लेखक : सुलक्षणा महाजन
आजच्या काळात मेगा स्ट्रक्चर्सचा संबंध मानवी सर्जक मेंदूशी, अभिकल्पनांशी असला तरी त्यामागील भावना आणि भूमिका संपूर्णपणे बदलत आहेत. आजच्या मेगा स्ट्रक्चर्सच्या बांधकामात, आकारात, संकल्पना आणि नियोजनाच्या पातळीवर अजस्र यंत्रे आणि सूक्ष्म तंत्रे यांचा मिलाफ झालेला दिसतो.
माणसांना मेंदूसारखा दिव्य अवयव लाभलेला आहे. त्याच बरोबर अनेक प्रकारच्या भावनांचे वरदान मिळाले आहे. प्राण्यांना मेंदू आणि भावना असतात. मात्र माहितीचा साठा आणि वापर करण्याची, भाषा आणि कथा-कल्पना निर्माण करण्याची, संवाद करण्याची, तीव्र-सूक्ष्म भावनांची अनुभूती घेण्याची मानवी मेंदूची क्षमता अद्वितीय आहे. भव्यता आपल्याला अचंबित करते, सौंदर्य आसक्ती आणि असूया निर्माण करते, कोमलता अंगावरून मोरपीस फिरवते तर क्रौर्य आणि हिंसा किळस निर्माण करते. हा भोवतालचा पसारा कसा आहे, तो कोणी? कशासाठी? आणि कोणासाठी निर्माण केला आहे? असे प्रश्न पडतात. त्यातूनच उत्तरे शोधण्याची परंपरा मानवी समाजात निर्माण झाली आहे, आणि सर्जकतेचा उगम झाला आहे. निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीवर क्रिया-प्रक्रिया करत मानवी परिसर उत्क्रांत होत आले आहेत. मानव निर्मित जग एक सतत चालणारी शोध यात्रा बनली आहे.
आज मात्र ह्या सार्वत्रिक मानवी सर्जकतेमुळे पृथ्वी आणि निसर्गासाठी ताप निर्माण झाले आहेत. शाप बनून आपल्यावर उलटत आहेत. अविरत, अतिरेकी आणि असंबद्ध सर्जकतेमुळे नवीन सापळे, नवीन प्रश्न, समस्या तयार होत आहेत. मानव निर्मित परिसर आणि निसर्ग यांत अंतराय निर्माण झाला आहे. मानवाचे भव्य अभिकल्प, अभियांत्रिकी रचना यामधून मेगा स्ट्रक्चर्स उभी करण्याची स्पर्धा गेल्या शतकापासून बघायला मिळते. त्यासाठी वेगवान तंत्रे आणि अवाढव्य यंत्रे तयार करून निसर्गातील साधन संपत्ती ओरबाडली जात आहे. त्यांचे निसर्गावर होत असलेले विपरीत आणि तीव्र आघात मानवी समाजात हाहाकार निर्माण करीत आहेत. निसर्गाची लूट थांबवा, वेग कमी करा, स्वतःवर आणि भव्यतेच्या स्पर्धेवर ताबा ठेवा, उपभोगाला मर्यादा घाला, असे अनेक संदेश त्यातून मिळत आहेत. मेगा स्ट्रक्चर्स आणि मेगा संकटांची साखळी तोडण्याची आवश्यकता आहे. आजची यंत्रे, तंत्रे एकीकडे आकर्षित करत असली तरी त्यामुळे भयही निर्माण होत आहे. त्यासाठी मेगा स्ट्रक्चर्स, त्यांचे शाप आणि उःशाप समजून घेण्याची आवश्यकता आहे. ह्या लेखमालेचा हाच उद्देश आहे.
ऐतिहासिक परंपरा
गेल्या काही वर्षांमध्ये विविध देशांमधील प्राचीन, ऐतिहासिक आणि आधुनिक काळात मानवाने निर्माण केलेली मेगा स्ट्रक्चर्स बघण्याचे योग आले. त्याआधी चित्रे, पुस्तके, चित्रपट बघून आणि अभ्यासातून त्यांच्या विषयीच्या सुरस आणि चमत्कारिक कथांची ओळख झाली होती. सुरुवातीच्या काळात मेगा स्ट्रक्चर्स बघून थक्क होण्याचे, आनंदित होण्याचे अनेक प्रसंग आले. वास्तुकला शिकत असताना आग्र्याचा ताजमहाल बघण्यासाठी आम्ही विद्यार्थी एका पौर्णिमेच्या रात्री दूरवरून चालत गेलो होतो. त्या वास्तूचे रात्रीच्या चंद्रप्रकाशात जवळ येणारे अद्भुत स्वरूप बघून भारावून गेलो होतो. चीनमधील डोंगरांवर पसरलेल्या लांबच लांब भिंतीवरून चालत जाण्याचा थरार अनुभवला होता. पॅरिसमधला आयफेल टॉवर, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट इमारत तसेच जागतिक व्यापार केंद्राच्या जुन्या इमारतीच्या टोकावरून आजूबाजूला पसरलेले महानगर अथांग भासत होते. सिडनीमधील समुद्र काठावरची ऑपेरा हाऊसची काँक्रीटची सफेद शिडे बघून मानवी सर्जकतेची कमाल वाटली होती.
