लेखक : धनंजय उपासनी
…ते दृश्य फारच विलोभनीय दिसत होते. हळूहळू काठावर बरेच पक्षी आल्याने निसर्गाचे ते सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. पक्षी तर कितीही वेळ बघितले तरी आनंदच मिळत असतो!
कधी कधी जुने अल्बम बघून भूतकाळात डोकवावे आणि भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा जगावे हे फार छान वाटते. काही वर्षांपूर्वी केलेल्या राजस्थान भटकंतीचा असाच एक जुना अल्बम हाताशी लागला. अल्बम बघत असताना एकेक फोटो पुढे पुढे जात असताना नजर कांड्या करकोचा या पक्ष्याच्या फोटोवर स्थिरावली. अल्बमची पाने पुढे जात होती, मन मात्र हळूहळू मागे मागे जाऊन जोधपूरजवळ असलेल्या खीचन या ठिकाणी जाऊन पोहोचले…
सकाळी ७.३० वाजता पुणे स्टेशनहून प्रगती एक्स्प्रेसने मुंबई गाठायची आणि दुपारी तीन वाजता रणकपूर एक्स्प्रेसने जोधपूरचा प्रवास सुरू करायचा असा पक्का आराखडा तयार झाला. प्रवासाला जाताना खूप गोष्टींची जुळवाजुळव करायची असते आणि कितीही आधी नियोजन केले, तरी खरी तयारी आदल्या दिवशीच पूर्ण होते असा अनुभव आहे. साधारण अकरा वाजता दादरला पोहोचलो. आमचा दिलीप नावाचा एक जवळचा मित्रही बरोबर येणार असल्याने त्याच्याच घरी गेलो. दुपारी रणकपूर एक्स्प्रेसने जोधपूरला जाण्यासाठी बांद्रा टर्मिनसला पोहोचलो. आमची गाडी आली. बोगी नंबर, सीट नंबर शोधण्यात फार मजा असते. सगळ्यांची ती धावपळ आणि लगबग शिगेला पोहोचते. दुपारी साधारण पावणे तीनला सुरू झालेला प्रवास सकाळी बरोबर १०.३५ला जोधपूरला पूर्ण झाला. जोधपूरपासून पुढे फलोदी या ठिकाणी एसटीने जायचे असल्याने जोधपूर रेल्वे स्टेशनवरून जोधपूर एसटी स्थानकावर जावे लागणार होते. रिक्षाने स्थानकावर पोहोचलो. अतिशय स्वच्छ आणि सजावट असलेली रिक्षा होती. छान वाटले. फलोदीला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बघितले तेव्हा सकाळी साडेअकरा वाजता सर्व थांब्यांवर थांबणारी साधी गाडी आणि साधारण बारा वाजता ठरावीक थांब्यांवर थांबून जलद जाणारी गाडी होती. नवीन परिसरातील लोकांचा आणि लोकजीवनाचा अभ्यास करायचा असेल तर साध्या गाडीतून प्रवास करावा म्हणजे लोकजीवन, मानवी पैलू आणि भाषाशैली या सगळ्याचे आकलन होत असते. जिकडे जावे तिकडच्या संस्कृतीचा एक भाग म्हणून जगावे, म्हणजे परिसराचा सखोल अभ्यास करता येतो. त्या भागातील लोकांशी संभाषण केल्याने आपलेपणाची भावना निर्माण होऊन आपला देश किती विविधतेने नटलेला आहे, याचा अभिमानही वाटतो.
जोधपूर फलोदी प्रवास सुरू झाला. गाडी थांबत होती आणि भरपूर सामान घेऊन माणसे गाडीत चढत होती. सगळी परिस्थिती न्याहाळत असताना साधारण चार वाजता फलोदी येथे पोहोचलो. फलोदी येथे आल्यावर एका रिक्षा चालकाने आम्ही पर्यटक असल्याचे ओळखले, त्यामुळे लगेचच आम्ही काय बघायला आलो आहे या विषयावर चर्चा सुरू झाली. आम्ही त्याला फोटो दाखवून डोमिसाइल क्रेन बघायला आलोय असे सांगितले, तेव्हा तो आकाशाकडे बघून पटकन म्हणाला, ‘कुरजे देखने आये हो? चलो हमारे साथ।’ कुरजे काही पटकन मला तरी फारसे नीट कळले नाही, पण विषयाच्या जवळ असल्याची खात्री वाटत होती. अंधार पडायला वेळ असल्याने आम्ही पटकन राहण्याची सोय करून आमचे ध्येय असलेल्या खीचन या गावाकडे निघालो. गाव साधारण नऊ-दहा किमी अंतरावर होते. रिक्षा खीचनच्या दिशेने जाऊ लागली… डोळे सगळीकडे शोध घेत असताना आकाशात लक्ष गेले आणि एक थवा उडताना दिसला… त्या क्षणी काय आनंद झाला म्हणून सांगू! पण सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे अंधार वाढायला लागला होता. पुरेसा प्रकाश नसल्याने फोटो काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. तरीही ठिकाण सापडले असल्याने खुशीत परतलो, ते पहाटे लवकर तिथे परतायचे हे ठरवून! केव्हा रात्र संपेल आणि पहाट होऊन चुग्गाघर (Birds Feeding Home) असलेल्या त्या ठिकाणी कधी जातो असे झाले होते. दिवसभर भरपूर प्रवास करून शरीर दमले होते, पण मन प्रफुल्लीत झाले होते. शरीर जरी म्हणत होते आराम करा, तरी मन म्हणत होते पहाटे लवकर उठून क्रेन बघायचे आहेत. मनाची साद शारीरिक संकेतापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते..!
