प्रवासी मी दिगंताचा…

लेखिका : अदिती पटवर्धन

प्रवास आवडणाऱ्या कुणीही आवर्जून वाचावं, असंच बिल ब्रायसन यांचं लिखाण आहे. प्रवासाचं खुमासदार वर्णन करतानाच जगाकडे, माणसांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी हा लेखक आपल्याला देऊन जातो, म्हणून याचं लिखाण वाचायला हवं असं मला वाटतं!

चांगली प्रवासवर्णनं लिहिण्यासाठी काय लागतं बरं? आरामदायी विमानप्रवास? देखणी, प्रशस्त हॉटेलं? लक्झ्युरियस क्रूझ? एक्झॉटिक ठिकाणं? अर्थातच यातलं काहीच नाही! ‘प्रवास’ या शब्दाचा अर्थ प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देऊन आलिशान हॉटेलांमध्ये राहण्यापुरता मर्यादित आहे की काय असं वाटायला लावणाऱ्या काळात काही लेखक असे आहेत, जे आपल्या लिखाणातून खरं प्रवासी असणं म्हणजे काय ते शिकवून जातात. बिल ब्रायसन हा असाच एक लेखक. या सिद्धहस्त लेखकानं अनेक विषयांवर वेगवेगळी पुस्तकं लिहिली असली, तरी माझ्या बकेट लिस्टमध्ये हा लेखक आहे तो उत्तम प्रवासवर्णनं लिहिणारा एक लेखक म्हणून! ब्रायसन त्यांच्या चिकित्सक, भवताल अचूक टिपणाऱ्या नजरेतून एखाद्या प्रदेशाचं अभ्यासपूर्ण वर्णन करतातच, पण त्यांच्या खास खुसखुशीत नर्मविनोदी शैलीत लिहिताना त्या लिखाणात जान आणतात. त्यामुळे त्यांची प्रवासवर्णनं नुसती एखाद्या प्रदेशाबद्दल न राहता ती त्या भागाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची, माणसांतल्या खुबींची, निसर्गाच्या स्वभावाची, जेवणाच्या लज्जतीची, रीतीरिवाजांची, तऱ्हांची आणि तऱ्हेवाईकपणाचीही बखरच होऊन जाते!

ब्रायसन हाडाचे पत्रकार. आजूबाजूच्या घटना अलगद टिपून निरीक्षणं नोंदवणं, त्यावर भाष्य करणं हा कोणत्याही पत्रकाराचा महत्त्वाचा गुण. लिहिण्यातलं सातत्य, लिखाणाचं संपादन करण्याची क्षमता, आणि आजूबाजूचे अनुभव टिपण्याची, त्यावर विचार करण्याची सवय या पत्रकारितेत अत्यावश्यक असलेल्या गुणांमुळे ब्रायसन यांना अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट, थेट मुद्द्याला हात घालणारं लेखन अगदी सहज जमलं. ते लेखक म्हणून प्रसिद्ध झाले यात आश्चर्यच नाही.

खरंतर ब्रायसन मूळचे अमेरिकी, पण अवघ्या इंग्लंड देशाला ते त्याचं ‘नॅशनल ट्रेझर’ वाटतात. अमेरिकतेल्या एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये कॉपी एडिटरचं काम करणाऱ्या ब्रायसनना युरोपला बॅकपॅकिंग ट्रिप करावीशी वाटली, तिथं प्रवास करताना इंग्लंडमधल्या एका लहानशा शहरात ते एका वीस वर्षांच्या नर्स म्हणून काम करणाऱ्या गोड मुलीच्या प्रेमात पडले आणि पाहता पाहता इंग्लंडमध्ये स्थायिक होऊन पुरते ब्रिटिश होऊन गेले. जवळपास दोन दशकं इंग्लंडमध्ये वास्तव्य केल्यानंतर जेव्हा ब्रायसन आणि त्यांच्या पत्नीनं (तीच ती तेव्हाची विशीतली गोड मुलगी!) अमेरिकेत स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला, तेव्हा ब्रायसन यांनी या देशाला त्यांच्या खास पद्धतीनी निरोप द्यायचा असं ठरवलं. इंग्लंडमध्ये त्यांचा प्रवास जिथून अगदी पहिल्यांदा सुरू झाला, तिथून सुरुवात करून हा आख्खा देश एकदा डोळे भरून पाहायचा, असं त्यांनी ठरवलं. हा प्रवास फक्त आणि फक्त सार्वजनिक वाहतूकव्यवस्था वापरून करायचा, असंही त्यांनी मुद्दाम ठरवलं. अर्थातच ते वर्ष १९९५ असल्यामुळे हा प्रवास स्मार्टफोन आणि गूगलशिवाय होता, हे सांगायला हवं! वीस वर्षांनी हा देश सोडताना ब्रायसन यांनी या देशाचा कानाकोपरा पालथा घातला. या देशाची, इथल्या माणसांची वैशिष्ट्यं टिपली. ब्रायसन ब्रिटनच्या इतिहासाबद्दल लिहितात, इथल्या लोकांच्या लहानसहान सवयींबद्दल लिहितात, इथल्या असंख्य हेरिटेज वास्तूंविषयी लिहितात, अमेरिकी आणि ब्रिटिश लोकांमधल्या फरकांविषयी लिहितात, इथल्या ‘चहा संस्कृती’विषयी लिहितात! किंबहुना अशी गोष्टच उरत नाही ज्याबद्दल ते लिहीत नाहीत! त्यामुळे आजही अनेकांच्या मते ‘नोट्स फ्रॉम या स्मॉल आयलंड’ हे इंग्लंडविषयीचं सर्वोत्कृष्ट प्रवासवर्णनात्मक पुस्तक आहे.

