अंकाई-टंकाईचा ट्रेक


लेखक ः अविनाश देशपांडे


अंकाई किल्ला उतरत असताना गडाच्या खाली एक ट्रेन दिसली. ते विलोभनीय दृश्य बघतच राहिलो. आजूबाजूला गर्द हिरवळ, वळणावरून जाणारी ट्रेन व आपसूकच तोंडातून शब्द फुटला ‘झकास’!


मिहीरनं व्हॉट्सॲपवर पाठवलेला अंकाई-टंकाईचा मेसेज वाचला, आणि त्याला म्हटलं ‘हो, मी येणार!’ विचार केला की अंकाई-टंकाई किल्ले तर आपण बघितले नाहीयेत व बरेच दिवसांत पावसाळी वातावरणामुळे मनासारखा व्यायामही झाला नव्हता, त्यामुळे मनाशीच म्हटलं चला भटकून येऊ. पुण्यात पाऊसही थांबला होता. दोन दिवसांच्या ट्रेकला जायचं निश्चत केलं. शनिवारी रात्री निघालो व रविवारी सकाळी नाशिकमधल्या मनमाडला पोहोचलो. गावातच एका हॉटेलमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजेच पोहे-चहा झाला. गावातून किल्ले सोपे व छोटे वाटत होते. मनाशी म्हटलं, ‘नॉट बॅड’!

तर किल्ल्यांच्या पायथ्याचं गाव अणकाई व गावातून दिसणारे अंकाई-टंकाई किल्ले हे आमचं ध्येय होतं. किल्ल्यांच्या जवळ गेल्यावर जाणवलं की आपण किती चुकलो होतो. एकतर चढण चांगलीच होती आणि किल्ला चढताना लक्षात आलं की परत येताना सांभाळून यावं लागणार. कारण येताना घाई केली व चुकून पाय दुसरीकडे पडला, तर कपाळमोक्ष होणार व कुठं, कसं पडू ते सांगता येणार नाही. असो.

गडांकडे जाताना सर्वात प्रथम जैन देवळं लागली. रात्री पाऊस पडला होता, त्यामुळे देवळांत ठिकठिकाणी पाणी गोळा झालं होतं व पाण्याला वाहून जाण्यासाठी वाट नसल्यानं शेवाळंही झालं होतं. देवळांच्या मुख्य दारांवर कुलूप होते. बाहेरूनच भगवान महावीरांचे दगडी पुतळे दिसत होते. अर्थात कुलूप लावण्याची कारणं पण योग्य होती. काही लोकांनी देवळाच्या बाहेरील भिंतीवर स्वतःची नावं कोरून परिसराला अवकळा आणली होती. ही देवळं दुमजली होती. वरच्या भागाला रिकाम्या व बिनदाराच्या खोल्या होत्या. खोल्यांत जाणारी वाट सरळ नव्हती. त्यामुळे दगडांवर पाय ठेवत व शेवाळं चुकवत काही खोल्या बघितल्या. काळजी घेत सर्वजण देवळांत फिरलो. नंतर आम्ही अंकाई गडाकडे निघालो.

अंकाई गडाची सुरुवातीची वाट थोडी निसरडी होती. पण पाऊस नसल्यानं ही वाट चढणं सोपं गेलं. गडाजवळ आलो. आता खरी अवघड वाट होती. दगड-धोंडे, चढण, दगडातील वाट असे करत अगस्त्य ऋषींच्या देवळापाशी म्हणजेच पठारावर आलो. देवळाबाहेरूनच ऋषींचं दर्शन घेतलं. पठारावर फिरून आलो. उंचावर असल्यानं तिथूनच हायवेवरून जाणाऱ्या गाड्या दिसल्या. सगळीकडे हिरवळच हिरवळ. पठारावर फिरत असताना काही मंडळी किल्ल्याच्या शेवटावर चालत चढताना दिसली. अगस्त्य ऋषींच्या देवळाकडून एक रस्ता वर जाताना दिसला. बऱ्यापैकी चढण होती व वाट तितकी सरळही नव्हती. पण हळूहळू किल्ल्याच्या टोकावर पोहोचलो. तिथं भगवा झेंडा फडकवला व फोटोही काढले. अंकाई गडाच्या माथ्यावरून हडबीची शेंडी (थम्सअप सुळका), गोरक्षनाथाचा डोंगर नजरेच्या टप्प्यात होते. खाली पठारावर येण्याची वाट निसरडी होती. दोनदा घसरलो; पण जवळच्या काठीच्या आधारानं वाचलो, असं म्हणायला हरकत नाही. खाली बसत-बसत पठारावर आलो. अंकाई गडावरून समोरचा टंकाई गड दिसत होता व त्याच गडावर पुरातन वास्तू दिसत होती. ती वास्तू बघायचीच असं ठरवलं. अंकाई गडावरचा उतरणीचा रस्ता सोपा नव्हता. काळजीपूर्वक उतरलो. गड उतरत असताना एक बाबा भेटले. त्यांचा नुकताच त्यांच्या मुलींसोबत ब्रह्मगिरीचा ट्रेक झाला होता. ते येवल्याचे होते. गप्पांमधून समजले की त्यांनी बरेच ट्रेक केले होते व ट्रेक करणं हे त्यांचं पॅशन होतं. एकंदरीत बाबांना भेटून मस्त वाटलं. अंकाई किल्ला उतरत असताना गडाच्या खाली एक ट्रेन दिसली. ते विलोभनीय दृश्य बघतच राहिलो. आजूबाजूला गर्द हिरवळ, वळणावरून जाणारी ट्रेन व आपसूकच तोंडातून शब्द फुटला ‘झकास’! अंकाई गड उतरून दोन्ही गडांना जोडणाऱ्या खाईत आलो. खाईतून खाली सर्व हिरवळ दिसत होती. रेल्वेचे दोन मार्ग दिसत होते. एक सरळ जाणारा व दुसरा वळणावळणाचा. तेवढ्यात सरळ जाणारी ट्रेन आली. त्यामुळे त्या दिवशी दोन्ही मार्गावरच्या ट्रेन बघायला मिळाल्या.

