निंबाळचा गुरुदेव आश्रम

पांडुरंग पाटणकर    
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पर्यटन
 

कर्नाटकाच्या पर्यटन नकाशावर विजापूरचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ऐतिहासिक नगरीतील पर्यटनस्थाने पाहता - पाहता पर्यटक थकून जातात. जगातील भव्य असा दुसऱ्या क्रमांकाचा गोलघुमट, मुलुखमैदान तोफ, इब्राहिम रोजा, शहराची आदिलशाही तटबंदी व खंदक, त्यातील महाल, बागा, मशिदी, बारा कमानी, मेहतर महाल, गगन महाल, जलमंदिर, मक्का मशीद, आनंद महाल अशी शेकडो ठिकाणे विजापुरात आहेत. इथला इतिहासही जाणण्यासारखा आहे व आपल्या सोलापूरपासून बसने विजापूर तीन तासावर आहे. अशा विजापूरच्या पर्यटनाला गुरुदेव रानड्यांच्या निंबाळ क्षेत्राची जोड दिल्यास ‘सोने पे सुहागा’ म्हणतात तसे होऊन जाईल.

देशात व विशेषतः महाराष्ट्रात गेल्या शतकात हिमालयाएवढी जी थोर उत्तुंग व्यक्तिमत्त्वे होऊन गेली त्यात अध्यात्म क्षेत्रातील गुरुदेव रानडे हे निर्विवाद थोर व्यक्तिमत्त्व आपल्या तेजाने आजही झळकत आहे. इ.स. १९२७ ते १९४७ अशी जवळ - जवळ २० वर्षे त्यांचे वास्तव्य अलाहाबादेत झाले. अलाहाबाद विद्यापीठाचे व्हाईस चॅन्सलर म्हणूनच ते देशभर नावाजले व पुण्याची भांडारकर इन्स्टिट्यूट, जगद्विख्यात बनारस हिंदू विश्वविद्यालय, अलिगड युनिव्हर्सिटी, मुन्शी ईश्‍वरचरण आश्रम, अध्यात्म विद्याभवन अशा अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. ब्रिटिश जमान्यातील आयसीएसचे काही पेपर्स त्यांच्याकडे तपासायला येत असत व जगभरात ईस्टर्न - वेस्टर्न फिलॉसॉफीचे जाणकार म्हणून त्यांची ख्याती होती. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यांचे विद्यार्थी होते. ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीचे सन्माननीय प्रोफेसर म्हणून आलेले बोलावणे नम्रपणे नाकारून त्यांनी दुसरे नाव सुचवा म्हटल्यावर गुरुदेवांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांना तेथे पाठविले व त्यांनीही त्याचे चीज केले. राष्ट्रपती झाल्यावर डॉ. राधाकृष्णन गुरुदेवांना भेटायला जात तेव्हा सर्व सोपस्कार दूर ठेवत व एकटे भेटायला जात. आल्यावर म्हणत आम्ही अध्यात्मावर चर्चा करतो पण गुरुदेव रानडे अध्यात्म जगतात. वारकरी संप्रदायाचे उध्वर्यु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांनीही वेळोवेळी गुरुदेवांचे मार्गदर्शन घेत आयुष्याची वाटचाल केली.

गुरुदेव रानडे आश्रम हा सोलापूर - विजापूर रेल्वे मार्गावर सोलापूरपासून ७५ किलोमीटर तर विजापूरच्या अलीकडे ३४ कि.मी. अंतरावर निंबाळ रेल्वे स्टेशनच्या मागे आहे. स्टेशनातून पायी पाच - दहा मिनिटांत आपण तेथे पोहोचतो. एस.टी. बसने आल्यास सोलापूर - विजापूर राष्ट्रीय महामार्गावर होती. गावापासून आत ८ कि.मी. अंतरावर निंबाळचा हा आश्रम आहे. आश्रमाची ही जागासुद्धा गुरुदेवांना दैवी संकेतानुसार लाभलेली आहे. येथील १०० एकर जागेवर १९२२ साली त्यांनी ॲकॅडमी ऑफ फिलॉसॉफी ॲण्ड रिलिजन संस्था स्थापून आश्रमाची सुरवात केली. १९२७ ते १९४६ या काळात उन्हाळ्याच्या सुट्टीत व पुढे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचे वास्तव्य इथे निंबाळला झाले. त्यांच्या जुन्या घराच्या वास्तूतच १९६०-६१ मध्ये विधिपूर्वक त्यांची समाधी बांधण्यात आली. त्याचे रूपांतर आता भव्य आश्रमात झालेले असून सध्या श्रीराम निवास (१५ खोल्या), संत निवास (१० डबल रुम्स व सभागृह) भक्त निवास, ध्यानमंदिर अशी बरीच बांधकामे गरजेनुसार करण्यात आलेली आहेत. येथे येताच येथील शांतता व पावित्र्य मनाला स्पर्शून जाते. आश्रमाच्या एका भागात लावलेल्या असंख्य प्रकाशचित्रातून (फोटो) गुरुदेवांचा जीवनपटच उलगडला जातो. त्यांच्या कर्तृत्वाने आपण भारावून जातो. ध्यानमंदिरात आजही नित्य उपासनेला बसणारे साधक पाहून मन तृप्त होते. गडबड, गोंगाट याचा लवलेशही इथल्या उत्सव, समारंभात नसतो. त्यांचे गुरू भाऊसाहेब उमदीकर महाराज, गुरुबंधू अंबुराव महाराज, निंबरगी महाराज व गुरुदेव रानडे पुण्यथिती व श्रावण महिनाभर ध्यानसाधना असे कार्यक्रम इथे होतात. संपर्कासाठी दूरभाष क्र. ०८४२२-२८३७१६ किंवा ०८३५९ - २००३२२.

गुरुदेवांची ग्रंथसंपदा विस्तारभयास्तव इथे देता येत नाही. एम.ए.च्या परीक्षेत त्यांना तत्त्वज्ञान विषयाचे ‘चॅन्सेलर सुवर्णपदक’ मिळाले होते व विदेशी परीक्षकांनी त्यांच्या उत्तरपत्रिकेवर रिमार्क दिला होता - ‘‘द एक्‍झ्यॅमिनी नोज मोअर दॅन द एक्‍झ्यॅमिनर’’ तो पुरेसा बोलका आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या