लेखक : किशोर पेटकर
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कोंडीत पकडण्यासाठी पूर्ण नियोजनाने मैदानात उतरावे लागेल. ऑसी फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकाव धरल्यास ते नक्कीच डोईजड ठरू शकतील. मागील काही कसोटी मालिकांतील ऑस्ट्रेलियाची आश्वासक कामगिरी लक्षात घेता, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला मैदानावर खूप घाम गाळावा लागेल हे स्पष्ट आहे.
साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष नऊ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत व ऑस्ट्रेलियामधील ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ कसोटी मालिकेकडे लागले आहे. या मालिकेची उत्कंठा लागण्याचे कारण म्हणजे, दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि जागतिक कसोटी विजेतेपदासाठी प्रमुख स्पर्धक आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या या मालिकेतील निकालावर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या लढतीसाठी खेळणारे दोन संघ निश्चित होतील. जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना या वर्षी जूनमध्ये इंग्लंडमध्ये होईल.
दोन वर्षांपूर्व अंतिम लढतीत न्यूझीलंडने भारताला आठ विकेट राखून हरविले होते, त्यामुळे तत्कालीन भारतीय कर्णधार विराट कोहलीचे स्वप्न भंगले होते. आता टीम इंडियाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून सलग दुसऱ्यांदा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे आणि विजेतेपद पटकावण्याचे भारतीय संघाचे उद्दिष्ट असेल. गुणतक्त्यातील सध्याची टक्केवारी पाहता, ऑस्ट्रेलिया संघाचे एक पाऊल अंतिम लढतीत आहे. फक्त त्यांना भारतात व्हॉईटवॉश टाळावा लागेल. भारताने मालिका जिंकल्यास अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेले श्रीलंका व दक्षिण आफ्रिका संघ आपोआप अंतिम लढतीच्या शर्यतीतून बाहेर पडतील.
श्रीलंकेची न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होत आहे. किवींच्या देशातील खेळपट्ट्यांच्या इतिहास पाहता, श्रीलंकेसाठी मालिका खडतर असेल, तरीही क्रिकेटमध्ये आखाडे नेहमीच चुकतात आणि काहीच गृहित धरता येत नाही. त्यामुळे जूनमध्ये जागतिक कसोटी विजेतेपदावर हक्क सांगण्याकरिता भारताला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकावीच लागेल हे स्पष्ट आहे.
भारताचे पारडे जड, पण…
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत भारताने मागील तिन्ही वेळेस ऑस्ट्रेलियास पाणी पाजले आहे. त्यापैकी दोन वेळा २०१८-१९ व २०२०-२१मध्ये भारताने डाऊन अंडरला जाऊन भीमपराक्रम बजावला. २०१६-१७ मध्ये भारताने घरच्या मैदानावरील मालिकेत बाजी मारली होती. दोन देशांच्या कसोटी मालिकेत २०१४-१५मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांच्या घरच्या मैदानावर भारताला शेवटचे हरविले होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, २००४-०५नंतर ऑस्ट्रेलियास भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ही आकडेवारी पाहता, फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतीय संघाचे पारडे निश्चितच जड असेल. मात्र ऑस्ट्रेलियाकडे दुर्लक्षही करता येणार नाही. पॅट कमिन्स हा वेगवान गोलंदाज. कर्णधार म्हणून त्याने चांगलाच जम बसविला असून ओळीने कसोटी मालिका जिंकल्या आहेत.
