लेखक : किशोर पेटकर
टी-२० असो, वा एकदिवसीय क्रिकेट, ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी अष्टपैलू खेळाने दबदबा राखला आहे. तेथील महिलांची बिग बॅश लीग स्पर्धा यशस्वी गणली जाते, देशांतर्गत महिला क्रिकेटचा पाया बळकट आहे. त्यामुळे कांगारूंचा महिला संघ धडाकेबाज, बिनधास्त क्रिकेट खेळताना दिसतो.
महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला २००९ साली सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत इंग्लंडच्या महिलांनी बाजी मारली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या महिलांना उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता. मात्र त्यानंतर कांगारूंच्या भूमीतील संघाने महिला क्रिकेटमध्ये प्रचंड प्रगती साधली. २०१० ते २०२३ या तेरा वर्षांच्या कालाखंडात झालेल्या सातही टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन महिला संघ अंतिम फेरीत खेळला. त्यापैकी २०१६मधील स्पर्धेचा अपवाद वगळता विक्रमी सहा वेळा जगज्जेतेपद पटकावण्याची किमया या संघाने साधली आहे. यावेळेस दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे यजमान संघाला १९ धावांनी नमवून जेतेपदाची हॅटट्रिक साधली. ऑस्ट्रेलियन महिलांचा हा विजय अद्वितीय आहे. टी-२० क्रिकेटमधील त्यांची हुकमत अवर्णनीय आहे. इंग्लंड व वेस्ट इंडीजने प्रत्येकी एकदा टी-२० क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद मिळविले, बाकी प्रत्येक वेळेस कांगारूंचा महिला संघ प्रतिस्पर्ध्यांना भारी ठरला. इंग्लंडला त्यांनी तीन वेळा अंतिम लढतीत पाणी पाजले. न्यूझीलंड, भारत व दक्षिण आफ्रिकेला प्रत्येकी एकदा नमवून धडाकेबाज कामगिरी नोंदविली.
टी-२० असो, वा एकदिवसीय क्रिकेट, ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी अष्टपैलू खेळाने दबदबा राखला आहे. तेथील महिलांची बिग बॅश लीग स्पर्धा यशस्वी गणली जाते, देशांतर्गत महिला क्रिकेटचा पाया बळकट आहे. त्यामुळे कांगारूंचा महिला संघ धडाकेबाज, बिनधास्त क्रिकेट खेळताना दिसतो. त्यांच्यात व्यावसायिकता ठासून भरलेली आहे. विशेष बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियन खेळाडू दडपणाखाली दबून जात नाहीत. उपांत्य फेरीत भारतीय महिला संघ सनसनाटी निकाल नोंदविण्याच्या दिशेने असताना ऑस्ट्रेलियाने ऐनवेळी खेळ उंचावला. पाच धावांनी विजय नोंदवून सलग सातव्यांदा अंतिम फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम लढतीत १५६ धावात करता आल्या, तरीही ऑस्ट्रेलियन संघ डगमगला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ घरच्या मैदानावर पाठीराख्यांच्या उत्स्फूर्त प्रोत्साहनाच्या बळावर डोके वर काढू पाहत असताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकाग्रता ढळू दिली नाही. त्यामुळे यजमान संघाच्या लॉरा वॉल्व्हार्टची एकहाती झुंज असफल ठरली. ऑस्ट्रेलियन संघाचा कौशल्यपूर्ण आणि नियोजनबद्ध खेळ प्रत्येकवेळी प्रतिस्पर्ध्यांना भारी ठरताना दिसत आहे. याच कारणास्तव महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला शह देणे इतर संघाना कठीण जाते.
अनुभवी खेळाडूंचे सातत्य
दक्षिण आफ्रिकेतील विश्वकरंडकात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा अनुभव निर्णायक ठरला. या अनुभवी खेळाडूंनी कामगिरीत सातत्य प्रदर्शित केले, त्यामुळे संघ व्यवस्थापनाचे काम तुलनेत सोपे झाले. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघातील अलिसा हिली व एलिस पेरी या दोघी दीर्घानुभवी. त्यांनी संघाने जिंकलेल्या सहाही विश्वकरंडक मोहिमेत मौल्यवान योगदान दिले. हिली सर्व अंतिम लढतीत खेळली, तर पेरीला दुखापतीमुळे २०२०मधील बाद फेरीस मुकावे लागले होते. संघातील आणखी एक अनुभवी खेळाडू बेथ मूनीने सलग दुसऱ्यांदा अंतिम लढतीत नाबाद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम साधला. २०२०मध्ये मेलबर्न येथे भारताविरुद्ध या शैलीदार बॅटरने नाबाद ७८ धावा केल्या होत्या, यंदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिच्या नाबाद ७४ धावा मॅचविनिंग ठरल्या. अर्थातच सामन्याची मानकरी तीच ठरली. अॅश्ले गार्डनर ही ऑस्ट्रेलियाची हुकमी अष्टपैलू आहे. अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडू आवश्यक धावा व चेंडू यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्नात असताना ऑफब्रेक गोलंदाजी टाकणाऱ्या गार्डनरचा स्पेल सामन्याची दिशा बदलणारा ठरला. याशिवाय तिने आक्रमक शैलीत फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले. स्पर्धेची मानकरी ठरलेल्या गार्डनरची ११० धावा व १० विकेट ही अष्टपैलू कामगिरी संघासाठी लाखमोलाची ठरली. संघातील इतर खेळाडूंनीही जबाबदारी समर्थपणे पेलली, त्यामुळे ऑस्ट्रेलियास स्पर्धेत एकही सामना न गमावता विश्वकरंडक उंचावणे शक्य झाले.
