भ्रमंती : सविता मिंडे
आजूबाजूचे धुक्यात हरवलेले उंचच्या उंच पर्वत, हिरवेगार कुरण, पांढरे ढग; दूरवर पसरलेली, उमललेली असंख्य फुले आणि फुलांचे ताटवे यांच्या अनोख्या मिश्रणाने हा ट्रेक माझ्यासाठी एक स्वप्नवत सत्य होते. सगळेच अवर्णनीय! खरेच ‘देवभूमी’ ही उक्ती सार्थ करणारा प्रदेश. साधारण ८७.५० हेक्टरवर ब्लँकेट शीटप्रमाणे पसरलेल्या फुलांचे दुर्मीळ सौंदर्य डोळ्यांमध्ये आणि फोनच्या कॅमेऱ्यामध्ये साठवायला खूप वेळ लागला.
हिमालय… शांत, निसर्गाचा वरदहस्त लाभलेला, भारतमातेचा मुकुटमणी, देवदेवतांची वस्ती असणारा आणि एव्हरेस्ट, कांचनजुंगा, नंदादेवी अशी अत्युच्च शिखरे मिरवणारा! हिमालयाचे सौंदर्य त्याच्या बर्फाच्छादित शिखरात, दऱ्याखोऱ्यात उधळलेल्या निसर्गात, शुभ्र-धवल प्रवाहात, प्रपातात, पर्वत शिखरावर रेंगाळणाऱ्या मेघमालात सामावलेले आहे.
देवभूमी उत्तराखंड राज्याला याच हिमालयाच्या कुशीत निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे. या देवभूमीत चमोली जिल्ह्यातील हजारो हिमालयीन वन्य-फुले, धबधबे, बर्फाच्छादित पर्वत आणि नद्या यांनी वेढलेल्या दऱ्यांचे ३,६५८ किमी उंचीवर असलेले युनेस्को घोषित वारसा स्थळ म्हणजे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ – फुलांची दरी! इंग्लंडचा गिर्यारोहक फ्रँक स्माइट याने १९३३मध्ये या व्हॅलीचा शोध लावला. अल्पाईन फुलांच्या कुरणासाठी प्रसिद्ध असलेली फुलांची सर्वात सुंदर दरी, फुलांचे नंदनवन, पृथ्वीवरचा स्वर्ग ही सगळी विशेषणे सार्थ ठरवणारा फुलांच्या दरीचा प्रवास मंत्रमुग्ध करणारा. या प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी माझा पहिला हिमालयीन ट्रेक केला. माझी मैत्रीण अश्विनी आणि मी एका ट्रॅव्हल ग्रुपकडून माहिती घेऊन पुणे-दिल्ली विमान प्रवास आणि पुढे हजरत निजामुद्दीन ते डेहराडून असे रेल्वे प्रवासाचे आरक्षण करून टाकले. डेहराडूनपासून पुढे आमचा १२-१४ तासांचा बसचा प्रवास होता.
रविवारी संध्याकाळी चेक इन करून आम्ही पावणेसहाला विमानात बसलो आणि माझ्या पहिल्यावहिल्या हिमालयीन ट्रेकची सुरुवात झाली. दोन तासांच्या प्रवासानंतर आठ वाजता दिल्ली आंतरराष्ट्रीय राजीव गांधी विमानतळावरून मेट्रोने दिल्ली ते धौलाकुआ आणि नंतर धौलाकुआ ते हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन असा प्रवास केला. नंतर निजामुद्दीन ते डेहराडून असा रात्रभराचा रेल्वे प्रवास करून सकाळी सहा वाजता डेहराडूनला पोहोचलो.
