लेखिका : स्वप्ना साने
कुठे पर्यटनासाठी गेलो की फिरताना, मज्जा करताना त्वचेची आणि केसांची काळजी घ्यायची राहूनच जाते, आणि परत आल्यानंतर त्वचा खराब झालेली असते, केस फ्रिझी झालेले असतात. त्वचा आणि केस पूर्ववत होण्यासाठी मग आणखी कष्ट घ्यावे लागतात. काही गोष्टींची काळजी घेतली, तर हे टाळणे सहज शक्य आहे.
काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीचा फोन आला, ‘त्वचा खूप खराब झालीये, सन बर्न झालं असावं बहुतेक. काहीही करून चेहरा नीट करून दे!’ ती भेटायला आल्यावर समजले की ती मैत्रिणींबरोबर नुकतीच थंड हवेच्या ठिकाणी सहलीला गेली होती आणि तिथून आल्यावर त्वचा खराब झाली. तिकडे त्वचेची काय काळजी घेतली हे विचारता, तिचे लगेच उत्तर.. ‘सगळं तर फिरायला जायच्या आधी करून गेले होते, फेशियल, ब्लीच, मेनिक्युअर, पेडिक्युअर… मग आणखी तिकडे गेल्यावर काय काळजी घ्यायची? फिरताना, मज्जा करताना आणखी काही करायला वेळच नव्हता आणि फिरायला गेल्यावरपण काय चेहरा बांधून फिरायचं? त्यात कसली गं मजा!! आता काय करायचं ते कर आणि छान करून दे माझी स्किन, बस्स..!’
मी काही न बोलता तिला फेशियल ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली आणि घरी काय काळजी घ्यायची, काय वापरायचे ते समजावून सांगितले. तेव्हा मनात विचार आला, की तिच्यासारख्या माझ्या वाचक मैत्रिणींनाही सहलीला जाताना, तिथल्या हवामानानुसार त्वचेची काय काळजी घ्यावी याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स द्यायला हव्यात. तुम्ही कुठेही फिरायला गेल्यावर त्वचा फ्रेश आणि टवटवीत दिसावी आणि परत येईपर्यंत ती डॅमेज होणार नाही यासाठी या काही टिप्स –
फिरायला जाताय तिथले हवामान लक्षात घ्यावे. त्यानुसार पॅकिंग करताना आपल्या ब्यूटी कीटमध्ये जास्त एसपीएफ (SPF) असलेले सन स्क्रीन ठेवावे. बर्फाच्या ठिकाणी जाणार असाल तर तिथल्यासाठी वेगळे मिनरल सन स्क्रीन वापरावे. त्यात असलेले झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साईड घटक त्वचेवर बॅरियर फिल्म तयार करतात आणि त्यामुळे सूर्याच्या तीव्र किरणे त्वचेत शोषली जात नाहीत आणि सन बर्न होत नाही.
आपल्या त्वचेप्रमाणे मॉइस्चरायझरची शंभर मिलीची बाटली बरोबर ठेवावी. हल्ली मॉइस्चराझिंग सीरम मिळतात, ती खूप छान हायड्रेटिंग असतात. त्यासोबत टिंटेड सीरम असले, तर मेकअपसाठी वेगळ्या फाउंडेशनची गरज नाही. त्वचेवर हायड्रेटिंग सीरम, त्यावर सन स्क्रीन आणि BB किंवा DD क्रीमचा लेयर व्यवस्थित सेट केल्यास कुठल्याच दुसऱ्या मेकअप बेसची गरज नाही. कमी प्रॉडक्ट वापरून कमी वेळात छान तयार होता येते.
मेकअप करताना मोजक्या प्रॉडक्टमध्ये छान तयार होता येते. सन स्क्रीन लावून झाल्यानंतर डोळे फ्रेश दिसण्याकरिता काजळ आणि आय लायनर नक्की लावावे. लिप बाम लावून टिंटेड लिप ग्लॉस लावावे, म्हणजे ओठ हायड्रेटेड राहतात आणि क्रॅक होत नाहीत. मेकअपचे इतर सामान जवळ असल्यास आणि वेळ असल्यास थोडाफार मेकअप करावा. पण निदान वर लिहिले आहे तेवढे केले तरी चेहरा फ्रेश दिसतो आणि फोटोही छान येतात. आय शॅडोची आवड असेल तर दोन बेसिक शेडची कीट घेता येते आणि बेसिक कलर वापरून डोळ्यांचा लुक अजून ब्राईट करता येतो. प्रवास करताना आणि बाहेर फिरताना नेहमी नॅचरल मेकअप करावा. डिनर आणि कॉकटेल पार्टी असल्यास त्यानुसार बोल्ड मेकअप नंतर करता येतो.