पहाटे वेळ जायला नको म्हणून ज्या रिक्षाने जायचे होते ते नियोजन रात्रीच करून ठेवले होते. हवेत गारठा होता. निसर्ग फोटोग्राफी आवडता छंद असल्याने कॅमेरा व आवश्यक साधने बरोबर घेतली आणि चुग्गाघरकडे प्रस्थान केले. जसजसे ठिकाण जवळ येत होते, तशी पक्षी दर्शनाची ओढ वाढत होती. पक्ष्यांचा आवाज लांबून ऐकायला आला. फार प्रसन्न सकाळ होती. अजून पुरेसे उजाडले नसल्याने पक्षी नीट दिसावे आणि चांगले फोटोही काढता यावेत म्हणून पक्षी चुग्गाघरात येण्याआधीच एका दगडाच्या मागे त्यांना आमचा त्रास होणार नाही अशी दक्षता घेऊन जमिनीवर बसून वाट बघत होतो… अखेर पहिला थवा चुग्गाघरात येऊन बसला. चुग्गाघर म्हणजे चारी बाजूंनी छोटी संरक्षक भिंत तयार करून छोटे कंपाउंडसारखे केलेले होते. त्यामध्ये स्थानिक लोक या क्रेनसाठी धान्य ठेवतात ते खाण्यासाठी हे क्रेन येतात. आजूबाजूला मोकळी जागा आणि गावातील घरे होती. त्या परिसरात मारवाड क्रेन फाउंडेशन असा नामफलक असलेले छोटे कार्यालयही होते. एका पाठोपाठ थवे येत होते. जमिनीवर उतरताना त्यांच्या हालचाली बघून विमान धावपट्टीवर उतरते आहे असे वाटत होते. क्रेन जमिनीवर उतरत असताना त्यांच्या पायाचा स्पर्श जमिनीला झाल्यावर थोडे पळून हळूहळू वेग कमी करून स्थिरावत होते आणि धान्य खायला सुरुवात करत होते. विशेष म्हणजे, खाणाऱ्या पक्ष्यांना उतरणाऱ्या पक्ष्यांचा व्यत्यय होत नव्हता. एवढे शिस्तबद्ध सगळे सुरू होते. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आपणच घ्यावी, अशी शिकवणच तो प्रसंग देत होता. थवे वाढत होते त्यामुळे आवाजही वाढला होता. हालचाली वाढत असल्याने काही वेळाने तर सगळा परिसरच हलतो आहे, असे वाटायला लागले होते. खूप सुंदर दृश्य होते ते..! फोटो काढून झाल्यावर शांतपणे पक्षी बघत होतो. आता फोटोग्राफी थोडा वेळ बाजूला ठेवून आधी नुसत्या डोळ्यांनी आणि नंतर दुर्बीण डोळ्याला लावून ते नयनरम्य क्षण मनात साठवायला सुरुवात केली.
आम्हाला वातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता. कांड्या करकोचा हिवाळा सुरू झाल्याचे संकेत देतो, हे माहिती असल्याने शरीराने तो बदल स्वीकारला होता. मराठी नाव कांड्या करकोचा किंवा कृष्ण क्रौंच, तर इंग्रजीत Demoiselle Crane या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी आहे. लांब पाय आणि लांब मान असलेला हा करड्या रंगाचा सुंदर पक्षी आहे. कांड्या करकोच्याची मान काळ्या रंगाची असते. लालबुंद डोळ्याच्या मागे असलेली पांढऱ्या पिसांची रेघ जणू काही आयाळ असल्यासारखी भासते. छातीवर असलेली सैलसर काळी पिसे वाऱ्याच्या झुळकेने अधूनमधून हलत असल्याने नाजूक दिसणारा हा पक्षी अधिकच सुंदर दिसत होता. जमिनीवर उतरत असताना त्यांच्या हालचाली फार मोहक वाटत होत्या.