डेहराडूनपासून ट्रॅव्हल ग्रुपच्या स्थानिक प्रतिनिधीबरोबर टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने आमची वाटचाल ऋषीकेषकडे सुरू झाली. ऋषीकेषला पोहोचल्यावर तिथे शंतनू, वंश, सचिनसर, रुचा, सनी आणि मनीष या सगळ्या ‘ट्रेकमेट्स’ना सोबत घेतल्यानंतर आमचा पुढील प्रवास सुरू झाला. वाटेत भागीरथीच्या नदीकिनारी थांबून सगळ्यांनी आलू पराठे खाल्ले. रस्त्यात देवप्रयागला थांबून अलकनंदा आणि भागीरथी या पवित्र नद्यांचा संगम बघितला. भागीरथीचे गढूळ पाणी आणि अलकनंदेचे पांढरे दुधाळ पाणी स्पष्ट दिसत होते. एका बाजूला उंचच्या उंच डोंगररांगा, दुसऱ्या बाजूला खोलवर दऱ्या, त्या दऱ्यांमधून रोरावत वाहणाऱ्या नद्या, तर मधेच कुठेतरी भूस्खलन झालेले. पुढे एके ठिकाणी भूस्खलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्ता पूर्ण मोकळा व्हायला दोन तास लागले. रस्त्याच्या कडेला चांगले हॉटेल बघून दुपारचे जेवण करून आम्ही पुढे निघालो. पाऊस नव्हता पण सगळीकडे रस्त्याला कचकच होती. आम्ही गोविंदघाटला मुक्कामी जाणार होतो. ट्रॅफिक जामचा सामना करत रात्री दहा वाजता आम्ही गोविंदघाटला पोहोचलो. जोशीमठ ते गोविंदघाट या प्रवासात अक्षरशः काही ठिकाणी फक्त रस्ता आणि आमची बस हेच एकमेकांचे सोबती होते. सुरक्षितपणे गोविंदघाटला पोहोचल्यावर थोडे जेवण करून झोपेच्या अधीन झालो. रविवारी संध्याकाळी पावणेसहा ते सोमवारी रात्री अकरा असा जवळपास २९ तासांच्या थकवणाऱ्या प्रवासानंतर गुडूप झोप लागली.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रेकच्या पहिल्या दिवसाची सुरुवात गोविंदघाट ते घांगरिया या सोळा किमीच्या चढाईने होणार होती. आमचा ट्रेक पंडुकेश्वरपासून सुरू होणार होता. स्थानिक जीपने आम्ही पंडुकेश्वरला पोहोचलो. तिथून सामान खच्चरवर पुढे घांगरियाला जाणार होते. उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जाताना समुद्रसपाटीपासून ३,०५० मीटर उंचीवर असलेले, गोविंदघाटापासून तेरा किमी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सपासून चार किमी अंतरावरील घांगरिया हे छोटेसे नयनरम्य गाव आहे. ट्रेकचा पहिलाच दिवस असल्याने उत्साह खूप होता. सकाळी आठ वाजता ट्रेकला सुरुवात झाली. साधारण एकदोन तासांच्या चढणीनंतर जरा विसावा घेत रस्त्यामधील छोट्या हॉटेलमध्ये गरमागरम पराठ्यांचा आणि चहाचा आस्वाद घेऊन पुढे मार्गक्रमण सुरू केले. घांगरियापर्यंत हा पूर्ण ट्रेक रस्ता अतिशय सुंदररितीने तयार केलेला आहे. आजूबाजूचे निसर्गसौंदर्य बघत, डोळ्यांमध्ये साठवत, मोबाईलमध्ये कैद करत रस्ता कापत आम्ही सगळेच पुढे जात होतो. उंच डोंगररांगा, हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या दऱ्या, त्यामधून खळाळत वाहणाऱ्या फेसाळणाऱ्या नद्या… सगळेच डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. मजल दरमजल करत संध्याकाळी सहा वाजता आम्ही घांगरियाला पोहोचलो. थकव्यामुळे पटकन जेवण करून झोपेच्या अधीन झालो, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही फुलांच्या दरीला भेट देणार होतो.