सन २०२०मध्ये मी मेक्सिको देशात गेले होते. अनेक वर्षांपासून तेथील पिरॅमिड बघण्याची इच्छा होती; ती पूर्ण झाली. काही शतकांच्या काळात शेकडो पिरॅमिड उभारण्यामागील तेथील समाजांची इच्छा, आकांक्षा, गरज, संकल्पना या सर्वांबद्दल कुतूहल जागृत झाले तरी त्याची उत्तरे काही मिळाली नाहीत. इजिप्तमधील पिरॅमिडमध्ये राजे-राण्या, त्यांच्या आवडत्या वस्तू, प्राणी यांना पुरले जात होते. त्यामुळे त्या समाध्या आहेत असे माहीत होते. पण मेक्सिकोमधील पिरॅमिडची रचना वेगळीच आहे. दगडांच्या भरीव टप्पे असलेल्या थरांवर सपाटी आहे. तेथे जाण्यासाठी उंच पायऱ्या आहेत. त्या पिरॅमिडवरून अनेकांना मृत्यूच्या दाढेत ढकलून बळी देण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. प्राचीन आणि ऐतिहासिक काळातील मानवनिर्मित मेगा स्ट्रक्चर्स देव-देवतांना वश करण्यासाठी, धार्मिक-आध्यात्मिक समजुतींसाठी, त्या आधारित व्यवहारांसाठी किंवा सत्ताधीशांसाठी बांधली जात असत. सामान्य नागरिकांसाठी तेथे काही विशेष रचना नसत.
त्या काळामध्येही मानवी समाजात असूया-स्पर्धा होत्याच. त्यामुळेच संरक्षणासाठी तटबंदी बांधणे सत्ताधीशांना आवश्यक असे. अलीकडच्या काळात आधुनिक युद्धशास्त्रात झालेल्या बदलांमुळे भरभक्कम तटबंदी, किल्ले, खंदक अशा अभियांत्रिकी रचना निरर्थक ठरल्या आहेत. या उलट व्यापारी, आर्थिक उलाढालीसाठी, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठी भव्य-दिव्य बांधकामे करण्याला महत्त्व आले आहे. बांधकामांचे आकार, प्रकार, साहित्य, भव्यता, अभियांत्रिकी तंत्रज्ञान यामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. बघता बघता मेगा स्ट्रक्चर्स उभी राहत आहेत. इतकेच काय सामान्य माणसांची घरे श्रीमंतांच्या उत्तुंग इमारतींप्रमाणे आकाशाला गवसणी घालू लागल्या आहेत. त्याच बरोबर भव्यदिव्य प्रार्थना मंदिरे बांधली जात आहेत. त्याच्या वास्तुशैली पारंपरिक आहेत तसेच काही अभिनवही आहेत, आधुनिक आहेत. वास्तुशैली कोणतीही असली तरी त्यासाठी अभियांत्रिकी तंत्रज्ञान मात्र यंत्र व माहिती युगातलेच आहे!
उदाहरणच द्यायचे तर मुंबईमध्ये भाईंदर येथे विपश्यना केंद्रामधील सोनेरी रंगाच्या पारंपरिक आकारात बांधलेल्या पॅगोडासाठी वापरण्यात आलेल्या मोठ्या अवजड दगडांना आकार देण्याचे काम संगणकाच्या आधारे यंत्रांनी केले आहे. ते रचण्यासाठी उंच क्रेन वापरल्या असल्यामुळेच त्याचे बांधकाम अल्पकाळात होऊ शकले. पाँडिचेरी येथील ऑरोव्हिलेमधील मातृमंदिर गोलाकार आहे आणि त्याचा पृष्ठभाग सोनेरी खोलगट बशांनी सजला आहे. त्यासाठी अभिनव आकार आणि बांधकाम तंत्र वापरले आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील नाट्यगृहावर काँक्रीटमध्ये जहाजांच्या बाकदार शिडांची रचना केली आहे. त्यावरच्या संगमरवरी पांढऱ्या लाद्या यंत्रांच्या साहाय्याने नेमका आकार देऊन बसविल्या आहेत. गेली शंभर वर्ष बांधकाम चालू असलेल्या बार्सिलोना येथील चर्चचे बांधकाम आधुनिक तंत्रज्ञानामुळे येत्या पाच-सहा वर्षांमध्ये पूर्ण करणे शक्य होत आहे. त्या चर्चचा आर्किटेक्ट गॉवदी ह्याच्या एका रचनेतून अलीकडेच विकसित होत असलेल्या पॅरामेट्रिक वास्तुकलेचा जन्म झाल्याचे मानले जात आहे.
