लेखक : किशोर पेटकर
रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये गेल्या सात वर्षांच्या विजेत्या संघांवर नजर टाकता, कधी काळी कमजोर मानले जाणारे गुजरात, विदर्भ, सौराष्ट्र हे संघ चँपियन ठरले. देशांतर्गत क्रिकेटमधील मातब्बर संघांचा दबदबा लोपला आहे हे स्पष्टच असून वेळोवेळी अधोरेखितही होत आहे. छोट्या शहरांतील गुणवत्ता बहरत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील गुणवत्ता प्रकाशमान होत आहे ही बाब भारतीय क्रिकेटसाठी आश्वासक आणि फायदेशीर ठरत आहे. अजूनही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे माहात्म्य अबाधित आहे. याच स्पर्धेद्वारे भारतीय क्रिकेटला गुणवंताची रसद पुरविली जात आहे. सौराष्ट्राचे विजेतेपद हे ज्वलंत उदाहरण आहे.
जेव्हा रणजी क्रिकेट स्पर्धा विभागीय पातळीवर खेळली जात असे, तेव्हा सौराष्ट्र संघ पश्चिम विभागात तुलनेत कमजोर गणला जात होता. त्यानंतर स्पर्धेची एलिट व प्लेट अशी विभागणी झाली. तेव्हाही गुजरातमधील या संघाचा दर्जा उंचावला नव्हता. सौराष्ट्राचा संघ प्लेट गटात होता आणि गोव्यासारख्या कमजोर संघानेही त्यांच्यावर विजय नोंदविण्याची किमया साधली होती. कालांतराने राजकोट परिसरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम संकुलासह क्रिकेटच्या अत्याधुनिक साधनसुविधा आल्या, तेथील क्रिकेटचा दर्जा उंचावला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. २०१५-१६पासून सौराष्ट्राने चार वेळा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे, त्यापैकी दोन वेळा त्यांनी विजेतेपदाच्या करंडकावर मोहोर उमटवली. यंदा दुसऱ्यांदा त्यांनी भारतीय क्रिकेटमधील ही प्रतिष्ठेची स्पर्धा दणक्यात जिंकली.
एकंदरीत विचार करता, सौराष्ट्रमधील क्रिकेट देशातील नवी ताकद होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर यजमान बंगालला नऊ विकेट राखून हरवत सौराष्ट्रने पुन्हा एकदा चुणूक दाखविली. याच बंगाल संघाला नमवून त्यांनी २०१९-२०मध्ये पहिल्यांदा रणजी करंडक पटकावला होता. यावेळच्या मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्रचा हा दुसरा करंडक ठरला. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांनी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला होता.
सौराष्ट्राच्या क्रिकेटला मोठे वलय नाही. काही मोजके स्टार खेळाडू वगळता इतरांची ओळख मर्यादित आहे, मात्र त्यांच्यातील गुणवत्ता मौल्यवान आणि अफाट आहे. क्रिकेट हा केवळ एका खेळाडूभोवती केंद्रित खेळ नाही. सांघिक खेळाच्या बळावरच विजयी लक्ष्य साध्य होते. सौराष्ट्राच्या बाबतीत हेच घडत आहे. तेथील क्रिकेट संघटना आणि खेळाडू यांच्यातील सुनियोजित समन्वयामुळे सौराष्ट्राने तीन मोसमांत दोन वेळा रणजी करंडक जिंकण्याचा मान मिळविला.
भारतीय क्रिकेटसाठी योगदान
सौराष्ट्राचा संघ रणजी करंडक जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना नवी दिल्ली येथे सौराष्ट्राच्याच आणखी एका अष्टपैलू खेळाडूने ऑस्ट्रेलियावरील भारताच्या विजयात बहुमूल्य योगदान दिले. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या डावात सात गडी टिपले, त्यामुळे पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताला बॉर्डर-गावसकर क्रिकेट मालिकेत २-० अशी अपराजित आघाडी मिळाली. रवींद्र जडेजाने दुखापतीनंतर पुनरागमन करताना जबरदस्त फॉर्म प्रदर्शित केला. तो भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ आहे. त्याचे अष्टपैलूत्व सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या छायेत बहरले. भारताच्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक संघातून खेळताना छाप पाडल्यानंतर या जिगरबाज खेळाडूने मागे वळून पाहिले नाही. तीच गोष्ट चेतेश्वर पुजाराची. भारतीय कसोटी क्रिकेट संघातील हा मध्यफळीतील तंत्रशुद्ध फलंदाज. त्याने कारकिर्दीत चढउतार अनुभवले. संथ फलंदाजीमुळे आजच्या झटपट क्रिकेट युगात त्याच्यावर टीकाही झाली, पण तो डगमगला नाही. सौराष्ट्राचा संघ रणजी अंतिम लढत खेळत असताना पुजाराने शंभरावा कसोटी क्रिकेट सामना खेळण्याची अमूल्य कामगिरी साधली. कसोटी क्रिकेटमध्ये सामन्यांचे शतक साजरे करणारे मोजकेच भारतीय आहेत, त्यात आता पुजाराची भर पडली. चेतेश्वर पुजाराची जडणघडणही सौराष्ट्राच्या संघातूनच झाली.
तेथील आणखी एक जिद्दी क्रिकेटपटू म्हणजे वेगवान गोलंदाज आणि सौराष्ट्रचा कप्तान जयदेव उनाडकट. लहान वयात त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, त्यानंतर तो राष्ट्रीय निवड समितीकडून दुर्लक्षिला गेला, पण त्याने जिद्द गमावली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जीव तोडून खेळला, त्यामुळेच त्याला तपभरानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची संधी लाभली व त्याने विश्वासही सार्थ ठरविला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघातून नवी दिल्ली कसोटीत खेळण्याची संधी नसल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची खास परवानगी घेऊन उनाडकट रणजी अंतिम सामन्यासाठी सौराष्ट्र संघात दाखल झाला. दुसऱ्या डावात सहा गडी टिपून त्याने संघाच्या विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला.