घांगरिया ते फुलांची दरी साधारण सात किमी अंतर आहे. आधीच्या दिवसाचा थकवा होता. तरीही जेव्हा सकाळी आमचा ट्रेक सुरू झाला, तेव्हा सगळ्यांबरोबर उत्साहात मार्गक्रमण सुरू केले. सह्याद्रीमधील भरपूर ट्रेकचा अनुभव गाठीशी होता, पण हिमालयीन ट्रेकचा अनुभव अजिबातच नव्हता. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात दमछाक सुरू झाली. पण स्वप्नपूर्तीच्या दिशेने जाणारा प्रवास असल्यामुळे ट्रेक पूर्ण करण्याचा पक्का निर्धार होता. घांगरियामधून पुढे साधारण दोन किमी चालत आले की एक वाट गुरुद्वारा हेमकुंड साहिबकडे, तर दुसरी फुलांच्या दरीकडे जाते. चेक पॉइंटपासून पुढच्या ट्रेकचे माझे साथीदार होते ट्रेकमेट्स शंतनू आणि वंश. एव्हाना त्यांची आणि माझी छान गट्टी जमली होती. रस्त्यात दिसेल त्या वेगळ्या फुलांचे फोटो टिपत आम्ही पुढे चालत होतो. सकाळी साडेदहाला आम्ही त्या प्रसिद्ध फुलांच्या दरीत ३,६५८ मीटरची उंची गाठली. आजूबाजूचे धुक्यात हरवलेले उंचच्या उंच पर्वत, हिरवेगार कुरण, पांढरे ढग; दूरवर पसरलेली, उमललेली असंख्य फुले आणि फुलांचे ताटवे यांच्या अनोख्या मिश्रणाने हा ट्रेक माझ्यासाठी एक स्वप्नवत सत्य होते. सगळेच अवर्णनीय! खरेच ‘देवभूमी’ ही उक्ती सार्थ करणारा प्रदेश. साधारण ८७.५० हेक्टरवर ब्लँकेट शीटप्रमाणे पसरलेल्या फुलांचे दुर्मीळ सौंदर्य डोळ्यांमध्ये आणि फोनच्या कॅमेऱ्यामध्ये साठवायला खूप वेळ लागला. दुपारचे जेवण तिथेच करून मस्त ग्रुप फोटो, फुलांचे अगणित फोटो काढत तीन-चार तास घालवले. दुपारी दोननंतर व्हॅलीमध्ये थांबण्यासाठी परवानगी नसल्यामुळे आम्ही घांगरियाचा परतीचा मार्ग पकडला.
ट्रेकच्या सुरुवातीच्या पाँइंटला परत पोहोचल्यानंतर मी आणि अश्विनीने हुर्रे करून झक्कास फोटो काढला. व्हॅलीच्या परतीच्या वाटेवर पाय जरा कुरकुरत होते. प्रचंड थकवा जाणवत होता. पण मन मात्र उत्साहाने उड्या मारत होते. स्वप्नपूर्तीची नांदी होती ती. हॉटेलवर फ्रेश झाल्यानंतर जेवण करून पायांना मस्त मसाज करून घेतला. त्यामुळे जेवल्यानंतर निद्रादेवीच्या अधीन होण्यास बिलकूल वेळ नाही लागला.
दुसऱ्या दिवशी घांगरिया ते हेमकुंड साहिब अशा दहा किमीच्या ट्रेकचे नियोजन होते. स्फटिक-स्वच्छ हेमकुंड सरोवर सात शिखरांनी वेढलेले आहे, तसेच भव्य पर्वतरांगांचे आणि मनमोहक हिमनद्यांचे नेत्रदीपक प्रतिबिंब आहे. सकाळी हेमकुंडच्या ट्रेकसाठी निघताना थंडीमुळे पांघरुणाच्या बाहेर पडायचा खरे तर कंटाळा आला होता, पण तरीही सात वाजता चहा-नाश्ता केला आणि पायपीट सुरू केली. पहिल्या टप्प्यातच माझी शक्ती पूर्ण संपली असे वाटत होते. तरी सुरुवातीपासूनच मी, वंश, शंतनू आणि रिचा लीडला होतो. रस्ता जरी पूर्णपणे पायऱ्यांचा होता तरी खड्या चढणीमुळे दमछाक होत होती. त्यामुळे मधेच मी पूर्णपणे सरेंडर होण्याच्या निर्णयाप्रत आले, की शंतनू माझे मानसिक बळ वाढवायचा. केवळ सकारात्मक ऊर्जेमुळे हेमकुंडचा ट्रेक मी पूर्ण करू शकले. सकाळी सात वाजता सुरू केलेला ट्रेक दुपारी एक वाजता हेमकुंड साहिबला संपला. साधारण ४,६३२ मीटर उंचीवर आपण आलोय हे खरेच वाटत नव्हते. डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. विश्वास बसत नव्हता. पण हे सत्य होते. वयाची पन्नाशी पार केल्यानंतर आपण हे करू शकलो याचा माझा मलाच खूप अभिमान वाटला. गुरू गोविंद सिंग यांचा गुरुद्वारा बघून मन हरखून गेले. तिथे लंगरमध्ये प्रसाद घेऊन फोटोग्राफी करून परतीच्या वाटेला लागलो. त्याआधी डोंगरावर उमललेली असंख्य ब्रह्मकमळे डोळ्यात साठवून घेतली. एव्हाना सगळी मंडळी पुढे गेली आणि मी, शंतनू, तन्मय नि रागिणी मागे राहिलो. आम्ही आमचा वेळ घेत सावकाशीने उतरून पुन्हा हॉटेलवर पोहोचलो. आता मात्र अंगातले उरलेसुरले त्राणही संपले.