टंकाई गडावर पावसाचं पाणी वाहत होतं. त्यामुळे गडाच्या वाटेवर शेवाळं होतं. सावकाश व शक्यतो शेवाळं चुकवत गडावर आलो. विस्तीर्ण पठार होतं. लांबून पुरातन वास्तू दिसत होती. वास्तूच्या जवळ गेल्यावर कळलं की ते शंकराचं प्राचीन देऊळ होतं. दगडांत जत्थ्यानं वळवळणारे लाल रंगाचे पावसातले किडे – ‘वाणी पैसा किडे’ होते. ते किडे चुकवून पुढे गेलो व देवळात एक फोटो घेतला. देवळाजवळच पाण्याचं विस्तीर्ण तळं होतं. काही गायी चरत होत्या, काही तळ्यातील पाणी पीत होत्या. विस्तीर्ण पठारावर मनसोक्त भटकलो. पुन्हा एकदा वळणावरून जाणारी ट्रेन बघितली. आता ती कितीतरी जवळ वाटत होती.

थोड्या वेळानं आमच्या ग्रुपमधले सगळे टंकाई गडावर आले. त्यांच्याबरोबर मी टंकाई गडाच्या टोकावर गेलो, जिथून खोल दरी व सह्याद्रीतील दुसरे डोंगर दिसत होते. टंकाई गडावरून येताना पाय ‘मी’ म्हणत होते. एकतर खूप भटकलो होतो, बरेच दिवसांनी व्यायाम होत होता व चढ-उतारावरून बरीच पायपीट झाली होती; आता त्याचे परिणाम दिसत होते. एकंदरीत मज्जा आली. या सर्वांत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. ती म्हणजे या ट्रेक दरम्यान माझी एका व्यक्तीशी ओळख झाली. अंकाई व टंकाई गडावर त्या व्यक्तीनंच माझे सर्व फोटो काढले व ती माझ्याबरोबरच होती. ती व्यक्ती म्हणजे गायक पुष्कर लेले.

परतीच्या वाटेवर एका हॉटेलमध्ये जेवलो, बसमधून येवला गाव दिसलं. थोड्या वेळानं एका हॉटेलपाशी थांबून वडा-पाव व चहा घेत होतो, तेव्हा बायकोचा फोन आला, ‘पुण्यात प्रचंड पाऊस आहे. बहुतेक रस्ते पाण्याखाली गेले असतील, जपून या.’ पुण्याच्या वाटेवर पाऊस लागलाच. पुण्यात आल्यावरही रस्त्यात पाणी होतं. औंधपर्यंत पोहोचायलाच साडेनऊ वाजले. तिथून पुढं मी फोर-व्हीलर सावकाश चालवत शेवटी घरी साधारण रात्री दहा वाजता पोहोचलो.

या ट्रेकच्या निमित्तानं व्यायाम झाला, सगळ्यांबरोबर एकत्र राहायला मिळालं, पावसाची मजा घेता आली. बसनं येताना रस्ते खाच-खळग्यांनी भरलेले होते. तक्रार करत नाही, पण रस्ते चांगले होणं गरजेचं आहे. त्यामुळे लोक ट्रेक करण्याकडे आकर्षित होतील, विशेषतः पावसाळ्यात.

इंग्रजीत म्हटलं आहे – ‘Embrace the path wherever it takes you, it will lead you to the best place’, त्याप्रमाणे हा अंकाई-टंकाईचा ट्रेक झाला यात दुमत नाही.

0
0
error: Content is protected !!