क्लिन्सिंग प्रॉडक्टमध्ये प्रवासात वेट वाइप बरोबर ठेवावेत. वाइपमध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत; जसे क्लिन्सिंग, मेकअप रिमूव्हल, टोनिंग, मॉइस्चरायझिंग आणि सिम्पल सॅनिटायझिंग वेट वाइप. आपल्या आवश्यकतेनुसार हे वाइप सोबत असल्यास प्रवासात खूप सोयीचे होते. कारण प्रत्येक ठिकाणी पाणी सहज उपलब्ध असेलच असे नाही. थंड प्रदेशात थंडीमुळे सारखे पाण्यात हात घालायलाही नको वाटते. अशा वेळी हे वाइप उपयोगी पडतात.
त्वचेला स्क्रब करण्यासाठी किंवा रोज चेहरा धुण्यासाठी थ्री इन वन क्लिन्सिंग प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत. एकाच प्रॉडक्टमध्ये फेस वॉश विथ स्क्रब आणि नंतर पाच मिनिटे लावून ठेवल्यास नरीशिंग आणि ब्राईटनिंग फेस पॅक इफेक्ट येतो. हे केल्यानंतर लगेच फेस सीरम किंवा मॉइस्चरायझर लावावे.
ॲलोव्हेरा जेल बरोबर ठेवावे. त्वचा आणि केसांसाठी वापरता येते. उन्हाचा त्रास झाला आणि त्वचा बर्न झाल्यासारखी झाली, तर लगेच जेल लावून त्वचा हील करता येते. चांगल्या दर्जाचे ॲलो जेल घ्यावे, तरच त्याचा चांगला इफेक्ट होतो. शिवाय कोरड्या हवामानामुळे केस फ्रिझी होत असतील, तर थोडे जेल लावून केस सेट करता येतात.
शाम्पू आणि कंडिशनर वेगवेगळे घेण्यापेक्षा शाम्पू विथ कंडिशनर उपलब्ध आहेत. प्रवासात वापरायला छोटी बाटली पुरेशी असते, सहज कीटमध्ये मावते. शिवाय छोटा हेअर ड्रायर सोबत ठेवावा. हल्ली सर्व हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये स्वतंत्र हेअर ड्रायर असतात,
तरीही आपले मिनी ड्रायर कधीही उपयोगात येऊ शकते. शिवाय पर्स किंवा बॅक पॅकमध्येही ठेवता येते. प्रवास करताना कधी भिजल्यास लगेच ड्रायरचा वापर करून वाळवता येते.
वर दिलेल्या काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या दोन दिवसाच्या प्रवासासाठीसुद्धा सोबत ठेवाव्यात. या गोष्टी आणि छोट्या पाऊचमध्येही सहज मावतात, वजन अजिबात होत नाही आणि वेळेवर आपली गैरसोयही होत नाही.
प्रवास करून आल्यानंतर पार्लरमध्ये जरूर जावे. कारण त्वचा थोडीफार टॅन होतेच, आणि सतत फिरून, ऊन वाऱ्याच्या संपर्कात येऊन त्वचा डल दिसते. म्हणून डी-टॅन नरीशिंग फेशियल आणि बॉडी पॉलिशिंग जरूर करावे, प्रवासाला जायच्या आधी तर करावेच. पण प्रवासाला जाण्याआधी ब्लीच करणे टाळावे. कारण ब्लीच करून उन्हात फिरल्यावर त्वचा काळवंडते आणि रॅश येऊ शकतो, जास्त टॅन होऊन सन बर्नही होऊ शकते. प्रवासानंतर परत आपल्या नेहमीच्या हवामानात आल्यावर त्वचेत बदल जाणवतो, म्हणून तेव्हा फेशियलची जास्त गरज असते.
तर, प्रवास जरूर करा, छान फोटो काढा आणि रील करा. छान क्विक मेकअपही करा आणि सुटी मस्त एन्जॉय करा! त्वचा आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यायला विसरू नका.
या गोष्टी ब्यूटी कीटमध्ये हव्याच
- सन स्क्रीन (कमीतकमी SPF 40)
- त्वचेच्या प्रकारानुसार मॉइस्चरायझर किंवा टिंटेड फेस सिरम किंवा BB/ DD क्रीम
- थ्री इन वन क्लिन्सिंग प्रॉडक्ट म्हणजे क्लिन्सिंग, एक्सफोलिएशन आणि नरीशिंग पॅक
- ॲलोव्हेरा जेल
- क्लिन्सिंग फेशियल वाइप,
- लिप बाम आणि लिप टिंट, काजळ, आय लायनर, कॉम्पॅक्ट पावडर
- कंडिशनिंग शाम्पू
- मिनी हेअर ड्रायर आणि हेअर ब्रश
निवेदन
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही… तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. [email protected] या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका.