‘देव’ भेट!

आशिष पेंडसे

 

फुटबॉलचा ‘देव’ पेले यांची भारत दौऱ्यादरम्यान, पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भेट घेणे हे केवळ स्वप्नवत होते. कोणताही गर्व, अभिनिवेश नसलेले पितृतुल्य आणि समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणजे पेले, हे जवळून अनुभवण्यास मिळाले. 

 

“पेले यांचा भारत दौरा…”
… असा विषय असलेला तो ईमेल आला आणि लागलीच कोलकाता विमानाचे तिकीट बुक करण्यास क्लिक केले. २०११मध्ये ब्राझीलचा १९९४ वर्ल्ड कप विजेता फुटबॉल संघ भारतात आला होता. त्या वेळेसच पेले येणार होते. पण, पाठीवर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना प्रवास करणे शक्य नव्हते. मात्र, पेले यांनी दिलेला शब्द पाळला होता. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५मध्ये त्यांनी भारत, जपान आणि चीन अशी आशिया सदिच्छा भेट पक्की केली.

कोलकाता येथे १९७७मध्ये पेले चक्क फुटबॉल सामना खेळले होते! त्यावेळेस ते अमेरिकेतील कॉसमॉस संघाकडून खेळत होते. खरं तर त्यावेळी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून ते निवृत्त झाले होते. परंतु, तरीही फुटबॉलच्या या ‘देवा’ला प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी ईडन गार्डन मैदानावर ८० हजार फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती! मोहन बागान या भारतीय क्लबच्या संघाबरोबर हा सामना खेळला गेला होता. पेले यांना खेळताना पाहण्याचे भाग्य लाभले नाही, पण त्यांच्या आशिया दौऱ्यादरम्यान त्यांना प्रत्यक्ष भेटणे आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून संवाद साधणे हीसुद्धा खूप काही शिकवून जाणारी गोष्ट होती. कोलकात्यामध्ये पेले यांचा ७५वा वाढदिवस साजरा करण्यात आला. १९७७मध्ये खेळलेले मोहन बगान संघातील काही माजी खेळाडू या वेळी उपस्थित होते. इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांपेक्षा पेले अर्थातच या माजी खेळाडूंशी हितगूज करण्यात रमले!

तत्पूर्वी, ॲटलेटिको कोलकाता या इंडियन सुपर लीगमधील फुटबॉल संघाने आयोजित कार्यक्रमाला पेले यांनी उपस्थिती लावली. संघाचा सहमालक आणि ‘प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट’ सौरव गांगुलीही यावेळी आला होता. सायंकाळी गांगुलीने पेले यांची छोटीशी मुलाखतदेखील घेतली. या ठिकाणीदेखील पेले यांनी आवर्जून युवा खेळाडू कुठे आहेत, अशी विचारणा करून त्यांच्याशी मनसोक्त गप्पागोष्टी केल्या होत्या.

पेले हे खरे खुलले होते ते दिल्लीत सुब्रतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उपस्थित राहताना.प्रत्यक्ष फुटबॉलच्या मैदानावर जाणे, युवा खेळाडूबरोबर संवाद साधणे आणि फुटबॉल पाहणे हे पेले यांना खूपच समाधान देऊन गेले. पाठीवरील शस्त्रक्रियेमुळे त्यांना नीट चालता येत नव्हते. आधार घेण्यासाठी काठी होती. पण, अशाही परिस्थितीत मैदानावर फुटबॉलला दोन-तीनदा हलकेच टच करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही!
***

पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर प्रथम पेले यांनी भारत भेटीला खूप विलंब झाल्याबद्दल नम्रपणे दिलगिरी व्यक्त केली. तसेच पर्यटन, सांस्कृतिकदृष्ट्या विविधतेने नटलेल्या भारताचे कायमच आकर्षण वाटत आले आहे, असे आवर्जून सांगितले.

बोलत असताना, प्रश्नांना उत्तरं देत असताना पेले यांच्या मिस्कील स्वभावाचीही प्रचिती येत होती. अतिशय हृद्य शब्दांत त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

‘वर्ल्ड कपसाठी निवड झाली त्यावेळेस परिधान करण्यासाठी फूल पँट आणि कोट नव्हता. नवीन विकत घेण्याची परिस्थिती नव्हती. अशा वेळेस आईने वडिलांचे कपडे अल्टर केले आणि बुजगावण्यासारखे ते परिधान करून मी ब्राझीलच्या संघात दाखल झालो होतो! मी फुटबॉल खेळण्यास आईचा प्रचंड विरोध होता! माझे वडील सेमी प्रोफेशनल फुटबॉलपटू होते. पण, गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना अकाली निवृत्ती घ्यावी लागली. रोजगाराचे साधन नव्हते. फुटबॉलमुळेच आम्ही गरिबीच्या गर्तेत लोटले गेलो अशी आईची ठाम भावना होती. म्हणूनच, मीदेखील फुटबॉलच्या आहारी जाणे तिला पसंत नव्हते. अर्थात, तीनदा वर्ल्ड कप उंचावल्यानंतर कदाचित तिचे मत बदलले असावे!’ अशा शब्दात पेले स्मरणरंजनात रमले. आयुष्यातील परिस्थितीवर पेले यांनी फुटबॉलच्या जोरावर उत्तर शोधलेच. आपली परिस्थिती, दुःख, वर्ण यांचे भांडवल न करता कर्तृत्वाच्या जोरावर त्यावर विजय मिळवण्याचा एक ग्लोबल संदेश पेले संपूर्ण आयुष्यभर आपल्या कृतीमधून देत राहिले!

