लेखक – किशोर पेटकर
भारताने हॉकीतील एकमेव जगज्जेतेपद मिळविण्याच्या घटनेस ४८ वर्षे उलटली आहे. भारताला १९९४ नंतर पहिल्या पाच संघांतही स्थान मिळाले नाही. २०१८ साली भुवनेश्वर येथे भारतीय हॉकी संघाने सहाव्या क्रमांकापर्यंत मजल मारली. भारतीय हॉकी जागतिक मैदानावर पिछा़डीवर का? हा प्रश्न विचारल्यानंतर कितीतरी कारणे दिली जातात व त्यात तथ्यही आहे. आश्वासक बाब म्हणजे, आता जुन्याच दुखण्यावर रडत बसण्याऐवजी संथगतीने का होईना परिस्थिती बदलताना दिसतेय.
भारतात एकंदरीत चौथ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा हॉकी विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाली. हॉकी जगतातील ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा. हॉकीतील जगज्जेतेपद मिळविणारा पाकिस्तान हा शेवटचा आशियाई देश. १९९४ साली, २९ वर्षांपूर्वी सिडनी येथे पेनल्टी स्ट्रोक्सवर नेदरलँड्सला हरवून पाकिस्तानने चौथ्यांदा हॉकी विश्वकरंडक जिंकला. त्यानंतर जागतिक हॉकीमध्ये पाकिस्तान अथवा भारत या परंपरागत लौकिकसंपन्न संघांना युरोपियन, तसेच ऑस्ट्रेलियन शैलीवर वर्चस्व मिळविणे शक्य झाले नाही. २०१८ साली भुवनेश्वरमध्ये चौदावी विश्वकरंडक स्पर्धा झालीले, तेव्हा हॉकीतील बेल्जियमची ताकद अनुभवायला मिळाली. नेदरलँड्सला चौथ्या विजेतेपदापासून दूर ठेवताना बेल्जियमने प्रथमच विश्वकरंडक पटकावला.
ऑस्ट्रेलियानेही दशकभराच्या कालावधीत दोन वेळा जगज्जेतेपद मिळविले. त्यांनीही फिल्ड हॉकीमध्ये फार मोठी मजल मारली आहे. पाकिस्तानने सर्वाधिक चार वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरले, पण या खेळात त्यांची सध्या खूपच पीछेहाट झाली असून यावेळच्या स्पर्धेत त्यांना पात्रही ठरता आले नाही. जर्मनीने दोन वेळा विजेतेपद मिळविताना स्वतःचा ठसा उमटविला आहे. थोडक्यात, १९९४ नंतर नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांच्या संघांचे वर्चस्व राहिले आणि हल्लीच्या काळात बेल्जियम संघ सुपर पॉवर बनून पुढे आला. अॅस्ट्रो टर्फवर पाश्चिमात्य देशांचा खेळ खुलतो, तर भारतीय उपखंडातील देशांना संघर्ष करावा लागतो. अर्थात हे कारणही आता कालबाह्य ठरले आहे. हॉकीतील अत्याधुनिक सुविधा भारतातही आल्या आहे, परंतु गतवैभव अनुभवण्यासाठी संघर्ष कायम आहे. भारतीय हॉकीमध्ये आता भरपूर पैसा येऊ लागलाय, परंतु कामगिरीच्या यशोशिखरावर तिरंगा फडकावणारे गुणवान शिलेदार खूपच कमी आहेत.
डच, ऑस्ट्रेलिया, जर्मनीचा दबदबा
जागतिक मैदानावर डच हॉकीचा मोठा दबदबा आहे. एकंदरीत त्यांनी तीन वेळा विजेतेपद मिळविले आहे, तसेच चार वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, याशिवाय तीन वेळा उपांत्य फेरीत आव्हान आटोपते घ्यावे लागले. विश्वकरंडक हॉकीच्या चौदा स्पर्धांमध्ये नेदरलँड्सने दहा वेळा उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम साधला. नेदरलँड्सने मागील दोन्ही वेळेस अंतिम फेरीत धडक मारली, पण अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व बेल्जियमच्या कडव्या आव्हानामुळे या संघाला पाकिस्तानचा सर्वाधिक विजेतेपदाचा विक्रम मागे टाकता आला नाही. डच हॉकीची शैली खूपच प्रसिद्ध असून तेथील हॉकी अतिशय रोमांचक असते. ऑस्ट्रेलिया व जर्मनीनेही जागतिक हॉकीत साम्राज्य प्रस्थापित केलेले आहे. नेदरलँड्सच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकताना या दोन्ही देशांनी प्रत्येकी अकरा वेळा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. त्यात ऑस्ट्रेलिया तीन, तर जर्मनी दोन वेळा विजेता ठरला.