अजून किती थवे जमिनीच्या दिशेने येत आहेत याचा अंदाज घेण्यासाठी आकाशाकडे बघितले, तर माळेच्या आकाराची नक्षीच जणू आकाशात विहार करते आहे असे वाटत होते. पक्षी खाली येत होते, तेव्हा माळा खाली येत आहेत असे जाणवत होते. एक क्षण तर असा होता की वर बघितले तेव्हा त्या परिसरातले सगळे आकाश पक्ष्यांनी झाकले गेले होते, एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षी वर घिरट्या घालताना दिसले. गावातील घरांकडे लक्ष गेले तेव्हा बहुतेक गावाच्या लोकसंख्येपेक्षा पक्षी संख्या अधिक असेल असे मनात येऊन गेले. फार मोठा निसर्गाचा आविष्कार आम्ही बघत होतो, दृश्य फारच विलोभनीय दिसत होते. सूर्यदेवतेचे पूर्व दिशेला आगमन होत असताना रमणीय सकाळ अनुभवत होतो. उन्हामुळे पक्ष्यांच्या सावल्यासुद्धा हालचाल करत असल्याने फारच सुंदर दिसत होते. काही स्थानिक लोकांनी आमची क्रेन बघायची ओढ बघून मदतीच्या हेतूने काही सूचना देऊन आमच्या आनंदाला हातभार लावला. निसर्गातील भटकंतीमध्ये स्थानिक लोकांची मदत झाली तर फार आधार वाटतो. स्थानिक लोकांच्या सहभागामुळे मनावरचा ताणही हलका होत जातो.
हळूहळू चांगले उजाडले असल्याने वातावरणात ऊब निर्माण झाली होती. ऊन वाढल्यावर पक्षी पाणी पिण्यासाठी जवळच्या पाणवठ्यावर जातात, असे कळल्यावर आम्ही पाण्याच्या दिशेने निघालो. तलावापासून काही अंतरावर जाऊन क्रेनची वाट बघत बसलो. पाणवठा म्हणजे खूप साऱ्या तहानलेल्या जीवांसाठी ऊर्जास्रोत असतो. आम्ही सावलीत क्रेन येण्याची वाट बघत बसलो होतो. तलावाकडे बघितले तेव्हा लांबवर चमच्यासारखी चोच असलेला एक चमच्यापक्षी (Spoonbill) भक्ष्य शोधण्यात दंग झालेला होता. काही वेळाने मेंढ्यांचा एक कळप आला. दोन गाईही आल्या. लांबून गावातील महिला दोन कळश्या डोक्यावर घेऊन पाणवठ्याच्या दिशेने येताना दिसल्या. पाणी किती महत्त्वाचे आहे आणि किती जपून वापर केला पाहिजे असा विचार सुरू असताना आकाशातून क्रेनची एक माळ तलावाच्या दिशेने येताना दिसली. पाण्यापासून काही अंतरावर अलगद उतरून पाणी पिण्यासाठी सावधपणे एकेक पाऊल पुढे टाकत ते पाणी प्यायला लागले. अतिशय शिस्तबद्ध काम सुरू होते. अंतर लांबचे असल्याने फोटोग्राफीला मर्यादा होत्या, कारण फोटो काढण्याच्या हौसेसाठी प्राणी, पक्षी, कीटक यांच्या अधिवासाला कधीही नुकसान होणार नाही, ही खबरदारी आम्ही सदैव घेत असतो. फोटो नाही मिळाला तरी चालेल, पण निसर्ग साखळीचे नुकसान होता कामा नये ही काळजी आपण घेतलीच पाहिजे. ते दृश्य फारच विलोभनीय दिसत होते. हळूहळू काठावर बरेच पक्षी आल्याने निसर्गाचे ते सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. पक्षी तर कितीही वेळ बघितले तरी आनंदच मिळत असतो, पण वेळेचे बंधन होते. प्रवासाचा पुढचा टप्पा सवाई माधोपूर – रणथंबोर असल्याने निघावेच लागणार होते. संपूर्ण दिवसाच्या छान आठवणी मनात साठवून पुन्हा लवकरच या ठिकाणी भेट द्यावी, असे सारखे वाटत होते. गावाचा निरोप घेऊन परतीच्या वाटेने जात असताना कार्यालयाच्या नामफलकावर नजर गेली, तेव्हा त्यावर लिहिले होते ‘पधारो म्हारे खीचन’…
जुन्या चांगल्या आठवणी मनाच्या अल्बममध्ये कायम ठेवाव्यात. वेळ मिळेल तेव्हा शांतपणे अंतरंगात डोकावून बघितले तर या आठवणींमुळे जीवन सुंदर आहे ते अधिकच सुंदर होत जाते.