‘फिफा’ने पेले यांचा ‘प्लेयर ऑफ द सेंच्युरी’ असा गौरव केला. तर, अर्जेंटिनाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार दिएगो मॅराडोना याने १९८६च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या सात खेळाडूंना चकवून केलेल्या गोलला शतकातील सर्वश्रेष्ठ म्हणून गौरवण्यात आले.

पेले श्रेष्ठ की मॅराडोना, हा सनातन वाद फुटबॉलविश्वात आहे. सध्याच्या पिढीतही रोनाल्डो ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (गोट) की मेस्सी असा वाद जगभर आहे.

धाडस करून या मुद्द्यावर मी पेले यांना छेडले होते. त्यावर पेले पुन्हा मिस्कीलपणे उत्तरले होते – आई-वडिलांनी मला जन्म दिला आणि पेले तयार करण्याचा कारखाना बंद केला!

… सर्वसमावेशक भूमिका असली, तरी शेवटी एक खेळाडू म्हणून स्वाभिमान आणि राष्ट्र अभिमान हाच सर्वोच्च आहे, हे पेले यांनी कुणाच्याही भावना न दुखावता दाखवून दिले होते!

मॅराडोनाच्या खेळाचे पेले यांनी कौतुक केले होते. नंतर तो वाद काहीसा शमविण्यासाठी ग्लोबल टेलिव्हिजनवर मॅराडोनासमवेत चॅट शोदेखील केला होता.

रोनाल्डो, मेस्सी यांच्या सध्याच्या युगात खेळत नाही, याबाबत त्यांनी ‘सुटकेचा निःश्वास’ टाकला होता. सध्याचे खेळाडू प्रचंड मेहनत घेतात. त्यासाठी वैद्यकीय, तंत्रज्ञान असा सर्वच प्रकारचा प्रचंड सपोर्ट देण्यात येतो. टोकाची स्पर्धा निर्माण झाली आहे. खेळाडूंवर खूपच दबाव आहे. त्या तुलनेत आमचे आयुष्य अतिशय सुखकर होते, अशा शब्दात सध्याच्या फुटबॉल विषयी पेले यांनी मतप्रदर्शन केले होते.

लॅटिन अमेरिका खंडातील असल्याने पेले यांनी रोनाल्डोच्या तुलनेत अर्जेंटिनाच्या मेस्सीला झुकते माप दिले होते. तसेच, ब्राझीलचा नेमार हादेखील जगातील सर्वोत्तम ठरू शकतो, हे सांगण्यास पेले विसरले नव्हते. आणि मॅराडोना, मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार या चौघांनाही मी माझ्या संघात घेईन, असं सांगत खास पेले स्टाईलने ह्या चर्चेवर पडदा टाकला!

खेळाडूंना लहान वयापासूनच प्रशिक्षण द्या आणि ते व्यावसायिक होण्याची शक्यता निर्माण झाल्यास परदेशातील खेळाचा अनुभव द्या, असा कानमंत्र पेले यांनी भारतीय फुटबॉल विश्वाला दिला होता. त्याचप्रमाणे आपल्या हयातीत फुटबॉल जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आणि भारतानेदेखील केवळ फुटबॉलच नव्हे तर खेळाच्या सर्वच आघाड्यांवर प्रगती करावी असा आशावाद व्यक्त केला होता.

व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तरावर पेले यांचे आयुष्य खाचखळग्यांनी भरलेले होते. मात्र, आपल्या खेळाच्या जोरावर पेले यांनी अखिल विश्वाला दिलेला आनंद अनमोल ठरतो आहे, अगदी आजही!

“कोलकात्यातल्या पत्रकार परिषदेला प्रारंभ होण्यापूर्वी पेले येत असताना भीतभीतच (थोडं अंतर राखूनच) एक सेल्फी काढला. सात-आठ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. सेल्फीचा जमाना अजून सुरू व्हायचा होता आणि निर्ढावलेपणे कोणी फारसे सेल्फी काढतदेखील नव्हते. तरीही, पेले भेटीच्या त्या क्षणाची आठवण म्हणून फारसा क्लिअर नसलेला का होईना पण सेल्फी हाती लागला!”

0
0
error: Content is protected !!