शबीर अली हे भारताचे माजी नावाजलेले दिग्गज फुटबॉलपटू. त्यांनी संतोष करंडक आखातात नेण्यास समर्थन दिले. या महत्त्वाच्या स्पर्धेचे पुनरुज्जीवन होणे ही काळाची गरज आहे. या स्पर्धेमुळे देशातील राज्ये-केंद्रशासित प्रदेशांना योग्य प्रतिनिधित्व मिळते, असे मत व्यक्त करताना शबीर यांनी रियाधमध्ये खेळल्यामुळे देशातील बिगरव्यावसायिक फुटबॉलपटूंना मोठी संधी मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

कर्नाटकची पाच दशकांची प्रतीक्षा संपली

कर्नाटकने तब्बल पाच दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणताना अंतिम लढतीत मेघालयास नमवून एकूण पाचव्यांदा संतोष करंडक स्पर्धा जिंकली. म्हैसूरच्या झेंड्याखाली त्यांनी १९६८-६९मध्ये बंगालला नमवून शेवटचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर ५४ वर्षांनी त्यांनी या विजयी करंडकावर नाव कोरले. ४७ वर्षांपूर्वी, १९७५-७६मध्ये कर्नाटकने अखेरची अंतिम फेरी गाठली होती, पण तेव्हा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. कर्नाटकने भारतीय फुटबॉलला दर्जेदार गुणवान फुटबॉलपटू दिलेले आहेत. हल्लीच्या काळात आयएसएल स्पर्धेत बंगळूर एफसीमुळे कर्नाटकचे फुटबॉल राष्ट्रीय प्रवाहात दिसते, मात्र संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत १९६०-१९७०च्या दशकातील या राज्याचा दबदबा जाणवत नव्हता. तब्बल ५४ वर्षांनंतर राष्ट्रीय विजेतेपद मिळवून कर्नाटकाने स्थानिक गुणवत्ता प्रदर्शित केली. तेथील स्थानिक फुटबॉलचा आता हुरूप वाढेल हे नक्की.

उदयोन्मुख फुटबॉलपटूंना व्यासपीठ

भारताच्या राष्ट्रीय सीनियर पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक हे क्रोएशियाचे माजी विश्वकरंडक फुटबॉलपटू. त्यांनाही संतोष करंडकसारखी जुनी स्पर्धा भारतीय फुटबॉलसाठी महत्त्वाची वाटते. साधनसुविधांच्या दृष्टीने स्पर्धेतील महत्त्वाचे सामने रियाधमध्ये खेळविण्याच्या उपक्रमाचे स्टिमॅक यांनी समर्थन केले. देशातील नवोदितांना दर्जेदार सुविधा असलेल्या आंतरराष्ट्रीय संकुलात खेळायला मिळणे हे स्वागतार्हच आहे. संतोष करंडक स्पर्धेत आय-लीग, आयएसएल खेळाडू नसतात. स्पर्धेत खेळणारे बहुतांश फुटबॉलपटू उदयोन्मुख असतात. त्यांची स्वप्ने फार मोठी असतात. ही स्पर्धा नवोदितांसाठी व्यापक व्यासपीठ ठरते. राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी ठरल्यास व्यावसायिक पातळीवर त्यांना संधी मिळू शकते, कारकीर्द घडू शकते. यावेळच्या संतोष करंडक स्पर्धेतील उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतातील सर्वांत तरुण संघराज्यप्रदेश लडाखने गटसाखळी फेरीत खेळताना गुणांची कमाई केली. अशीच कामगिरी अंदमान-निकोबारच्या संघाने बजावली. लक्षद्वीपमधील फुटबॉलनेही प्रभाव दाखवत तीन गुणांची कमाई केली.

ईशान्येकडील राज्यांत फुटबॉलची फार मोठी गुणवत्ता आहे. तेथील राज्यांतील फुटबॉलपटूंचा क्लब पातळीवर दबदबा आहे, पण राज्यातर्फे खेळताना सांघिक पातळीवर तेथील फुटबॉलपटू क्वचितच यश मिळविताना दिसतात. संतोष करंडक स्पर्धेकडे पाहता, मणिपूरने २००२-०३मध्ये राष्ट्रीय विजेतेपद मिळविले, तर २०१०-११मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मिझोरामने २०१३-१४मध्ये ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली. त्यानंतर सुमारे दशकभरानंतर ईशान्येकडील आणखी एका संघाने अंतिम फेरीत धडक मारली. मेघालयास उपविजेतेपद मिळाले, पण तेथील युवा फुटबॉलपटूंना कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. या राज्याने भारतीय फुटबॉलला युजिनसन लिंगडोह याच्यासारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा फुटबॉलपटू दिला. आता संतोष करंडक उपविजेत्या संघातील नवोदित खेळाडू आश्वासक नजरेने आयएसएल, आय-लीग संघांकडे पाहत असतील.

माजी विजेते बंगाल, गोव्याचे अपयश

संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा सर्वाधिक ३२ वेळा जिंकलेल्या पश्चिम बंगालची ताकद हल्लीच्या काळात कमजोर भासते. भुवनेश्वरमध्ये झालेल्या मुख्य फेरीत बंगालच्या संघाला फक्त एकच गुण कमविता आला. तीच गोष्ट गोव्याची. गोव्यातील फुटबॉलला देशपातळीवर मोठी परंपरा आहे, मात्र राष्ट्रीय फुटबॉलमध्ये हा संघ आता सातत्याने पिछाडीवर दिसतो. भुवनेश्वरमध्ये पाच वेळच्या विजेत्या गोव्याच्या संघाला सर्व पाचही लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. बंगाल आणि गोव्याची राष्ट्रीय स्पर्धेतील पीछेहाट चिंताजनक मानली जाते. केरळला उपांत्य फेरी गाठता आली नाही. गतमोसमात ते विजेते होते. यावेळेस त्यांचे रियाधचे तिकीट थोडक्यात हुकले. पंजाबमधील फुटबॉल दम दाखवत आहे, हे त्यांच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाने दिसून आले. दशकभराच्या कालावधीत सेनादलाने राष्ट्रीय फुटबॉलमध्ये छाप पाडली आहे. देशभरातील खेळाडू सेनादलातर्फे खेळतात आणि त्यांची सांघिक भावना पराकोटीची ठरते. २०११-१२ ते २०१८-१९ या कालावधीत त्यांनी पाच वेळा संतोष करंडक पटकावला. यंदा कर्नाटककडून हार पत्करावी लागल्यामुळे सेनादलास अंतिम फेरी गाठता आली नाही, मात्र तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत सेनादलाने पंजाबविरुद्ध बाजी मारली. एकंदरीत, संतोष करंडक राष्ट्रीय स्पर्धेत एकेकाळचे ‘दादा’ संघ मागे पडत आहेत, तर नवी गुणवत्ता प्रकाशमान होताना दिसतेय. भविष्यात या जुन्या स्पर्धा आणखी झळाळी देण्यासाठी एआयएफएफ नियोजन करीत आहे. जे फुटबॉलपटू व्यावसायिक क्लब पातळीपर्यंत मजल मारू शकत नाहीत, पण त्यांचा त्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न असतो, त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा सहभाग मौल्यवान ठरतो. अखिल भारतीय फुटबॉल महासंघानेही आता ही बाब जाणली आहे हे विशेष.

0
0
error: Content is protected !!