लेखक : किशोर पेटकर
क्रीडा मैदानावर चमकणाऱ्या सुपरस्टार खेळाडूंची वाहव्वा होते, ही बाब साहजिकच आहे. मात्र संघाला परिपूर्ण मार्गदर्शन करून यशप्राप्तीस प्रेरित करणारे प्रशिक्षक प्रसिद्धीपासून दूरच असतात. सांघिक खेळात संघाला योग्य दिशा दाखविणारे प्रशिक्षक हे पडद्यामागील सूत्रधार असतात. त्यांचे योगदान अनन्यसाधारण असते. संघ जिंकला, तर मार्गदर्शकाचाही उदोउदो होतो. कतारमध्ये झालेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काही प्रशिक्षक चर्चेत राहिले.
कतारमध्ये झालेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काही प्रशिक्षक चर्चेत राहिले. अर्जेंटिनाचे लिओनेल स्कालोनी या युवा मार्गदर्शकाने चँपियन संघ घडविला. या ४४ वर्षीय मार्गदर्शकाने लिओनेल मेस्सीच्या अफलातून खेळाच्या बळावर अर्जेंटिनाला ३६ वर्षांनंतर जगज्जेते बनविण्यास मदत केली, मेहनत घेतली. उपविजेत्या फ्रान्स संघाचे दिदिए देशॉ यांनीही सलग दुसऱ्यांदा संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली. याव्यतिरिक्त क्रोएशियाचे झ्लॅटको डॅलिच, मोरोक्कोचे वालिद रेग्रागुई, जपानचे हाजिमे मोरियासू, नेदरलँड्सचे लुईस व्हॅन गाल, अमेरिकेचे ग्रेग बरहॉल्टर, ब्राझीलचे टिटे, दक्षिण कोरियाचे पावलो बेंतो हे मार्गदर्शकही विश्वकरंडक स्पर्धेच्या कालावधीत चर्चेत राहिले. वालिद यांनी विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यास काही महिने बाकी असताना प्रशिक्षकपद स्वीकारले, पण मोरोक्कोच्या संघाने उपांत्य फेरी गाठत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. विश्वकरंडक स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकी देश ठरला.
स्कालोनी यांची कमाल
२००६ साली विश्वकरंडक स्पर्धेत लिओनेल स्कालोनी अर्जेंटिनातर्फे खेळले तेव्हा लिओनेल मेस्सीसुद्धा त्या संघाचा सदस्य होता. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी दोघेही लिओनेल अर्जेंटिना संघातून विश्वकरंडक मैदानावर दिसले. कतारमध्ये स्कालोनी प्रशिक्षक होते, तर ३५ वर्षीय मेस्सी संघाचा कर्णधार. लिओनेलद्वयीने कमाल केली आणि अर्जेंटिना तब्बल ३६ वर्षांनंतर फुटबॉलमधील जगज्जेता बनला. अर्जेंटिनाच्या यावेळच्या यशात स्कालोनी यांचे योगदानही नजरेआड होत नाही. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अर्जेंटिनाने सलग ३६ सामने अपराजित राहण्याची किमया साधली. कतार विश्वकरंडकातील पहिल्याच साखळी लढतीत सौदी अरेबियाने दक्षिण अमेरिकी संघास पराभवाचा जबरदस्त झटका दिला, मात्र स्कालोनी यांनी संघाला लगेच सावरले, खेळाडूंचा आत्मविश्वास ढासळू दिला नाही. त्यानंतर हा संघ पराजित झाला नाही. अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटवर फ्रान्सला पराजित करत देशवासीयांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिली. रशियात २०१८ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत अर्जेंटिनाला प्रचंड अपयश आले, या संघावर जोरदार टीका झाली. तेव्हाचे प्रशिक्षक होर्गे साम्पाओली यांना पायउतार व्हावे लागले. अर्जेंटिनाच्या युवा संघाचे मार्गदर्शक असलेले स्कालोनी हे साम्पाओली यांच्या मार्गदर्शक चमूत होते. अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ अपयशाच्या खोल खाईत असताना इतर अनुभवी मार्गदर्शक प्रशिक्षकपद स्वीकारण्यास नाखूष होते, स्कालोनी यांनी लहान वयातच आव्हान स्वीकारले. खेळाडू या नात्याने ते २०१५ सालीच निवृत्त झाले होते. मार्गदर्शक नात्याने त्यांच्यापाशी मोठा अनुभवही नव्हता. मात्र २०१८ ते २०२२ या कालावधीत ते एक चँपियन संघ निर्माण करण्यात यशस्वी ठरले. मेस्सी व स्कालोनी यांचे सूर छान जुळले. २०१६ साली कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम लढतीत चिलीने अर्जेंटिनास हरविले. त्या निराशेनंतर मेस्सीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली होती. तेव्हा देशवासीयांनी हा निर्णय मागे घेण्याचे भावनिक आवाहन केले होते, त्यापैकी एक स्कालोनीही होते. तेव्हा ते मेस्सी उद्देशून म्हणाले होते, ‘जाऊ नकोस लिओ…’ मेस्सीने निवृत्ती मागे घेतली. आठ वर्षांनंतर कतारमध्ये इतिहास घडला.