नैसर्गिक, वळणदार आकारांच्या, अभावानेच सरळ रेषा असणाऱ्या पॅरामेट्रिक शैलीमधील वास्तूंच्या संकल्पना आणि बांधकाम करणे संगणकीय प्रणाली, त्रिमिती (थ्री-डी) छपाई तंत्रामुळे शक्य होत आहे. बीजिंगमधील घरट्याच्या स्वरूपातले ऑलिंपिक स्टेडियम हे त्याचे सुरुवातीचे उदाहरण म्हणून सांगता येईल.
मानवी अभिकल्प संकल्पना शक्ती
मेगा स्ट्रक्चर्सची संकल्पना आणि नियोजन करून बांधकाम यशस्वी केल्याची असंख्य उदाहरणे जगभर विखुरलेली आहेत. (अयशस्वी उदाहरणेही लाखोंच्या संख्येने आहेत!) चार-पाच हजार वर्षांपूर्वी भरभराटीला आलेल्या बहुतेक प्राचीन संस्कृती नद्यांच्या किनारा प्रदेशांमध्ये बहरल्या होत्या. शेती संस्कृती रुजण्याच्या आणि रुजविण्याच्या काळातील एक उदाहरण म्हणून इजिप्तमधील फायूम प्रकल्पाचे देता येईल.
सिंचनासाठी धरणे, तलाव आणि कालवे बांधण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. माणसाला शेतीचा शोध लागला, अन्नासाठी वणवण संपली. लोकसंख्या वाढली तशी शेतीसाठी जमिनीची गरजही वाढली. नदीचे पाणी आणण्यासाठी कालवे खणून वाळवंटांच्या प्रदेशात नंदनवन फुलविण्याचे कसब पुरातन आहे. तसेच डोंगर उतारावर जमिनीचे टप्पे तयार करून शेतीसाठी वापरात आणण्याचे कौशल्यही प्राचीन आहे. इजिप्तमधील वाळवंट आणि तेथील भव्य पिरॅमिड आपल्याला माहीत असतात. पण पिरॅमिड म्हणजे कालवे खणताना निघालेल्या टनावारी दगडांची केलेली बांधकामे हे सहसा माहीत नसते.
फायूम दरीचे नंदनवन
इ.स.पूर्व १८७८ ते १८१४ ह्या काळात, म्हणजेच साधारण चार हजार वर्षांपूर्वी इजिप्तमधील सेनुरेस्ट-तिसरा आणि अमनेमेंहत-तिसरा या दोन फेरोंच्या, म्हणजेच राजांच्या, काळात नाईल नदी ते फायूम दरीतील मगरींचे राज्य असलेल्या दलदलीच्या प्रदेशापर्यंत सुमारे पंचवीस किलोमीटर लांबीचा कालवा खणून काढण्याचा एक मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला. नाईल नदीच्या पुराचे पाणी दरीत आले आणि दलदलीच्या जागी विस्तीर्ण तलाव निर्माण झाला. ह्या प्रकल्पापूर्वी तेथे लहान कालवे, बंधारे आणि तलाव खणून नदीतील पाणी दूर जागी साठवले जात असे. पुराच्या पाण्याबरोबर ह्या तलावांमध्ये गाळ येत असे. पूर ओसरल्यावर सुपीक गाळाच्या जमिनीत शेती केली जात असे. अशा ह्या लहान लहान प्रकल्पांच्या अनुभवातूनच मोठा कालवा काढण्याचे धाडसी नियोजन झाले. नाईल नदीपासून लांब-रुंद कालवा खणण्यात आला. दरीमध्ये पाणी साठवण्यासाठी सुमारे २००० चौ. किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रचंड जलाशय निर्माण करण्यात आला. ह्या मोठ्या तलावामुळे सभोवतालच्या वाळवंटी प्रदेशात हजारो एकर जमिनीवर शेती करून, झाडे लावून एक नंदनवन फुलले. शिवाय पुराच्या पाण्यापासून काठांवरील वस्त्यांची सुटका झाली. फायूम जलाशयाच्या काठावर वस्ती वाढली. शहरे तयार झाली. एकेकाळी मगरीचे साम्राज्य असलेल्या दरीतील दलदल कमी झाली, तरीसुद्धा मगरी जिवंत राहिल्या. विस्तीर्ण जलाशयात माशांची पैदास वाढली. मगरीचे साम्राज्य असलेला काही परिसर माणसांनी स्वतःसाठी विकसित केला. मगरींचे आभार मानून परिसराचे रक्षण करण्याची जबाबदारीही मानवाने घेतली. आदर म्हणून मगर देवीची देवळे बांधली. माणसाचे शरीर आणि मगरीचे तोंड असलेल्या देवतेच्या दगडात कोरलेल्या मूर्तींची स्थापना त्यात करण्यात आली. शहराला ‘मगरपुरी’ (Crocodilopolis) नाव दिले गेले. शिवाय हा प्रकल्प राबविणाऱ्या राजाला देवत्व आणि अमरत्व मिळाले.
