मणिपूर, नागालँडची सफर



लेखक ः प्रतीक जोशी


मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांच्या ट्रिपच्या आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या होत्या. त्या अनेक आठवणींसह मुंबईला परतलो खरा, पण मन अजून तिथेच रेंगाळत होते…


गेल्या नोव्हेंबरमध्ये आम्ही सेव्हन सिस्टर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात राज्यांपैकी मणिपूर, नागालँड, मिझोराम व त्रिपुरा या सहलीचा बेत आखला. आमची सहल एकूण बारा दिवसांची होती. उंच पर्वत रांगा, घनदाट हिरवळ, मस्त थंड हवा व इथली सुंदर घरे पाहून मन तृप्त झाले.

आमच्या सहलीचे पहिले ठिकाण होते मणिपूरची राजधानी इंफाळ शहर. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही इंफाळच्या बिर तिकेंद्रजीत विमानतळावर पोहोचलो. विमानतळावरच आम्हाला इनर लाईन परमीट घेऊन पुढे प्रस्थान करण्यास सांगितले. मणिपूरमध्ये आमचा मुक्काम तीन दिवसांचा होता.

सायंकाळी इमा मार्केट ही बाजारपेठ पाहिली. ही बाजारपेठ नुपी केथेल म्हणूनही ओळखली जाते. पूर्णतः महिला चालवत असलेली ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इथली मणिपुरी साडी प्रसिद्ध आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी लोकटाक लेक पाहायला गेलो. होडीतून जाताना लाइफ जॅकेट घालावेच लागले. लोकटाक सरोवर हे उत्तर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवरामध्ये तरंगणाऱ्या वनस्पती पाहिल्या. चाळीस किमीपर्यंत त्या पसरल्या आहेत असे समजले. येथे काही सुंदर फोटो काढून आम्ही पुढच्या पर्यटन स्थळाला भेट दिली. इथले आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गोविंदजी मंदिर. हे मंदिर १८४६मध्ये बांधले होते. या मंदिरावर सोन्याचा घुमट आहे. येथे सायंकाळी आरती होते.

मणिपूरमध्ये ‘सांगाय फेस्टिव्हल’ नावाचा प्रसिद्ध कला महोत्सव भरतो. विशेष म्हणजे हा महोत्सव मणिपूरच्या विविध शहरांमध्ये होतो. महोत्सवाचे प्रवेश शुल्क पन्नास रुपये होते. येथे नानाविध वस्तूंचे स्टॉल होते. खाद्यपदार्थांचेही अनेक स्टॉल होते. तसेच एका मंचावर विविध कला, नृत्य व गायन यांचे आयोजन केले होते.

इथले आणखी एक खास पर्यटन स्थळ म्हणजे केबुल लामजो राष्ट्रीय उद्यान! हे उद्यान हरणांसाठी प्रसिद्ध आहे. याचे वैशिष्ट्य असे की हे जगातील एकमेव तरंगणारे अभयारण्य आहे.

त्यानंतर आम्ही मोरे येथील भारत-म्यानमार ही सीमा पाहिली. मोरेमधील भारत-म्यानमार मैत्री सीमेवर पोहोचण्यासाठी एकमेव मार्ग इंफाळमार्गेच आहे. येथे पोहोचण्यासाठी टॅक्सी व बस सेवा उपलब्ध आहे. मोरे हे एक महत्त्वाचे व्यापारी शहर आहे. म्यानमारमधील मेरियन फळ, लोणचे, बरमीझ चहा अशा काही खाद्यपदार्थांना मणिपूर व नागालँडमध्ये मागणी आहे. मी हॉटेलच्या रिसेप्शन स्टाफशी ह्या सुंदर शहराबद्दल चर्चा केली, तेव्हा ही माहिती कळाली.