अप्रतिम सांघिक कामगिरी
सौराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक नीरज ओडेद्रा हे माजी क्रिकेटपटू. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने रणजी करंडक पटकावताना अप्रतिम सांघिक कामगिरी बजावली. संघात मोठे बदल न करता खेळाडूंवर विश्वास दाखविण्यात आला. नाराज होऊन पुद्दुचेरीकडे गेलेला शेल्डन जॅक्सन पुन्हा सौराष्ट्राच्या संघात परतला. मोसमाच्या सुरुवातीस त्यांचा तरुण खेळाडू अवी बारोट याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. या धडाकेबाज क्रिकेटपटूच्या स्मृतीने सौराष्ट्राच्या संघाला वेगळीच प्रेरणा मिळाली.
यंदा रणजी मोहिमेत पुजारा फक्त दोनच रणजी सामने खेळला. कर्णधार उनाडकट याच्या अनुपस्थितीत अर्पित वसावडा याने खंबीरपणे संघाचे नेतृत्व केले. कसोटी संघात पुनरागमन करण्यापूर्वी स्पर्धात्मक सरावाच्या दृष्टीने रवींद्र जडेजा तमिळनाडूविरुद्धचा एकच सामना खेळला. बाकी खेळाडूंनी संघाला अंतिम फेरीपर्यंत नेताना निर्धारित लक्ष्याच्या दिशेनेच वाटचाल केली. साखळी फेरीतील मोहिमेची सुरुवात आसाम व महाराष्ट्राविरुद्धच्या अनिर्णित लढतीतील पहिल्या डावातील आघाडीने झाली. त्यांनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद या माजी विजेत्यांना पराभूत केले. त्यानंतर आंध्र व तमिळनाडूविरुद्ध सौराष्ट्राला हार स्वीकारावी लागली, पण तोपर्यंत बाद फेरी निश्चित झाली होती. या संघाचा खरा कस उपांत्यपूर्व फेरीपासून लागला. पंजाब व कर्नाटकविरुद्ध त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून विजय खेचून आणला. पंजाबविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत पार्थ भूत याने पहिल्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येत ठोकलेले नाबाद शतक निर्णायक ठरले. कर्नाटकविरुद्ध उपांत्य लढत जिंकताना सौराष्ट्राची घसरगुंडी उडाली, पण या लढवय्या संघाने विजय निसटू दिला नाही. संघासाठी वसावडा याची जिगर अलौकिक ठरली. त्याने १० सामन्यांत ९०७ धावा करून फलंदाजीचा अधिकांश भार वाहिला. त्यामुळेच ईडन गार्डन्सवर रणजी करंडक स्वीकारताना उनाडकट याने सोबतीला वसावडा याला मंचावर बोलावले. आपल्या अनुपस्थितीत बजावलेल्या कर्तृत्वाला ही मानवंदनाच होती. सौराष्ट्राच्या यशात चिराग जानी, धर्मेंद्रसिंग जडेजा, प्रेरक मांकड, चेतन साकारिया आदींचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले.
मातब्बरांचा दबदबा लोपला
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मुंबईने सर्वाधिक ४१वेळा जिंकली असली, तरी आता मुंबईकरांचे पूर्वीसारखे प्रभुत्त्व राहिलेले नाही. त्यांनी शेवटचा करंडक २०१५-१६मध्ये जिंकला; त्यानंतर दोन वेळा अंतिम फेरी गाठली, परंतु अनुक्रमे गुजरात, मध्यप्रदेशचे वर्चस्व त्यांना झुगारून लावता आले नाही. यंदा मुंबईला बाद फेरीही गाठता आली नाही. आठ वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या कर्नाटकला २०१४-१५नंतर करंडक उंचावता आलेला नाही. हैदराबाद या माजी विजेत्या संघाला यावेळस ३२ संघाच्या एलिट विभागात तळात राहावे लागले, त्यामुळे त्यांची प्लेट गटात पदावनती झाली.
गेल्या सात वर्षांच्या विजेत्या संघांवर नजर टाकता, कधी काळी कमजोर मानले जाणारे गुजरात, विदर्भ, सौराष्ट्र हे संघ चँपियन ठरले. गतमोसमात मध्यप्रदेशनेही आपले अस्तित्व दाखवून दिले. देशांतर्गत क्रिकेटमधील मातब्बर संघांचा दबदबा लोपला आहे हे स्पष्टच असून वेळोवेळी अधोरेखितही होत आहे. छोट्या शहरांतील गुणवत्ता बहरत आहे. त्याचे थोडेअधिक श्रेय आयपीएल स्पर्धेलाही देता येईल. १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेमुळे नवोदितांना लहान वयातच आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळत आहे. याच मंचावर रवींद्र जडेजाला झळाळी प्राप्त झाली. देशाच्या कानाकोपऱ्यातील गुणवत्ता प्रकाशमान होत आहे ही बाब भारतीय क्रिकेटसाठी आश्वासक आणि फायदेशीर ठरत आहे. अजूनही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे माहात्म्य अबाधित आहे. याच स्पर्धेद्वारे भारतीय क्रिकेटला गुणवंताची रसद पुरविली जात आहे. सौराष्ट्राचे विजेतेपद हे ज्वलंत उदाहरण आहे.