साहजिकच भारतातील खेळपट्ट्या फिरकीस पोषक असल्या तरी त्या यजमानांसाठीही धोकादायक असतील. याचे कारण म्हणजे ऑस्ट्रेलियापाशी चेंडूला चांगली फिरक देणारा अनुभवी नॅथन लायन हा ऑफस्पिनर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेत सर्वाधिक विकेट घेताना लायनने ६१ गडी बाद केले आहेत. शिवाय ऑस्ट्रेलियाचा संघ आणखी तीन फिरकी गोलंदाजांसह भारत दौऱ्यावर येत आहे. मिचेल स्वेप्सन याची लेगस्पिन पाकिस्तानात प्रभावी ठरली होती. डावखुरा अॅश्टन अॅगर अनुभवी आहे. टॉड मर्फी ऑफस्पिनर नवोदित असून तो पर्यायी फिरकी गोलंदाज आहे. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजीसमोर गडबडू शकतात हे बांगलादेश दौऱ्यात हल्लीच पाहायला मिळाले होते. एकंदरीत ऑस्ट्रेलियापाशीही दर्जेदार फिरकी गोलंदाज असल्याने मालिका कमालीची रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
भारताची मदार अनुभवी फलंदाजांवर
विराट कोहलीने एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमध्ये हल्लीच्या काळात जोमदार फलंदाजी केली आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत त्याला सूर गवसला नव्हता. झटपट क्रिकेटमधील फॉर्म विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही प्रदर्शित केल्यास भारतीय संघ अर्धी लढाई जिंकेल. कर्णधार रोहित शर्माकडूनही भारताला सातत्य हवे आहे. शुभमन गिलने अपेक्षा खूपच उंचावल्या आहेत. चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल यांच्याकडूनही भारतीय संघाला धावांचा ओघ अपेक्षित आहे. श्रेयस अय्यर अनुपलब्ध ठरल्यास सूर्यकुमार यादव याच्यासाठी मोठी संधी असेल. हुकमी फिरकी गोलंदाज असला तरी रविचंद्रन अश्विनची कसोटीतील फलंदाजी आश्वासक आहे. रवींद्र जडेजा पुनरागमन करत आहे. तो, तसेच आणखी एक डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल चांगली फलंदाजी करतात. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा वापर कसा होतो हेसुद्धा पाहावे लागेल. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत नवा चेंडू हाताळणारे महंमद शमी व महंमद सिराज यांनी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमरा याची अनुपस्थिती जाणवू दिली नव्हती. उमेश यादवचा अनुभव, जयदेव उनडकटचे उल्लेखनीय पुनरागमन यामुळे वेगवान गोलंदाजीतही भारत संघ समतोल भासतो. रिषभ पंतच्या अपघातानंतर यष्टीमागील जबाबदारी ईशान किशन व श्रीकर भारत यांच्यापैकी एकाला समर्थपणे पेलावी लागेल.
पाहुणा संघही ताकदवान
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने चार फिरकी गोलंदाज निवडून इरादा स्पष्ट केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिली कसोटी खेळू शकणार नाही, पण कर्णधार कमिन्स याच्यापाशी भारतीय खेळपट्ट्यावर खेळण्याचा मौल्यवान अनुभव आहे. जोश हेझलवूड, स्कॉट बोलंड असे दर्जेदार वेगवान गोलंदाज कांगारुंच्या संघात आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांच्या फलंदाजांचा जास्त कस लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या प्रमुख फलंदाजांना हल्लीच्या काळात लक्षणीय कामगिरी केलेली आहे. शंभरव्या कसोटीत द्विशतक करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला फॉर्म गवसला आहे. सलामीचा उस्मान ख्वाजा याचा खेळ सिडनी येथील खेळपट्टीवर बहरतो. त्यामुळे त्याच्यासाठी भारतीय खेळपट्ट्यांवर खेळणे जास्त आव्हानात्मक नसेल. मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ हे त्यांचे मध्यफळीतील आधारस्तंभ असून त्यांनी धावा करण्याचा कौशल्य अबाधित राखले आहे. ट्रेव्हिस हेड आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. यष्टिरक्षणाची जबाबदारी पेलताना अॅलेक्स कॅरी फलंदाजीतही उपयुक्त योगदान देत आहे. कॅमेरून ग्रीन पूर्ण तंदुरुस्त ठरल्यास ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणखीनच खोलवर जाईल. साहजिकच भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कोंडीत पकडण्यासाठी पूर्ण नियोजनाने मैदानात उतरावे लागेल. ऑसी फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकाव धरल्यास ते नक्कीच डोईजड ठरू शकतील. मागील काही कसोटी मालिकांतील ऑस्ट्रेलियाची आश्वासक कामगिरी लक्षात घेता, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला मैदानावर खूप घाम गाळावा लागेल हे स्पष्ट आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी : नागपूर येथे ९ फेब्रुवारीपासून
- दुसरी कसोटी : दिल्ली येथे १७ फेब्रुवारीपासून
- तिसरी कसोटी : धरमशाला येथे १ मार्चपासून
- चौथी कसोटी : अहमदाबाद येथे ९ मार्चपासून
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मागील पाच कसोटी मालिका
- २०१२-१३ : भारतात, भारत ४-० विजयी
- २०१४-१५ : ऑस्ट्रेलियात, ऑस्ट्रेलिया २-० विजयी
- २०१६-१७ : भारतात, भारत २-१ विजयी
- २०१८-१९ : ऑस्ट्रेलियात, भारत २-१ विजयी
- २०२०-२१ : ऑस्ट्रेलियात, भारत २-१ विजयी