ह्या बहुउद्देशी प्रकल्पाने इजिप्तची संस्कृती भरभराटीला आली. ब्रॉन्झ युगातील ह्या प्रकल्पाच्या यशाचे श्रेय मानवाची विकसित बुद्धी, त्या आधारे केलेले भौगोलिक परिसराचे, नाईल नदीच्या स्वभावाचे, खोऱ्याचे, फायूम दरीचे दीर्घकाळ केलेले निरीक्षण यांना द्यावे लागेल. भौगोलिक आणि नैसर्गिक संपत्तीला नियोजन आणि मानवी श्रमांची जोड मिळाली. सर्वात कळीची होती ती मानवी प्रज्ञा आणि दूरदृष्टी. चार हजार वर्षांपूर्वीच्या काळातील बांधकाम अभियांत्रिकी तज्ज्ञांची अभिकल्प आणि नियोजन क्षमता. त्यांच्यावर विश्वास ठेऊन ह्या प्रकल्पाला फेरोने केलेली सर्व प्रकारची मदत ह्या गोष्टींची विशेष दखल घ्यायला हवी. गेली चार हजार वर्षे फायूम दरीत मानवाने वस्ती केलेली आहे. आजही ह्या सुपीक क्षेत्रामध्ये सुमारे चाळीस लाख लोकवस्ती आहे. आधुनिक काळात चर्चिल्या जाण्याऱ्या शाश्वत विकासाच्या प्रकल्पांच्या नियोजनासाठी हे एक आदर्श उदाहरण असावे. इतके मोठे बांधकाम प्रकल्प त्यानंतर हजारो वर्षांनी आधुनिक काळातच बांधले जाऊ लागले.
मेगास्ट्रक्चर: अभिकल्पना, दूरदृष्टी आणि जबाबदारी
आजच्या काळात मेगा स्ट्रक्चर्सचा संबंध मानवी सर्जक मेंदूशी, अभिकल्पनांशी असला तरी त्यामागील भावना आणि भूमिका संपूर्णपणे बदलत आहेत. आजच्या मेगा स्ट्रक्चर्सच्या बांधकामात, आकारात, संकल्पना आणि नियोजनाच्या पातळीवर अजस्र यंत्रे आणि सूक्ष्म तंत्रे यांचा मिलाफ झालेला दिसतो. ह्यामुळे अशा बांधकामांचा वेग, प्रमाण आणि दर्जा बदलला आहे. उपयुक्तेचे उद्देश आणि निकष मागे पडले आहेत. अनेकदा मेगा स्ट्रक्चर्स सत्तेच्या, पैशाच्या प्रदर्शनाचे आणि प्रचाराचे साधन झाले आहे. गेल्या पन्नास वर्षात तर माहिती, संगणक आणि संवाद क्रांतीने बांधकाम अभिकल्पांचे बहुतेक सर्व आयाम बदलले आहेत. फायूम कालवा खणण्यासाठी हजारो गुलामांचे श्रम आणि चौसष्ट वर्षांचा दीर्घ काळ लागला होता. त्याचे नियोजन करण्यासाठीही असाच मोठा काळ लागला असेल. तेव्हा समाज, शेती, निसर्ग आणि मानवी प्रकल्प यांच्यामधील नाते हळूहळू विकसित होत गेले होते. परिस्थितीतून तावून सुलाखून, तपासून तसेच केवळ मानवी श्रम वापरत मानवी समाज घडत होता. त्यात गुलामगिरीसारख्या गैर प्रथा होत्या आणि पर्यावरणावर आघातही होत होते. तरीसुद्धा मानवाला जगण्यासाठी आणि संस्कृतीचा विकास होण्यासाठी त्यांची उपयुक्तता होती.
आजच्या काळात असा भव्य प्रकल्प करायचा झाल्यास ते काम चार-सहा वर्षांत पूर्ण करणे यंत्र-तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. मात्र अशा प्रकल्पाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अंदाज करणे आजही शक्य नाही. आजच्या मेगा स्ट्रक्चर्समुळे स्थानिक भूगोल बदलतो, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि राजकारणही बदलते आहे. समाज निश्चिन्त होण्याची अपेक्षा असताना अनिश्चितता वाढते आहे. मेगा स्ट्रक्चरच्या ह्या लेखमालेतून त्यांचाही परामर्श घेण्याचा प्रयत्न आहे.