प्रदीर्घ कालावधीची प्रतीक्षा
विश्वकरंडक हॉकी स्पर्धेस १९७१ साली सुरुवात झाली. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने बार्सिलोना येथे यजमान स्पेनचे कडवे आव्हान परतवून लावत पहिला विश्वविजेता हा बहुमान मिळवला. त्यानंतर १९७५ साली भारताने मलेशियातील कुआलालंपूर येथे पाकिस्तानला २-१ असे हरवून ऐतिहासिक कामगिरी साकारली. त्यापूर्वी दोन वर्षे अगोदर अंतिम लढतीत यजमान नेदरलँड्सविरुद्ध पेनल्टी स्ट्रोक्सवर पराभूत झाल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. १९७१ साली भारतीय संघ ब्राँझपदाचा मानकरी ठरला होता. भारताने हॉकीतील एकमेव जगज्जेतेपद मिळवले त्याला आता ४८ वर्षे उलटली आहे. भारताला १९९४ नंतर पहिल्या पाच संघांतही स्थान मिळाले नाही. २०१८ साली भुवनेश्वर येथे भारतीय हॉकी संघाने सहाव्या क्रमांकापर्यंत मजल मारली. भारतीय हॉकी जागतिक मैदानावर पिछा़डीवर का? हा प्रश्न विचारल्यानंतर कितीतरी कारणे दिली जातात व त्यात तथ्यही आहे. आश्वासक बाब म्हणजे, आता जुन्याच दुखण्यावर रडत बसण्याऐवजी संथगतीने का होईना परिस्थिती बदलताना दिसतेय. २०२१ साली, तब्बल ४१ वर्षांनंतर टोकियो येथे भारताने पुरुष हॉकीत पदक जिंकले. ते ब्राँझ असले, तरी ऑलिंपिक पदकाचे माहात्म्य फार मोठे आहे. देशात हॉकी खेळ पूर्वीप्रमाणे लोकप्रियतेच्या शिखरावर नाही, पण गुणवत्ता पार कोमेजूनही गेलेली नाही. त्यास खतपाणी घालणे गरजेचे आहे. हॉकी इंडियाचे सध्याचे अध्यक्ष दिलीप तिर्की हे भारताचे माजी हॉकीपटू, कर्णधार आहेत. त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. भारतीय हॉकीची नौका पार डुबण्याच्या वाटेवर असताना त्यांनी तेव्हाच्या परिस्थितीचा खेळाडू या नात्याने अनुभव घेतलेला आहे. दिलीप तिर्की हे ओडिशातील. त्यांच्याच राज्यात आता हॉकी साधनसुविधांचा चेहरामोहरा बदलत आहे. असेच सकारात्मक चित्र देशातील अन्य राज्यांतही दिसू लागल्यास पुन्हा एकदा हॉकीत भारतीय वर्चस्व दिसू शकेल. हा फक्त आशावाद आहे; प्रत्यक्ष मैदानावर, अभी दिल्ली बहुत दूर है…
ओडिशा सरकारला शाबासकी
भारतात यापूर्वी १९८२ साली मुंबईत, तर २०१० साली नवी दिल्लीत हॉकी विश्वकरंडक स्पर्धा रंगली. २०१८ साली नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारताने तिसऱ्यांदा हॉकी विश्वकरंडकाचे यजमानपद यशस्वीपणे पेलले. भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर प्रतिष्ठेची स्पर्धा रंगली. स्पर्धेच्या नेटक्या आयोजनात नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील ओडिशा राज्य सरकारचे योगदान मौलिक ठरले. नवीनबाबूंचे सरकार नेहमीच क्रीडा क्षेत्राची पाठराखण करताना दिसते. ओडिशा राज्याला हॉकीची फार मोठी परंपरा असून तेथील ग्रामीण भागात नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेली आहे. या गुणवत्तेला शास्त्रोक्त पैलू पाडण्याचे काम ओडिशा सरकार करते. केवळ हॉकीच नव्हे, तर फुटबॉल खेळालाही ओडिशा सरकारचे आर्थिक पाठबळ लाभत आहे. कोणताही खेळ व क्रीडापटूंची गुणवत्ता बहरण्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धी निर्णायक ठरते. कलिंगा स्टेडियमच्या धर्तीवर ओडिशा राज्यात आणखी एक जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम असावे याकडे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी गांभीर्याने लक्ष दिले आणि ओडिशाच्या उत्तरेकडील सुंदरगढ जिल्ह्यातील रुरकेला येथे भव्यदिव्य हॉकी स्टेडियम साकारले. १५वी विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यास आठवडाभराचा अवधी असताना रुरकेला येथील हॉकी स्टेडियमचे उद्घाटन झाले. फेब्रुवारी २०२१मध्ये या स्टेडियमच्या कामाची कोनशिला बसविण्यात आली होती. कोविड काळातील निर्बंध असूनही कामाचा वेग कायम राहिला. त्यामुळेच विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी स्टेडियम पूर्ण क्षमतेने सज्ज होऊ शकले, अर्थातच याचे सर्व श्रेय नवीन पटनाईक यांच्या सरकारला द्यायलाच हवे. जागतिक हॉकीमध्ये मोठ्या स्टेडियममध्ये रुरकेला स्टेडियमची गणना होते. ५० एकर जागेत उभारण्यात आलेल्या या वास्तूच्या बांधकामासाठी २६१ कोटी रुपये खर्च झाले. एकावेळी २० हजार हॉकीप्रेमी या स्टेडियममध्ये बसून खेळाचा आस्वाद घेऊ शकतात. ओडिशात दोन दर्जेदार हॉकी स्टेडियमवर विश्वकरंडक स्पर्धा खेळली जात आहे, ही बाब साऱ्या भारतीयांसाठी भूषणावह आहे. त्यासाठी ओडिशा सरकारला तिजोरीचा कप्पा खुला ठेवावा लागला. विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद भुषविण्यामागे त्या खेळाच्या अत्याधुनिक साधनसुविधा तयार करणे हा मुख्य हेतू असतो. ओडिशात तो साध्य झाल्याचे दिसून आलेय. त्याचा लाभ युवा गुणवत्ता विकसित करण्यास कसा घेतला जातो हे पाहावे लागेल. त्यासाठी हॉकी इंडियालाही खास नियोजन करावे लागेल. याबाबती नियोजन करताना दिलीप तिर्की यांच्या अध्यक्षतेखालील महासंघाचाही कस लागेल.