लक्षवेधक कारकीर्द
अर्जेंटिनाचे प्रशिक्षक या नात्याने स्कालोनी यांची कारकीर्द अल्पावधीतच लक्षवेधक ठरली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटिनाने २०२१ साली कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. १९९३ नंतर अर्जेंटिनाला प्रथमच या स्पर्धेत करंडक जिंकता आला. २००६ साली ते खेळाडू या नात्याने ते विश्वकरंडक स्पर्धेत अपयशी ठरले, आणि कतारमध्ये विश्वविजयी प्रशिक्षक बनले. मेस्सीसारख्या दिग्गज, सुपरस्टार फुटबॉलपटूला मार्गदर्शन करणे ही सोपी गोष्ट नाही, पण स्कालोनी यांनी छान व्यवस्थापन साधले. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ एक कुटुंब या नात्याने मैदानावर दिसला. एकसंधपणे जिंकणे हेच या संघाचे अंतिम ध्येय बनले. स्कालोनी यांनी १९९७ साली अर्जेंटिनाच्या २० वर्षांखालील संघात खेळाडू या नात्याने पदार्पण केले. त्यावर्षी होजे पेकरमन यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटिना २० वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला होता. नंतर याच पेकरमन यांनी स्कालोनी यांची २००६ साली अर्जेंटिनाच्या विश्वकरंडक संघात निवड केली होती. २००३ ते २००६ या कालावधीत स्कालोनी अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले, पण जेमतेम सात आंतरराष्ट्रीय सामनेच खेळू शकले. क्लब पातळीवर त्यांची कारकीर्द १९९५ ते २०१५ अशी दीर्घायुषी ठरली.
देशॉ यांच्यावर विश्वास
फ्रान्सला विश्वकरंडक सलग दुसऱ्यांदा जिंकता आला नाही, त्यामुळे अनुभवी मार्गदर्शक दिदिए देशॉ यांच्या जागी दुसरा प्रशिक्षक येण्याबाबतचे अंदाज अखेर फोल ठरले. झिनेदिन झिदान फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक होतील अशी शक्यता होती, पण ती प्रत्यक्षात आलीच नाही. फ्रान्स फुटबॉल महासंघाने ५४ वर्षीय देशॉ यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना जून २०२६पर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे २०२४मधील युरो कप स्पर्धेत फ्रेंच संघ देशॉ यांच्याच मार्गदर्शनाखाली मैदानावर उतरेल, तसेच २०२६ मधील विश्वकरंडकातही त्यांच्याचकडे सूत्रे असू शकतील. देशॉ यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने १९९८ साली विश्वकरंडक जिंकला. २०१२ साली त्यांची फ्रान्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. २०१६ साली युरो कप उपविजेतेपद मिळविलेल्या फ्रान्सने २०१८ साली तब्बल २० वर्षांनंतर विश्वकरंडक जिंकला. खेळाडू व प्रशिक्षक या नात्याने जगज्जेते बनणारे देशॉ हे ब्राझीलचे मारियो झागाल्लो व जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबॉर यांच्यानंतरचे तिसरेच ठरले. देशॉ हे फ्रेंच फुटबॉल कोळून प्यालेले आहेत, त्यांना आपल्या संघातील खेळाडूंची नस पुरती माहीत आहे. त्यामुळे कतारमध्येही संघाने अंतिम फेरीत धडक मारली. येत्या तीन वर्षांत हा संघ आणखीनच मोठे यश मिळवू शकेल. पुढील वर्षी होणारी युरो कप स्पर्धा देशॉ यांच्या मार्गदर्शक कारकिर्दीतील निर्णायक असेल, त्या स्पर्धेत यश मिळाल्यास फ्रेंच संघाचा आत्मविश्वास आणखीनच बळावेल आणि देशॉ यांचे स्थान जास्तच भक्कम बनेल.