येथील स्थानिक लोक अतिशय प्रेमळ होते. येथे मणिपुरी भाषा बोलली जाते. त्याला ‘मीते’ (सायनो तिबेटियन भाषा) असेदेखील म्हणतात. येथे संध्याकाळ सुमारे पाच ते सहाच्या दरम्यान होते आणि दुकाने सहापर्यंतच उघडी असतात. इथल्या अनेक रम्य आठवणी मनात साठवून आम्ही नागालँडची राजधानी कोहिमा येथे पोहोचलो.

कोहिमापर्यंतचा बस प्रवास साधारण आठ ते नऊ तासांचा होता. नागालँडमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये साधारण १४ ते १५ डिग्री तापमान असते. नागालँडमध्ये ‘नागामिस’ भाषा बोलतात. नागालँडचे प्रसिद्ध ‘नागा हेरिटेज व्हिलेज’ पाहिले. येथे जवळच दर वर्षी डिसेंबर महिन्यात हॉर्नबिल महोत्सव होतो. येथे बांबू हेरिटेज हॉल व दुसरे महायुद्ध संग्रहालय (वर्ल्ड वॉर टू म्युझियम) आहे. त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठे चर्चही पाहिले. त्यानंतर ग्रीन व्हिलेज पाहून भोजनाचा आस्वाद घेतला. इथला प्रसिद्ध वाइल्ड ॲपल ज्यूस फारच रुचकर होता.

त्यानंतर आम्ही २६० किमीचा प्रवास करून सिल्चर शहरामध्ये एक दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मिझोरामची राजधानी ऐझवालकडे प्रस्थान केले. ऐझवालमध्ये सकाळचा नाश्ता केला आणि तिथले प्रसिद्ध फलकवन नावाचे गाव पाहिले. फलकवन गाव ऐझवालपासून अठरा किमी अंतरावर वसलेले गाव आहे. येथे एक छोटे संग्रहालयही आहे. तिथे मिझो गावाची संस्कृती, जीवनशैली पाहायला मिळाली.

त्यानंतर आम्ही त्रिपुराची राजधानी आगरताळा येथे पोहोचलो. इथे आल्यानंतर छाबीमुरा या पर्यटन स्थळाला भेट दिलीच पाहिजे. छाबीमुरा हे गोमती नदीच्या काठावर असलेले स्थळ डोंगरावरील कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. हा नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृतीचा मिलाफ अवर्णनीय! इथल्या सरोवरामधून बोंटिंग केले. तिथली एक गुफाही पाहिली. त्यानंतर आम्ही नीरमहाल पाहायला निघालो.

नीरमहाल आगरतळापासून ५३ किमी अंतरावर आहे. येथे होडीतून जाता येते. रुद्रसागर तलावाकाठी नीरमहाल बांधला आहे. रुद्रसागर तलावात महाल बांधण्याची कल्पना महाराजा बीर बिक्रम माणिक्य बहादूर यांची होती. नीरमहाल दोन भागात विभागलेला आहे. आत ओपन एअर थिएटर व अंदर महाल आहे. राजवाड्यात एकूण २४ खोल्या आहेत.

दुसऱ्या दिवशी सकाळी उनाकोटी हे पर्यटन स्थळ पाहायला निघालो. उनाकोटी हे ठिकाण आगरताळापासून पाच ते सहा तासांच्या अंतरावर आहे. उनाकोटी येथे हिंदू पौराणिक कथांतील हनुमान, रावण, श्रीगणेश आणि इतर देवतांची शिल्पे कोरली आहेत. नंतर आम्ही खास बंगाली मिठाईचा आस्वाद घेण्यासाठी तिथल्या प्रसिद्ध शेरोवाली मिठाईच्या दुकानात गेलो. रसगुल्ला, कमल भोग व मँगो भोग या मिठाया घेतल्या.

या संपूर्ण प्रवासामधले नयनरम्य दृश्य व अनेक सुंदर क्षण मी कॅमेऱ्यात टिपलेच होते. त्या ट्रिपच्या अनेक आठवणींसह मुंबईला परतलो खरा, पण मन अजून तिथेच रेंगाळत होते.

0
0
error: Content is protected !!