ब्रायसन यांचं आणखी एक उल्लेखनीय पुस्तक म्हणजे ‘अ वॉक इन द वूड्स’. अमेरिकेच्या पूर्वेकडच्या चौदा वेगवेगळ्या राज्यांतून जाणारा ‘एप्पलॅशीयन ट्रेल’ हा सुमारे २१०० मैलांचा एक पायी प्रवासाचा मार्ग (हायकिंग ट्रेल) आहे. हा प्रवास पूर्ण करायला सुमारे ५ ते ७ महिने लागतात. या ट्रेलच्या अगदी जवळ राहणाऱ्या ब्रायसन यांना या ट्रेलविषयी कळलं आणि त्यांनी हा प्रवास करून पाहायचं ठरवलं. त्यांनी स्टीफन कात्झ या त्यांच्या मित्रासोबत या प्रवासाला सुरुवात केली. त्या अवघड प्रवासातले अनुभव या ट्रॅव्हल डायरीवजा पुस्तकात नोंदवले आहेत. हायकिंगचा कोणताही पूर्वानुभव नसलेले हे दोघं या प्रवासाला बाहेर पडले आणि या काही महिन्यांत त्यांना काय अनुभव आले, कोणकोणत्या अडचणी आल्या हे लिहितानाच त्यांनी या ट्रेलचा इतिहास, त्यातले सामाजिक-भौगोलिक मुद्दे, इथल्या निसर्गसंवर्धनाचा आढावा अशा अनेक गोष्टींविषयी लिहिलं आहे. आख्खा ट्रेल पूर्ण करता आला नसला, तरी या जोडगोळीने जवळजवळ ८०० मैल (सुमारे १३०० किमी) अंतर जंगल-दऱ्याखोऱ्यांतून पायी पार केलं, हे विलक्षणच! हा अनुभवच मुळात जगावेगळा आणि ब्रायसन यांच्या खास शैलीमुळे त्याविषयी वाचताना आणखी मजा येते. या पुस्तकावर आधारित ‘अ वॉक इन द वूड्स’ याच नावाचा चित्रपट २०१५मध्ये आला होता.

ब्रायसन आता चांगले ७१ वर्षांचे आजोबा आहेत! पायाला भिंगरी असलेल्या या लेखकानं नुकतीच २०२०मध्ये लिखाणातून निवृत्ती जाहीर केली, तीही त्याच्या खुमासदार शैलीत. “सध्या तरी मी निवृत्तीकडे एक प्रयोग म्हणून पाहतोय आणि काहीच न करण्याचा हा माझा प्रयोग अजून तरी मस्त चाललाय,” असं त्यांनी जाहीर केलंय.

ब्रायसन हे समस्त फिरस्त्यांचा आदर्श आहेत, असं मला वाटतं. एखादी नवी जागा इंटरेस्टिंग वाटली, की पायात बूट घालून लागले चालायला. बरं यांचा प्रवास म्हणजे काही एक्झॉटिक ठिकाणी, आरामदायी हॉटेलमध्ये नाही. ठरावीक पैशांत प्रवास. वाट फुटेल तिकडे जायचं. प्रवासात कधी कोणी सोबतीला, तर कधी हा लेखक एकटाच भटकंतीला निघालेला. ‘मन आणि डोळे उघडे ठेवून केलेला प्रवास’ कसा असतो, ते त्यांच्या लिखाणात अगदी स्पष्ट दिसून येतं. त्यांच्या युरोपातल्या प्रवासाविषयी लिहिलेल्या ‘नीदर हियर नॉर देअर’ या पुस्तकात ते म्हणतात, “मला सगळे जण काय बघायला जातायत, कशाबद्दल बोलतायत, हे जाणून घेण्यात अजिबात रस नाही. एखाद्या नव्या ठिकाणी काहीही माहीत नसताना जायला मला आवडतं. परदेश प्रवासाची मजा खरी यातच आहे. मला एखाद्या नव्या देशात गेल्यावर पुन्हा पाच वर्षांचा झाल्यासारखं वाटतं – लिहिलेलं काही वाचता येत नाही, तुम्हाला आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींचा अगदी बेसिक अंदाज असतो, अगदी रस्ता क्रॉस करतानासुद्धा काहीतरी नवीन कळतं. अशावेळी तुमच्या अस्तित्वाचं प्रयोजनच वेगवेगळ्या नव्या गोष्टींचा अंदाज लावणं, शिकणं, समजून घेणं एवढंच असतं.”

प्रवास आवडणाऱ्या कुणीही आवर्जून वाचावं, असंच ब्रायसन यांचं लिखाण आहेच. प्रवासाचं खुमासदार वर्णन करतानाच जगाकडे, माणसांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी हा लेखक आपल्याला देऊन जातो, म्हणून याचं लिखाण वाचायला हवं असं मला वाटतं!

  • बिल ब्रायसन यांची उल्लेखनीय प्रवासवर्णनं
  • Notes From a Small Island
  • A Walk in the Woods: Rediscovering America on the Appalachian Trail
  • The Lost Continent: Travels in Small-Town America
  • Neither Here Nor There: Travels in Europe
0
0
error: Content is protected !!