आता परतीचा प्रवास होता. पुन्हा घांगरिया ते गोविंदघाट सोळा किमी पायपीट, कारण हेलिपॅड बंद होते. मग काय पुन्हा मजल दरमजल करत, पायपीट करत गोविंदघाटकडे प्रयाण केले. तेथून जोशीमठ ते औली केबल कारने जाण्याचा निर्णय घेतला. आठ नंबर गेटला उतरून चेअर कारने न जाता मी, वंश आणि सचिनसरांनी हॉटेलपर्यंत पायी जाण्याचे ठरवले. पुन्हा पायपीट सुरू केली. शेणाने भरलेला रस्ता तुडवत वंश पुढे, मी आणि सचिनसर मागे अशी आमची पायाची केबलकार सुरू झाली. पुढे पुढे तर नुसता हिरव्यागार कुरणांमधून रस्ता, आजूबाजूला गुराढोरांशिवाय चिटपाखरूही नाही अशी अवस्था. एव्हाना रस्ता चुकलो ही खात्रीच झाली होती, कारण एक ते दीड किलोमीटर अंतर केव्हाच संपले होते. मनात जरा शंकेने आणि भीतीने जागा घ्यायला सुरुवात केली. वर आभाळ दाटून आले होते. केव्हाही धोधो पाऊस सुरू होईल असे वातावरण. वंश पुढे पुढे जात मधेच दिसेनासा होई की मग मी आणि सचिनसर घाबरून त्याला ओरडून आरोळी द्यायचो. तोही आमच्या आवाजाला प्रतिआवाज देऊन धीर देत होता. त्याही स्थितीत आजूबाजूला बघत फुलांचे, वातावरणाचे फोटो मी टिपत होते. खरे तर सचिनसर मनोमन मला नक्कीच ओरडले असावेत. नंतर मात्र आम्ही ओढवलेली परिस्थिती आणि आमची फजिती आठवून आठवून हसत होतो. शेवटी कसेबसे केबलकार स्टेशनला पोहोचलो आणि तुफान पाऊस सुरू झाला. तिथे जरा वेळ थांबून पाऊस उघडल्यावर चालत आम्ही हॉटेलला पोहोचलो. हॉटेलच्या खिडकीतून दिसणारा नजारा अतिशय सुंदर होता. पूर्ण धुक्याने लपेटलेले डोंगर, पावसाची रिपरिप, हाताच्या अंतरावर असणारी चिंब पावसात भिजलेली भरघोस सफरचंद आणि पेअर लगडलेली झाडे… स्वर्गीय सुंदर वातावरण! रात्री प्रमोदने सगळ्यांच्या आवडीचे जेवण करून सगळ्यांना तृप्त केले. सगळेजण रिलॅक्स झाले होते, पण उद्याच्या परतीच्या प्रवासामुळे ताटातूट होणार यामुळे मनात जरा नाराज झाले होते.
रात्रीचा आराम करून पुन्हा सकाळी आमचा दहा-बारा तासांचा बस प्रवास सुरू होणार होता, औली ते डेहराडून. दुसऱ्या दिवसी एकेक करत सगळे आपापल्या सोयीनुसार उतरले. सकाळी सुरू केलेला बसप्रवास रात्री दहाला डेहराडूनला संपला. शरीर इतके थकले होते की रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूमध्ये बाकावर दीड तास कधी झोप लागली कळलेच नाही. जाग आल्यानंतर गरमागरम मसाला नूडल्स खाल्ले आणि पुन्हा डेहराडून ते निजामुद्दीन रात्रभर रेल्वे प्रवासासाठी तयार. परतीचा प्रवास अतिशय सुखकर झाला.
माझ्या बकेट लिस्टमधील खूप दिवसांपासूनचा माझा पहिलावहिला हिमालयीन ट्रेक पूर्णत्वास आला होता, त्यामुळे मी अतिशय आनंदी आणि समाधानी होते. त्यात ट्रॅव्हल ग्रुपने सर्टिफिकेट ऑफ अकम्प्लिशमेंट दिल्यामुळे अजूनच आकाश ठेंगणे झाले. मन पुनःपुन्हा अनुभवलेल्या स्वर्गीय वातावरणात डोकावत, फुलांच्या स्मृतींनी डोलत होत. देवभूमीच्या सुंदर स्वर्गीय स्मृतींनी आयुष्याचे मेमरीकार्ड पूर्णपणे भरून गेले होते.