दक्षिण आफ्रिकेची प्रगती
महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त इंग्लंडकडे बलवान संघ या दृष्टीने पाहिले जाते. न्यूझीलंडचा संघही अधूनमधून चमकताना दिसतो. वेस्ट इंडीज संघाची ताकद हल्लीच्या काळात क्षीण झालेली आहे. भारतीय महिला महिला गुणवान आहेत, पण मोठ्या सामन्यात त्यांना यश मिळविता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेतील महिला क्रिकेट प्रगती साधत असल्याचे यावेळच्या स्पर्धेत दिसले. घरच्या मैदानावरील वातावरण त्यांच्यासाठी यावेळी पोषक होते. मैदानावर त्यांनी जोरकस खेळ केला. त्यामुळे त्यांना विजेतेपदासाठी स्पर्धक असलेल्या इंग्लंडला उपांत्य लढतीत सहा धावांनी नमविणे शक्य झाले. अंतिम फेरीपर्यंतची कामगिरी दक्षिण आफ्रिकेतील महिला क्रिकेटसाठी प्रेरणादायी असल्याचे मत या संघाची कर्णधार सुने लुसने व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेत महिला क्रिकेट उत्साही प्रतिसाद लाभत आहे. अंतिम लढतीसाठी न्यूलँड्स-केप टाऊन येथील स्टेडियमवर गर्दी होती, हे चित्र तेथील महिला क्रिकेटसाठी आश्वासक आहे. नव्या युवा मुलींनी बॅट व बॉलच्या खेळात प्रगती साधल्यास दक्षिण आफ्रिकेकडेही महिला क्रिकेटमधील ताकद या नजरेने पाहिले जाईल. त्याचवेळी त्यांना पुरुष संघाचा आदर्श गिरवण्यापासून दूर राहावे लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाने दबावाखाली झुकणारा चोकर्स संघ हा नामुष्कीजनक लौकिक मिळविला असून अजूनही तो चिकटलेला आहे.
भारतीय महिला गडबडल्या
सीनियर महिलांच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेअगोदर दक्षिण आफ्रिकेतच १९ वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धा झाली. शफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय मुलींनी जगज्जेतेपदाचा धमाका केला. त्यामुळे सीनियर संघाकडूनही अपेक्षा वाढल्या होत्या, मात्र उपांत्य फेरीत गडबड झाल्यामुळे भारतीय महिलांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ विजेतेपदास लायक होता, त्यांच्यात क्षमता होती, पण नशिबाची साथ लाभली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण तंदुरुस्त नसलेली कर्णधार अर्धशतकानंतर विचित्र पद्धतीने धावबाद झाली आणि अखेरच्या काही चेंडूंत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर आक्रमकपणे प्रतिहल्ला चढविणे भारतीय महिलांना शक्य झाले नाही. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढता आला नाही. २०२०मध्ये भारतीय महिलांना ८५ धावांनी नमवून ऑस्ट्रेलियानेच जगज्जेतेपद मिळविले होते. यावेळेस उपांत्य लढतीत पराभवाचे अंतर फक्त पाच धावांचे होते एवढाच दिलासा भारतीय संघाला मिळाला. महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अतिशय खराब ठरले. पराभवाचे तेच मुख्य कारण मानले जात आहे. फलंदाजीत निर्धाव चेंडूंचा आकडा वाढत असल्याबद्दलही कर्णधार हरमनप्रीतने चिंता व्यक्त केली होती. संघातील प्रमुख खेळाडू स्मृती मानधनाने दोन अर्धशतकांसह स्पर्धेत दीडशेहून जास्त धावा केल्या. भारतीय संघ तिच्यावर जास्त अवलंबून असल्याचे उपांत्य लढतीत पाहायला मिळाले. स्मृती दोन धावा करून बाद झाल्यानंतर संघाची आवश्यक धावगती राखताना दमछाक झाली. हरमनप्रीतने चिवट प्रतिकार केल्यामुळे नंतर संघाला डोके वर काढता आले एवढेच. शफाली वर्माकडून खूप अपेक्षा होत्या, पण तिने धावांच्या बाबतीत निराशाच केली. तुलनेत रिचा घोष जिद्दीने खेळली. भारतीय महिलांना आता मोठी संधी प्राप्त होत आहे. २६ मार्चपर्यंत चालणाऱ्या पहिल्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेद्वारे देशातील महिला क्रिकेटपटूंना कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे. कामगिरी उंचावत गेल्यास खेळाडूंचा आर्थिक भाव निश्चितच वधारेल, त्याचवेळी देशासाठी कामगिरी उंचावण्याइतपत प्रतिभा बहरल्यास भारतीय महिला क्रिकेट उत्तुंग भरारी घेईल हे स्पष्टच आहे, त्यामुळे प्रीमियर लीग घेण्याचा उद्देशही सार्थकी लागेल.